शाळेत सोडवतो म्हणून विद्यार्थीनीचे अपहरण करुन अत्याचार केला, आरोपीला 20 वर्षे सक्तमजुरी व 25 हजार दंड.! आरोपीला पश्चाताप,
सार्वभौम (संगमनेर) :-
27 वर्षीय युवकाने शाळेमध्ये सकाळी रोडवरून चालणाऱ्या मुलीला फुस लावुन पळवले आणि लग्नाचे अमिश दाखवुन एका रूममध्ये नेऊन वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना दि. 12 डिसेंबर 2018 ते 1 जुन 2020 रोजी संगमनेर तालुक्यातील नांदुरखंदरमाळ ते चाकण येथील वासुली या गावी वेळोवेळी घडली होती. बलात्कार करून आरोपी पसार झाला असता त्याचा शोध घेऊन आरोपी रविंद्र वसंत गोंधे (रा.खालची माहुली, नांदूरखंदरमाळ, ता. संगमनेर) यास घारगाव पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांनी या गुन्ह्याचा सखोल तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. आज गुरुवार दि.9 मे रोजी जिल्हा सत्र न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. सरकारी वकील ऍड.जयंत दिवटे यांचा युक्तिवाद आणि सबळ पुरावे यांच्या आधारे जिल्हा सत्र न्यायाधीश श्री.योगेश मनाठकर यांनी आरोपी रविंद्र गोंधे यास वीस वर्षे सक्त मजुरी व 25 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिडीत मुलगी ही दररोज प्रमाणे सकाळी शाळेत जात होती. दि. 12 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 9 वाजता गावातुन कच्चारोडने पिडीत मुलगी शाळेत जात असताना आरोपी रविंद्र गोंधे हा त्याच्या मोटारसायकलवर आला. पिडीत मुलीला पाहुन रोडलगत असणाऱ्या पोल्ट्रीफार्म जवळ थांबुन पिडीत मुलीला म्हणाला की, माझ्यासोबत घारगावला चल.त्यावेळी पिडीत मुलगी म्हणाली की, मला शाळेत जायचे आहे. आरोपी रविंद्र गोंधे व पिडीत मुलगी ही एकाच परिसरात राहत असल्याने त्या दोघांची ओळख होती. आरोपी रविंद्र गोंधे याची पिडीत मुलीवर नजर होती. पण एक माणुस म्हणुन वाईट नजर होती. ओळख असल्याने पिडीत मुलीला शाळेत सोडवतो असे म्हणुन आरोपी रविंद्र गोंधे याने पिडीत मुलीला गाडीवर बसवले. त्याने गाडी वेगाने घेतली. शाळेकडे न जाता घारगावच्या दिशेने गाडी नेली. त्यावेळी पिडीत मुलीने आरडा ओरडा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी रविंद्र गोंधे याने पिडीत मुलीला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन गप्प बसण्यास सांगितले.
दरम्यान, पिडीत मुलीला घारागाव मार्गे चाकण जवळ असलेल्या वासुली या गावी नेले. तेथे पहिलेच खोली भाडेतत्त्वावर घेतलेली होती. तेथे नेऊन पिडीत मुलीला लग्नाचे आमिष दाखवले. पिडीत मुलगी ही अल्पवयीन असल्याचे माहीत असताना देखील तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार संभोग केला. हा प्रकार दि. 12 डिसेंबर 2018 ते 1 जुन 2020 या कालावधीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वारंवार झाला. ही घटना कोणाला सांगितली तर तुला जीवे ठार मारील अशी धमकी दिल्याने पिडीत मुलीने अन्याय निमूटपणे सहन केला. त्यानंतर पिडीत मुलीने आपल्या नातेवाईकांशी संपर्क केला. नातेवाईकांशी संपर्क झाल्यानंतर आरोपी रविंद्र गोंधे याने दि.1 जुन 2020 रोजी पिडीत मुलीला मोटारसायकलवर मागे बसवले व घारगाव येथील पुलाखाली सोडुन दिले. त्यानंतर पिडीत मुलगी घरी आली व घडलेला प्रकार आपल्या कुटुंबाला सांगितला.
दरम्यान, हा सर्व पाहिल्यानंतर पिडीत मुलीच्या नातेवाईकांचा राग अनावर झाला. त्यांची तळपायाची आग मस्तकापर्यंत गेली. त्यांनी आरोपीला पाठीशी न घालता घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर, पोलिसांनी खबरदारी घेऊन घटनास्थळ गाठले. तात्काळ घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांनी सर्व ईव्हीडन्स गोळा केले. हा खटला 2020 ते 2024 या काळात सुरू राहिला. यामध्ये आठ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांनी अनेक सबळ पुरावे व परिस्थिती जन्य पुरावे न्यायालयात सादर केले होते. त्याच्या आधारावरजिल्हा सरकारी वकील जयंत दिवटे यांनी प्रबळ युक्तीवाद करून प्रतिवाद्यांचा युक्तिवाद खोडुन काढला. त्यानंतर दोन्हीही पक्षाचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी रविंद्र वसंत गोंधे (रा. खालची माहुली, नांदूरखंदरमाळ, ता. संगमनेर) यास वीस वर्षे सक्त मजुरी व 25 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.