अखेर उत्कर्षा रुपवते वंचितच्या उमेदवार, लोखंडे जोमात, वाकचौरे कोमात.! जय पराजय वंचित ठरविणार.!

  

- सागर शिंदे

सार्वभौम (अकोले) :- 

 शिर्डी लोकसभा मतदार संघात यंदा तिहेरी लढत पहायला मिळणार आहे. उबाठा कडून पुर्वीचे बंडखोर भाऊसाहेब वाकचौरे, शिंदे गटाकडून आत्ताचे गद्दर सदाशिव लोखंडे आणि वंचित कडून कॉंग्रेसच्या बंडखोर उत्कर्षाताई रुपवते अशी लढत होणार आहे. गेल्या महिनाभरापासून कॉंग्रेसला आल्टीमेट देऊ पाहणार्‍या रुपवते यांनी अखेर  कॉंग्रेसच्या सर्व पदांचा राजिनामा देऊन वंचितमध्ये प्रवेश केला आणि आपली उमेदवारी देखील फायनल केली आहे. त्यामुळे, भाऊसाहेब वाकचौरे यांना हा फार मोठा धक्का बसला असून लोखंडे यांच्या मनात लड्डू फुटू लागले आहेत. अर्थात रुपवते यांच्या उमेदवारीने महाविकास आघाडीतील मते फुटणार असून वाकचौरे यांना जे लिड मिळणार होते. ते बहुतांशी कमी होणार आहे. मतांचे विभाजन हे लोखंडे यांच्या पारड्यात पडून जो मतांचा बॅकलॉक दिसून येत होता. तो कदाचित भरुन निघू शकतो. किंवा २०१९ च्या औरंगाबाद निवडणुकीप्रमाणे वंचित देखील येथे बाजी मारु शकते असे एकंदर चित्र सध्या दिसत आहे.

खरंतर उत्कर्षाताई रुपवते यांच्यापेक्षा बाबुजी हेच विधानसभा किंवा लोकसभेत जाणे अपेक्षित होते. मात्र, कॉंग्रेसने त्यांना योग्य न्याय दिला नाही आणि बाबुजींना देखील कधी बंड केले नाही. त्यानंतर मात्र पिढी बदलली आणि उत्कर्षाताई रुपवते यांनी बंडाचे निशाण हाती घेतले. कॉंग्रेसने विचार करावा असे त्या वारंवार सांगत होत्या. कारण, हे दोन्ही उमेदवार जनतेला मान्य नव्हते. भाऊसाहेब वाकचौरे हे केवळ पर्याय म्हणून जनतेने स्विकारले. कारण, जनतेला आता लोखंडे नको होते. त्यामुळे, महाविकास आघाडीकडून योग्य चेहरा दिला असता तर वन साईड शिर्डीची जागा आली असती, हे त्यांचे मत निर्विवाद सत्य होते. मात्र, एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असणारा नगर जिल्हा आणि आज एक सुद्धा जागा नगर जिल्ह्यात कॉंग्रेसला अर्थात बाळासाहेब थोरात यांना आणता आली नाही हे दुर्दैव आहे. ही टिका विखेंनी केली असली तरी ती वास्तव आहे. राज्याचे नेतृत्व करताना थोरात संगमनेरपुरते मर्यादीत राहिले. त्यांना जिल्ह्यात कधी जबाबदारी घेता आली नाही आणि त्यांनी कधी घेतली नाही. त्यामुळे, अनेक सक्षम कार्यकर्त्यांवर अन्याय झाला. त्यात उत्कर्षाताई, बाबुजी यांच्यासह अनेकांचा सामावेश होईल.

असो..! रुपवते यांनी वंचितमध्ये प्रवेश केल्यानंतर शिर्डी लोकसभेचे गणित कसे असू शकते? याबाबत अनेक तज्ञ व्यक्तींशी चर्चा केल्यानंतर फारसे विसंगत उत्तरे मिळाली नाही. रुपवते यांच्या उमेदवारीने सदाशिव लोखंडे यांना मोठी मदत होईल आणि भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हक्काच्या मतांचे विभाजन होईल अशा प्रकारचा सुर आला. अर्थात यापेक्षा वेगळे काही होणार नाही. मात्र, रुपवते यांना वाटते तितके हलक्यात घेता येणार नाही. जसे २०१९ मध्ये वंचितच्या संजय सुखदान यांना घेतले होते तसे. कारण, रुपवते यांचे नेटवर्क बर्‍यापैकी आहे, त्यात कॉंग्रेसची मते, मुस्लिम मते, वैयक्तीक संपर्क, वंचितची मते, बहुजन शिक्षण संघ, सुशिक्षित उमेदवार, भावनिक लाट, आणि बौद्धांचे मतदान यांच्या जिवावर रुपवते यांची नैय्या किमान स्पर्धेत टिकून राहणार आहे. मात्र, ती विजयाच्या उंबरठ्यावर जाईल की नाही यात शंका आहे. परंतु, एक बाकी नक्की, कोणाला विजयी करायचे आणि कोणाला पाडायचे एवढे सामर्थ्य या उमेदवारीत नक्की आहे. त्यामुळे, मात्तब्बर राजकारणी, धनबलाढ्य उमेदवार आणि राष्ट्रीय पक्ष यांना शह देताना अंतीमत: रूपवते यांच्या नाकीनव येणार हे सुद्धा पहायला मिळणार आहे.

