आंबेडकरांची ताठरता आणि आठवलेंची बुळगी भुमिका समाजला घातक.! विखेंना धडा शिकविण्यासाठी नेत्यांचे पक्षाविरोधात बंड.!

     

- सागर शिंदे

सार्वभौम (अकोले) :- 

समाज एकसंघ होऊन पाठीशी उभा राहिला म्हणून आठवले अनेक वेळा मंत्री आणि खासदार होऊ शकले. मात्र, नंतरच्या काळात त्यांनी सत्तेला प्राधान्य दिले आणि समाजाला दुय्यम स्थानी ठेवून स्वत:चे भागले म्हणजेच समाजाचे सुद्धा भागले असे समिकरण तयार केले. त्यामुळे, राज्य असो वा केंद्रातील नेते यांनी देखील समाज ग्राह्य धरुन आठवलेंना कोठेतरी हलकी जागा द्यायची आणि समाजाला न्याय दिला अशा वल्गना करायची. त्यामुळे, असल्या बुळग्या भुमिकेमुळे त्यांच्या कार्यकत्यांना व दुय्यम फळीतील नेत्यांना कोठेच संधी मिळाली नाही. दुसरीकडे आठवले व अन्य नेत्यांना कंटाळून समाज ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी खंबिरपणे उभा राहिला. मात्र, त्यांनी देखील २००९ पासून ते अगदी २०२४ पर्यंत प्रचंड ताठर भुमिका घेतली. त्यामुळे, त्यांनी देखील भाजपालाच मदत होईल अशी भुमिका घेऊन नकळत बी टिमची भुमिका बजावली असे वाटू लागले. कारण, स्वत:चे अस्तित्व दाखविण्यासाठी एक निवडणुक पुरेसी होती. मतेही चांगली पडतात, मात्र एकही उमेदवार निवडून येत नाही. हे लक्षात येऊन देखील वारंवर भाजपाला सहकार्य होईल अशी भुमिका घेणे कितपत योग्य आहे? म्हणून आता वंचितला देखील मतदान करावे की नाही? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या सगळ्यात मात्र, आठवलेंना उमेदवारी मिळाली नाही. म्हणून खुद्द विखे पाटील यांच्या विरोधात रिपाई नेते विजय वाकचौरे हे उमेदवारी करणार आहेत. त्यामुळे, हे बंड क्षमते की पेटते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

खरंतर नाराजीची गोष्ट अशी. की, राज्यात आणि केंद्रात बौद्धांना उमेदवारी नाकारली जाते. का? तर म्हणे दगडापेक्षा विट मऊ.! पण, यात विजय वाकचौरे, श्रीकांत भालेराव, अशोक गायकावाड, सुरेंद्र थोरात, भिमा बागुल, दिपक गायकावाड यांच्यासारखे अनेक नेते आहेत. ज्यांना साधी जिल्हा परिषद देखील मिळाली नाही. का? तर केवळ नेत्याच्या स्वार्थी धोरणामुळे. आठवले यांनी स्वत:ला काहीतरी पद मिळाले की सरकार किंवा मित्रपक्षावरील दबाव सोडून द्यायचा. जेथे समाजाचे प्रश्‍न मांडायचे तेथे कविता करत बसायच्या. त्यामुळे, सगळा पक्ष चारोळ्या गाण्यात दंग आणि नेते व कार्यकर्ते मात्र, प्रचंड हालाखीत जिवण जगताना दिसत आहेत. म्हणजे, एकीकडे लोकसभेच्या सात जागा मागणार्‍या प्रकाश आंबेडकरांना सहा जागा देऊन देखील त्यांनी तोडतोड केली नाही. तर, दुसरीकडे दोन जागा मागून देखील साधी एक जागा सुद्धा देण्याची मानसिकता भाजपाची झाली नाही. इतकं अदखलपात्र त्यांनी रिपाईला केले आहे. तरी देखील आठवलेेंना त्याचे काहीच स्वायर सुतक नाही. कारण, त्यांची राज्यसभा २०२६ पर्यंत शाबीत आहे. मात्र, त्यांना तिकीट न दिल्यामागे खुद्द विखे पाटील असून त्यांनीच खा. आठवले यांना डावलले आहे त्यामुळे, त्यांचा निषेध म्हणून नगर जिल्ह्यातून दक्षिनेत विजय वाकचौरे आणि शिर्डीतून भिमा बागुल किंवा दिपक गायकवाड हे रिपाईच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. आता हे बंड किती काळ टिकेल याची शाश्‍वाती देता येत नाही. मात्र, भाजपाचे दुर्लक्ष आणि नेते व कार्यकर्त्यांची उपेक्षा हे सर्व आठवले यांच्या स्वार्थी भुमिकेमुळेच होत आहे असे मत त्यांच्याच कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.

