शेततळ्यात बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू, दोघे सख्खे भाऊ, बापाचेही छत्र हरपले होते.! हिवरगाव मध्ये शोककळा.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे पाटाच्या कडेला खेळण्यासाठी गेलेल्या दोन सख्या भावांचा शेततळ्यात पडुन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज बुधवार दि.17 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास घडली. यात रितेश सारंगधर पावसे (वय 12 वर्षे, रा. हिवरगाव पावसा, ता. संगमनेर) प्रणव सारंगधर पावसे (वय 8 वर्षे, रा. हिवरगाव पावसा, ता. संगमनेर) या दोन चिमुरड्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही बाब काही स्थानिक लोकांनी पाहिली असता त्यांनी तालुका पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. एक वर्षे उलटत नाही तेव्हा वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर आज पुन्हा दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्याने या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दोघे ही भाऊ हिवरगाव पावसा येथील शाळेत शिक्षण घेत होते. मोठा रितेश हा इयत्ता 5 वी मध्ये शिक्षण घेत होता तर लहान प्रणव हा इयत्ता 3 री मध्ये प्राथमिक शाळेत शिक्षण घेत होता. वडिलांचा एक वर्षापूर्वी मृत्यू झाल्याने वडिलांचे छत्र हरपले होते. त्यामुळे, आई फार कष्टाने शेती करून आपला उदरनिर्वाह करत मुलांचा सांभाळ करत होती. आज बुधवार दि. 17 एप्रिल रोजी रामनवमी असल्याने मुलांना शाळेला सुट्टी होती. त्यामुळे, ते दुपारी जेवण करून घराबाहेर खेळण्यासाठी आले.
दरम्यान, ते सायकलवर खेळत घरापासुन काही अंतरावर असलेल्या पाटाच्याकडेला आले. तिथे जवळचे नातेवाईक होते. हे दोघे भाऊ तेथे खेळत आले. तेथे काही अंतरावर असणाऱ्या घरी सायकल लावली. ते खेळत- खेळत आपल्या नातेवाईकांकडे गेले. तेथे जवळच्या नातेवाईकासोबत बोलले. त्यानंतर ते पुन्हा खेळत - खेळत शेततळ्याच्या शेजारी आले. खेळता- खेळता पाय घसरला असावा आणि दोघेही शेततळ्यात पडले. शेततळ्यात पाणी मोठ्याप्रमाणात असल्याने त्यांना ठाव लागला नाही. पाणी नाका तोंडात गेले. दोघांनी आपल्या प्रयत्नांना पूर्णविराम दिला. दरम्यान काही काळानंतर हा प्रकार मळ्यातील लोकांनी पाहिला. पाण्यावर चप्पल तरंगताना दिसत होत्या.
दरम्यान, चप्पल दिसल्याने मळ्यातील सर्व लोक शेततळ्याकडे आले. सर्वांनी शर्तीचे प्रयत्न सुरू केले. मात्र, पाणी मोठ्या प्रमाणात असल्याने दोघाही मुलांनी तळ गाठला होता. गावकऱ्यांनी एका मुलाला बाहेर काढले. मात्र, दुसऱ्याचा शोध लागेना. त्यामुळे तत्काळ गोताखोर बोलवले. त्यांनी दोन्ही मुलांना पाण्याच्या बाहेर काढले. तर तत्काळ उपचारासाठी रुग्णलयात नेले. मात्र, तो पर्यंत फार उशीर झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून पुढील प्रक्रिया सुरू आहे.