वाकचौरेंची मशाल रुपवतेंच्या प्रेशर कुकरला तापविणार, शिट्टी मात्र लोखंडेंची वाजणार.! कुकरचा चटका बसणार की एकाची डाळ शिजणार.!

    

- सागर शिंदे
सार्वभौम (अकोले) :- 
 शिर्डी लोकसभा मतदार संघात पुर्वी भाऊसाहेब वाकचौरे आणि सदाशिव लोखंडे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, आता लोखंडे यांचे नाव देखील कोणी घेताना दिसत नाही. तर, रुपवते आणि वाकचौरे यांच्यात चांगलीस चुरस होईल असे राजकीय वातावरण दिसत आहे. त्यात वाकचौरे यांची मशाल (चिन्ह) रुपवते यांच्या प्रेशर कुकरला (चिन्ह) उष्णता देणार असून शिट्टी मात्र लोखंडे यांची वाजणार अशी प्रकारची राजकीय वाफ शिर्डी मतदारसंघात पसरताना दिसत आहे. कारण, गेल्या काही दिवसांपासून शिर्डी मतदारसंघात फक्त वाकचौरे आणि रुपवते यांच्या नावाची चर्चा सुरू असून लोखंडे हे मतक्रमांकात तीन नंबरला जातील असे अनेक तज्ञ व्यक्तींचे मत आहे. त्यामुळे, येणार्‍या काळात प्रेशर कुकरचा चटका दोघांना बसतोय. की, दोघांपैकी एकाची डाळ प्रेशर कुकरमुळे शिजते हे येणार्‍या ४ जून रोजी समजणार आहे.
खरतर सदाशिव लोखंडे १० वर्षे खासदार राहिले. त्यामुळे, त्यांच्या संपर्कात न आलेले हजारो कार्यकर्ते आणि लाखो सामान्य मतदार नाराज आहेत. तसेही सलग तिसर्‍यांदा त्यांना निवडून द्यावे असे त्यांचे कोणतेही उल्लेखनिय काम नाही. अगदी निळवंडे धरणाचे श्रेय्य लोटले जाते ते सुद्धा नाही. त्यामुळे, जनतेत त्यांच्या विषयी रोष नाही पण नाराजी आहे. त्यामुळे, २००९ मध्ये खासदार म्हणून नेमलेल्या वाकचौरे यांना लोकांनी पर्याय म्हणून निवडले होते. परंतु २०१४ नंतर २०१९ साली जसा लकी ड्रॉ लोखंडे यांना लागला, तसा पुन्हा २०२४ ला सुद्धा लागेल असे गोड गैरसमज त्यांचा आहे. त्यामुळे, त्यांनी शिंदे दरबारी अग्रह धरुन तिकीट मिळविण्याची कसरत केली. मात्र, ज्या पद्धतीने त्यांनी नियोजन करायला हवे होते. आमदार, सहकारातील नेते, पदाधिकारी, शिक्षण संस्थानिक यांना एकसंघ बांधून चर्चा करायला पाहिजे, विश्‍वासात घ्यायला पाहिजे असे काम त्यांना करता आले नाही. त्यामुळे, राज्यातील हितसंबंध जोपासण्यासाठी नेते त्यांच्या सोबत राहतील. मात्र, कार्यकर्ते रुपवते आणि वाकचौरे यांच्या मागे जाताना दिसत आहे हे नाकारुन चालणार नाही.