तर, दुसरीकडे ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत देखील समाजात नाराजीचा सुर वाढू लागला आहे. पहिल्यांदा लोक आठवले यांना नेतृत्व म्हणून स्विकारत होते. नंतरच्या काळात भिमा कोरेगाव घटनेनंतर जनता आंबेडकर यांच्या पाठीशी उभी राहिली. पहिल्या निवडणुकीत समाजाने वंचितला भरभरुन मते दिली. मात्र, झालं काय? एक आमदार आला नाही आणि एकाही खासदार आला नाही. जो एमआयएम कडून इम्तीयाज जलिल आला. त्याने देखील कधी वंचितचे नेतृत्व स्विकारले नाही. उलट झाले काय? ज्या भाजपाला सत्तेतून खाली खेचायचे होते, त्यांचेच हात बळकट करण्यात वंचितची मदत झाली. तर, आघाडीच्या अनेक जागा वंचितमुळे पडल्या. अर्थात आता प्रकाश आंबेडकर यांनी त्यांची ताकद दाखविली होती. दुसर्‍या वेळी तरी सामोपचाराची भुमिका घ्यायची होती. नाही दुसर्‍या वेळी किमान तिसर्‍या वेळी तरी? पण नाहीच.! आबेडकर यांची भुमिका इतकी ताठर होत गेली. की, वंचित म्हणजे भाजपाची बी टिम असे आरोप त्यांच्यावर झाले. त्यानंतर तरी शहणपण येईल असे वाटत होते. पण, यंदा देखील त्यांनी तिच भुमिका घेतली आहे.

अर्थात जसे यापुर्वी वंचितसाठी चांगले वातावरण होते. तसे आता बिल्कुल नाही. मात्र, यांच्या उमेदवारांमुळे आघाडीचा उमेदवार अल्पमतात पडतो आणि भाजपाचा बहुमतांनी येतो. हे माहीत असताना देखील वंचितने ताठर भुमिका घ्यावी हे लोकांना न पटण्यासारखे आहे.  मात्र, डॉ. बाबासाहेबांचे नातू म्हणून अनेक गोष्टींवर जनतेने पांघरुन घालुन मतदान केले आहे. ती परिस्थिती यंदा पहायला मिळेल असे वाटत नाही. त्यामुळे, पुर्वी प्रमाणे यावेळी वंचितच्या उमेदवारांना तितके मते असेल असे राजकीय विश्‍लेषकांना वाटत नाही. मात्र, अजून देखील वेळ गेली नाही. म्हणून निर्भय बनो हे अभियान चालविणार्‍यांनी देखील वंचितला पत्र लिहीले आहे. भाजपाला नमविण्यासाठी थोडेफार फ्लेक्झीबल झाले पाहिजे अशी विनंती केली आहे. तर, संविधान वाचवा म्हणणार्‍या प्रकाश आंबेडकर यांना माहित नाही का? की दोनशे वकीलांना पत्रव्यवहार करुन न्याय व्यवस्था धोक्यात असल्याचे बोलले आहे. त्यामुळे, हुकूमशाहीकडे जाणार्‍या देशाला वाचविण्यासाठी कशाची गरज आहे, हे आंबेडकर यांना समजून सांगण्याइतके आपण मोठे नाही. त्यामुळे, त्यांनीच योग्य भुमिका घेतली पाहिजे. असे अनेकांना वाटते आहे. अन्यथा, त्यांच्यावर पुन्हा आरोप-प्रत्यारोप होतील आणि एक निवडणुक अशी येईल. की, त्यांची देखील आठवले यांच्यासारखी गत पहायला मिळेल..!!

आठवले यांना २००९ मध्ये कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळाली होती. त्यात त्यांचा पराभव करताना आ. थोरात आणि ना. विखे यांचा फार मोठा वाटा होता असा आरोपी रिपाईच्या नेत्यांनी केला होता. आता विखे पा. भाजपात आहे. त्यांना ठरविले असते तर आठवले यांच्या उमेदवारीला ग्रिन सिग्नल दिला असता. मात्र, त्यांनी केवळ बघ्याची भुमिका घेतली. नकळत बौद्ध उमेदवारी यांना नको आहे हे पुन्हा सिद्ध केले. त्यामुळे, आता रिपाईच्या नेत्यांनी त्यांच्या विरोधात दंड थोपटले आहे. दक्षिणेतून डॉ. सुजय विखे यांची उमेदवारी आहे त्यांना पाडण्यासाठी रिपाईचे उपाध्यक्ष विजय वाकचौरे हे उमेदवारी करणार आहेत. तर, शिर्डीतून सदाशिव लोखंडे यांना पाडण्यासाठी भिमा बागुल किंवा दिपक गायकावाड हे उमेदवारी करणार आहेत. यांनी एकत्र येऊन बैठक घेतली आणि बंड करण्याचा निर्णय घेतला आहे. आता यांनी हे बंड यशस्वी केले म्हणजे बरे.! अन्यथा जसा राजा तशी प्रजा असे झाले नाही तर देव पावला. जर, रिपाईच्या उमेदवार्‍या कायम राहिल्या तर विखे आणि लोखंडे यांची डोकेदुखी फार मोठी होऊ शकते. त्यामुळे, हे बंड शमते की कायम राहते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 क्रमश: भाग ४