डॉ.आंबेडकरांच्या दोन पराभवाचा बदला वंचित घेणार.! त्यासाठी शिर्डीत बाबासाहेबांची लेकरं प्रकाश आबेडकरांना साथ देणार का?

    

- सागर शिंदे

सार्वभौम (अकोले) :- 

 तो काळ १९५१-५२ चा होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिल्यानंतर पहिल्यांदाच लोकसभेच्या निवडणुका लागल्या होत्या. त्यात कॉंग्रेसने सांगितले होते. की, आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात उमेदवार देणार नाही. मात्र, तेव्हाचे सदोबा पाटील यांनी कॉंग्रेसकडून नारायनराव काजरोळकरांना उमेदवारी दिली आणि विशेष लक्ष घालुन बाबासाहेबांना १४ हजार मतांनी पराभूत केले. इतकेच काय.! त्यानंतर १९५४ साली भंडारा येथे पोटनिवडणुक लागली तेव्हा देखील बाबासाहेब उभे राहिले आणि कॉंग्रेसने उमेदवार देऊन त्यांना पराभूत केले. त्यानंतर बाबासाहेब राज्यसभेवर गेले खरे. मात्र, त्यांचे लोकसभेवर निवडून जाण्याचे स्वप्न अपुर्ण राहिले. आता त्याचा बदला वंचित आघाडीच्या रुपाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नातू प्रकाश आंबेडकर घेणार अशी चर्चा सध्या सोशल मीडियात जोरदार सुरु आहे. कारण, शिर्डी मतदार संघात बौद्धांची मते तीन लाखांच्या जवळपास आहे. ज्या कॉंग्रेसने बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून ते प्रकाश आंबेडकर यांची राजकीय अवहेलना केली त्यांना धडा शिकवायचा आहे. त्यासाठी, तर उत्कर्षा रुपवते यांना निवडून देऊन भाऊसाहेब वाकचौरे यांना पराभूत करावे आणि कॉंग्रेसला धडा शिकवावा अशी जोरदार चर्चा सध्या सुरु आहे.

२६ नोव्हेंबर १९४९ साली संविधान लागू झाले. त्यानंतर सन १९५२ साली भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका लागल्या. त्यापुर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदु कोडबिल लागू होत नाही म्हणून कायदेमंत्रीपदाचा राजिनामा दिला होता. त्यानंतर कॉंग्रेसने जाहीर केले होते. की, आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात उमेदवार देणार नाही. मात्र, दि. २५ ऑक्टोबर १९५१ ते २१ फेब्रुवारी १९५२ ही चार महिने निवडणुकांचा काळ होता. तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वत:च्या शेड्युल कास्ट फेडरेशन या पक्षाकडून उत्तर मुंबईतून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, कॉंग्रेसने त्यांचा शब्द फिरविला आणि नारायनराव काजरोळकर यांचा अर्ज भरला. तेव्हा सर्व समाज बाबासाहेबांच्या पाठीशी उभा होता. मात्र, कॉंग्रेसची फार मोठी चलती होती, मराठा, गुजराती, मारवाडी, व्यापारी असा फार मोठा मतदार त्यांच्या पाठीशी उभा होता. तेव्हा बाबासाहेबांना पराभूत करण्यासाठी कॉंग्रेसचे सदोबा पाटील यांनी स्वत:ची प्रतिष्ठा पणाला लावली होती. तेव्हा बाबासाहेबांनी शिवाजी पार्कवर सभा घेतली तर ३ लाखांपेक्षा जास्त लोक सभेला होता. मात्र, जेव्हा मतदान झाले आणि निकाल हाती आला. तेव्हा नारायनराव काजरोळकरांना १ लाख ३८ हजार १३७ मतदान तर डॉ. आंबेडकर यांना १ लाख २३ हजार ५७६ मते होती. अवघ्या १४ हजार मतांनी बाबासाहेबांचा पराभव करुन कॉंग्रेसने विजय जल्लोष साजरा केला होता. म्हणून तर आज देखील ऍड. प्रकाश आंबेडकर हे कॉंग्रेस सोबत हात मिळवत नाहीत असे म्हटले जाते.