खरंतर भाऊसाहेब वाकचौरे यांनी २०१४ मध्ये फार मोठी चुक केली होती. त्याचे फळ ते आजही भोगत आहे. यांच्या चुकीमुळे तर मुंबईचे पार्सल शिर्डीत आले. आता त्यांच्या चुका यांना दिसू लागल्या आहेत. मात्र, त्यांनी केलेल्या चुका त्यांनाच दिसत नाही. हे म्हणजे असे झाले. की, आपले ठेवायचे झाकुन अन दुसर्‍याचे पहायचे वाकून.! त्यामुळे, लोकांनी आता वाकचौरे यांना देखील पर्याय म्हणून ठेवले असून उत्कर्षा रुपवते यांनी प्रचारात मुसंडी घेतली आहे. खरंतर, वाकचौरे म्हणतात मी सुशिक्षित उमेदवार आहे. त्यामुळे, मला निवडून द्या. मात्र, त्यांनी अकोले सारख्या दुर्गम भागात आरोग्याच्या सुविधा, उच्च शिक्षणाच्या सुविधा, रस्ते, घाटमाथ्याचे पाणी, शेती, तरुणांना रोजगार, पर्यटन अशा कोणत्याही गोष्टींना प्राधान्य दिले नाही. केवळ साभामंडप आणि मंदिरे बांधणे म्हणजे विकास नव्हे. हे त्यांनी स्वत: समजून घेतले पाहिजे.
भाऊसाहेब वाकचौरे यांचे २००९ मधील काम चांगले आहे. तुलनात्मक लोखंडे यांच्यापेक्षा. त्याच बरोबर राज्यात ज्या पद्धतीने शिंदेंनी ठाकरेंच्या आणि दादांनी काकांच्या पाठीत खंजिर खुपसला त्याचे शल्य सामान्य मतदारांना आज देखील आहे. म्हणून तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत जी भावनिक लाट मध्यमवर्गात आहे ती फार मोठी आणि महाविकास आघाडीला तारक ठरणारी आहे. म्हणून भाऊसाहेब वाकचौरे यांचे नाव चर्चेत आहे. कदाचित कॉंग्रेस किंवा शिवसेनेतून रुपवते यांना उमेदवारी मिळाली असती. तर, दोन ते तीन लाख मतांनी रुपवते यांचा विजय झाला असता. कारण, गद्दारीचा शिक्का नसता, उच्चशिक्षित उमेदवार होत्या, राजकीय व सामाजिक वारसा होता. मात्र, त्यांचे हे मोठेपण कॉंग्रेसला तथा थोरातांना सोसवले नसते. म्हणून त्यांनी फारसा अट्टाहास धरला नाही. आज देखील त्यांचे कार्यकर्ते व पदाधिकारी खुलेआम रुपवते यांच्या प्रचारात दिसून येत आहेत. त्याचा फटका वाकचौरे यांना शंभर टक्के बसणार आहे. म्हणून तर प्रेशर कुकरचा चटका वाकचौरे यांना बसेल असे राजकीय लोक म्हणू लागले आहे.
एकंदर, राजकीय वातावरण पाहता शिर्डी मतदार संघात कोपरगाव, अकोले, संगमनेर, श्रीरामपूर अशा अन्य काही ठिकाणी रुपवते यांनी चांगला जम बसविला आहे. काल वंचितकडून चर्चेत सुद्धा नसणारे नाव आज दुसर्‍या स्थानी असल्याचे बोलले जात आहे. कदाचित बौद्ध, ख्रिश्‍चन व बहुजन मतदारांनी त्यांना अधिक सपोर्ट केला. तर, त्यांच्यासाठी चांगले वातावरण निर्माण होऊ शकते. काल त्यांनी मराठा क्रांतीयोद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. जरांगे पाटलांनी यापुर्वीच सांगितले आहे. जो उमेदवार चांगला असेल, निष्कलंक असेल, सुशिक्षित आणि वैचारिक असेल त्यांना मतदान करा. मग तो कोणत्या पक्षाचा आहे याचा विचार करु नका. त्यामुळे, रुपवते ह्या त्या चौकटीत बरोबर बसतात. मग, मराठा बांधवांनी जर जरांगे पाटलांच्या वाक्याचा अर्थ समजून मतदान केले. तर, नक्कीच रुपवते यांना मतदार तारल्याशिवाय राहणार नाही. आज शिर्डी मतदार संघात वातावरण वेगळे आहे. उद्या त्यात बदल होऊ शकतो, मतदान होईपर्यंत काय काय बदल घडतात हे सांगणे कठीण आहे. मात्र, तुर्तास तरी भाऊसाहेब वाकचौरे आणि उत्कषा रुपवते यांच्या चुरस असल्याचे दिसते आहे.