पतीचं दुसरं लफडं पकडताच पत्नीने जीवन संपविले, अकोल्याच्या मुलीची संगमनेरात आत्महत्या.! सासर्याची फिर्याद जावई आरोपी.!
पतीच्या वाढदिवसाच्या दिवशी तो येईपर्यंत पत्नी जागी होती. रात्री १२ वाजता तो आला असता ती म्हणाली, चला तुम्हाला ओवाळते. त्यावर तो म्हणाला मला तिच्याकडे जायचे आहे आणि तिच्याच हातून ओवाळायचे आहे. त्यावर दोघांमध्ये भांडणे झाली. रोजचा वाद, पतीचे असले वागणे आणि मारहाण यामुळे वैतागलेल्या पत्नीने रात्री गळफास घेऊन स्वत:ला संपवून घेतले. ही धक्कादायक घटना दि. २४ मार्च २०२४ रोजी संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोड, सुकेवाडी येथे पहाटेच्या सुमारास घडली. यात रिना राजेंद्र हाडवळे (रा. लिंगदेव, ता. अकोले, जि. अ.नगर) हिचा मृत्यू झाला आहे. तर याप्रकरणी राजेंद्र ज्ञानदेव हाडवळे याच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी. की, राजेंद्र हाडवळे हा बीएसएफमध्ये भर्ती झालेला होता. मात्र, दारूचे व्यसन लागल्यामुळे त्याने नोकरी सोडून दिली होती. तो घरीच असल्यामुळे त्याचे पत्नीशी कायम वाद होत होते. तो तिला मारहाण करुन प्रचंड त्रास देत होता. त्यामुळे रिना माहेरी निघून गेली होती. कालांतराने राजेंद्र हाडवळे हा देखील संगमनेर येथील कोल्हेवाडी रोड येथे राहण्यास आला होता. दोघांमध्ये समझोता झाला आणि त्यानंतर राजेंद्र हा टोलनाक्यावर गणमॅन म्हणून कामाला लागला. मात्र, दारुचे व्यसन काही सुटले नव्हते. त्यामुळे, कधी वाद तरी कधी घरात राडा सुरूच होता. या सगळ्या गोष्टीला रिना वैतागून गेली होती. मात्र, घरात एक मुलगी असल्यामुळे तिने फार मोठा संयम ठेवला होता.
दरम्यान, सासर्याकडे आल्यानंतर राजेंद्र हाडवळे यास त्यांनी घर घेऊन दिले आणि ते नावावर देखील करुन दिले होते. मात्र, काम करुन देखील रीनाकडून दारुसाठी पैसे मागणे याने सोडले नव्हते. ती माऊली शिलाई मशिन आणि छोटेसे किराणा दुकान चालवून घरचा प्रपंच चालवत होती. राजेंद्र हाडवळे म्हणत होता. की, तुझ्या बापाने मला लग्नात काहीच दिले नाही, तु मुलीकडे चांगले लक्ष देत नाही, तुझ्या बापाच्या संपत्तीत तू हक्क माग, तसा हक्कसोड करु नको. अशा प्रकारची मागणी करीत तो पत्नीला त्रास देत होता. या दरम्यान राजेंद्र हा त्यांच्या घराजवळ राहणार्या एका मुलीच्या नादाला लागला होता. तिच्याशी कायम फोनवर बोलणे, व्हाट्ऍपवर चॅटींग करणे असे प्रकार तो करत असल्यामुळे घरात वाद होत होते. त्यावर सोल्युशन म्हणून यांनी कौटुंबिक बैठक बोलविली आणि त्या मुलीसह जावयास देखील समज देण्यात आली होती. त्यानंतर यांच्यातील वाद काही काळ थांबले होते.
दरम्यान, राजेंद्र हाडवळे याचा वाढदिवस होता. तेव्हा तो रात्री उशिरा आला होता. तोवर रिना जागीच होती. तो आल्यानंतर ती म्हणाली. की, चला उशिरा का होईना आपण तुमचा वाढदिवस साजरा करु. मी तुम्हाला ओवाळायला ताट करते. तेव्हा राजेंद्र म्हणाला. की, मला माझ्या मोनाच्या हातून वाढदिवस साजरा करायचा आहे. मला तुझ्या हातून ओवाळायचे नाही. या दोघांतील संबंधांमुळे घरात कायम वाद होत होते. राजेंद्रने चांगली नोकरी सोडून दिली, त्यात दारूचे व्यसन लागले, काम धंदा गोड लागत नव्हता, दोन ठिकाणी त्याची चुकीची वागणूक लक्षात आली होती. तरी पत्नी संभाळून घेत होती. रोज दारु पिवून राडा, मारहाण, शिविगाळ यास रिना कंटाळून गेली होती. त्यामुळे, तिने त्याच दिवशी घरातील छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर संपत काळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राजेंद्र हाडवळे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.