कॉंग्रेसना बाबासाहेबांना पराभूत करण्याची एकही संधी सोडली नाही. १९५२ च्या निवडणुकीनंतर १९५४ मध्ये भंडारा (आजचा गडचिरोली) येथे पोटनिवडणुक लागली होती. तेव्हा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकसभेवर निवडून जाण्याची इच्छा व्यक्त केली आणि २१ एप्रिल १९५४ पासून तेथे प्रचार सुरू केला. त्यांच्या सोबत समाजवादी पक्षाचे अशोक मेहता हे देखील उभे होते. (पुर्वी एकाच मतदार संघातून दोन उमेदवार निवडून दिले जात होते) तर कॉंग्रेसने बाबासाहेबांच्या विरोधात भाऊराव बोरकर यांना उमेदवारी दिली होती. दुर्दैवाने तेथे देखील बाबासाहेबांचा ८ हजार ३८१ मतांनी पराभव झाला होता. विशेष म्हणजे बाबासाहेबांच्या सोबत असणारे मेहता निवडून आले होते. मात्र, कॉंग्रेसने बाबासाहेबांना पराभूत करण्यासाठी किती आकाश पाताळ एक केले असेल याचा विचार करण्याची देखील गरज नाही. इतके सुट्टे हे गणित आहे. दुर्दैवाने लोकसभेवर निवडून जाण्याचे स्वप्न हा महामानवाचे अपुर्ण राहिले. त्यानंतर दोन वर्षानंतर बाबासाहेब अनंतात विलिन झाले.

खरंतर, बाबासाहेबांची उभी हयात कधी ब्राम्हणी व्यवस्थेच्या अनिष्ठ चाली रिती आणि परंपरांच्या विरोधात लढण्यात गेली. तर, कधी जातीयतेचे चटके खात प्रचंड शारिरीक व मानसिक त्रास सोसण्यात गेली. भारताचे संविधान लिहून देखील हा निर्माता लोकसभेत जाऊ शकला नाही किंवा लोकसभेत यांना जाऊ दिले गेले नाही. हे म्हणजे किंती आत्मिक चिड म्हणावी लागेल. जेव्हा संसदेला बाबासाहेबांची गरज पडली तेव्हा इच्छा नसतानाही त्यांना राज्यसभेवर घेऊन संसदेत घ्यावे लागले ही बौद्धीक पातळी आणि पात्रता बाबासाहेबांची होती. हे असले कॉंग्रेसचे कारणामे ऐकल्यानंतर उभी हयात पंजाला तथा कॉंग्रेसला मत देऊ नये अशी मानसिकता होते. म्हणून तर कधीकधी वाटते, भलेही वंचितचा फायदा भाजपाला होतो असे आरोप होतात. मात्र, ते आरोप करणारे लोक सुद्धा कॉंग्रेसवालेच असतात. त्यामुळे, ज्यांनी बाबासाहेबांच्या शेड्युल कास्ट फेडरेशन पक्षाला कमी लेखले त्यांचा एक उमेदवार बाबासाहेबांनी पाडला होता. तसेच ज्यांनी ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितला कमी लेखले त्यांचे कैक आमदार आणि खासदार यांनी पाडले. असे म्हणतात की इतिहासाची पुनरावृत्ती होते. ती आज शेड्युल ते वंचित या पक्षांच्या माध्यामातून होताना दिसत आहे.

एकंदर, भाऊसाहेब वाकचौरे हे कॉंग्रेसचे माजी नेते व सध्या कॉंग्रेस प्रणित उमेदवार आहेत. त्यांचा पराभव करुन खर्‍या अर्थाने बाबासाहेबांच्या पराभवाचा बदला घेण्याची ही नामी संधी असल्याचे बोलले जात आहे. ज्या कॉंग्रेसने बाबासाहेबांना रोखले, मरतेवेळी लोकसभेत जाण्याचे स्वप्न साकार होऊ दिले नाही. आज शिर्डी लोकसभा मतदार संघात बाबासाहेबांची लेकरं मोठ्या संख्येने आहे. येथील जयंत्या बाबासाहेबांना डोक्यावर घेऊन नाचविल्या जातात. मात्र, आता बाबासाहेबांच्या पराभवाचा बदला डोक्यात घेऊन त्यांचा नातू प्रकाश आंबेडकर यांना साथ देऊन तो बदला घेण्याची वेळ आली आहे असे मत वंचितच्या कार्यकत्यांकडून व्यक्त केले जात आहे. त्यामुळे, आता ही लेकरं ठरविणार आहेत. की, नोटांवर समाधान मानायचे की, बदला घेऊन समाधान मानायचे.!!