खरंतर, प्रकाश आंबेेडकर यांची २००९ पासून वंचित म्हणून जी भुमिका राहिली आहे. ती, फक्त भाजपाला मदत होईल अशीच राहिली आहे. त्यामुळे भाजपाची बी टिम म्हणून त्यांच्यावर आरोप झाले. त्यानंतर तरी २०१४ मध्ये ते भुमिका बदलतील असे वाटत होते, मात्र तसे झाले नाही. २०१९ मध्ये सुद्धा त्यांच्या ताठर भुमिकेमुळे भाजपा सत्तेत बसला. मग भाजपा नको म्हणायचे आणि २० वर्षे त्यांना पुरक ठरेल अशी भुमिका घ्याची हाच निर्णय आता वंचितच्या लोकांना देखील खटकू लागला आहे. म्हणून तर २००९ ते २०२४ या काळातील विचार केला. तर, वंचितचे मतदान आणि चाहता वर्ग ३० ते ४० टक्के कमी झाला आहे. अगदी प्रकाश आंबेडकरांना अकोला आणि सोलापूर अशा दोन्ही जागेहून पराभूत करण्याइतपत लोकांची नाराजी वाढली आहे. त्यामुळे, २०२४ ला देखील वंचितने जी ताठर भुमिका घेतली त्यावर आज देखील राज्यातील लाखो लोक नाराज असल्याचे दिसते आहे. आता या भुमिकेचा तोटा उत्कर्षा रुपवते यांना बसणार नाही असे म्हणणे फार धाडसाचे ठरेल.

मुळात नगर जिल्ह्यात वंचितचे वलक केवळ भावनिक तत्वावर आधारलेले आहे. कारण, प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेबांचे नातू आहेत. अन्यथा शिर्डी मतदारसंघात तरी वंचित असो किंवा रिपाई बहुतांशी नेते हे विखे पाटील यांच्याशी निगडीत आहेत. अंतीमत: काय होते हे अनेकदा पहायला मिळाले आहे. त्यामुळे, कॉंग्रेसचा हात सोडून नव्याने राजकीय संसार मांडणार्‍या रुपवते यांना त्यांच्याच गटातील लोक शेवटपर्यंत किती साथ देतील याबाबत अनेकांना शंका आहे. जरी तसे झाले नाही. तरी, कोपरगाव आणि श्रीरामपूर येथून वंचित म्हणून त्यांना बर्‍यापैकी मदत होईल. बौद्ध मतदार देखील त्यांच्या पाठीशी उभे राहतील. मात्र, बहुतांशी ख्रिश्‍चन, मराठा, आदिवासी आणि अन्य समाजापर्यंत वंचितचे चिन्ह पोहचविता-पोहचविता निवडून निघुन जाईल. इकडे अकोले तालुक्यात मात्र कॉंग्रेस आणि बौद्ध समाज त्यांच्या पाठीशी खंबिरपणे उभा राहिल. त्याचा तोटा पुर्णत: भाऊसाहेब वाकचौरे यांना सोसावा लागणार आहे. इतकेच काय.! अकोले आणि संगमनेरात कॉंग्रेस देखील अंतर्गत फुटलेली दिसेल आणि जसे रामदास आठवले यांना ३० हजार मते संगमनेरमध्ये कमी होती तेव्हा बाळासाहेब थोरात उघडे पडले तसे चित्र संगमनेरात देखील दिसू शकते. मात्र, आदिवासी भागात रुपवते हे चेहरा आणि चिन्ह रुजविणे वाटते तितके सोपे नाही. त्यासाठी मारुती मेंगाळ किंवा डॉ. लहामटे, पिचड आणि भांगरे यांच्याशी तडजोडी केल्या तरच या गोष्टी शक्य आहे.

एकंदर, रुपवते यांची उमेदवारी जरी सक्षम आणि प्रबळ असली. तरी, वंचितने घेतलेली ताठर भुमिका जी भाजपाला अदृश्यरित्या मदत होईल ही अनेक सुज्ञ मतदारांना मान्य नाही. शिर्डीत वंचित पेक्षा रिपाईचे बळ चांगले आहे. मात्र, वंचितला मोठे करणे, त्यांची ताकद वाढविणे, स्पर्धेत ठेवणे हे त्यांना मान्य होणार नाही. त्यामुळे, विजय वाकचौरे, भिमा बागुल, दिपक गायकवाड हे मदत करतील असे वाटत नाही. त्यामुळे, बौद्ध समाजास मिळालेली उमेदवारी म्हणून बाकी रुपवते यांना सहानुभूति मिळु शकते. मात्र, त्यांच्या उमेदवारीने भाऊसाहेब वाकचौरे यांना एक ते दिड लाख मतांची पुन्हा गोळाबेरीज करावी लागणार आहे. अन्यथा लोखंडे यांच्यासोबत जितका विजय सोपा होता. त्यापेक्षा आता अधिक पटीने तो अवघड झाला आहे. आता येणार्‍या काळात रुपवते बुथ नियोजन, निवडणुकीसाठी लागणारा खर्च, प्रचार आणि चिन्हाचा प्रसार कसा करतात यावर बरेच काही अवलंबून आहे.