लोखंडेंची उमेदवारी रद्द करा, अन्यथा करेक्ट कार्यक्रम करु.! बडे नेते आक्रमक.! ठाकरे गट म्हणतो राहुद्या तरच विजय सोपा जाईल.!

- सागर शिंदे

सार्वभौम (अकोले) :- 

निवडणुक आणि जागा वाटपाचा कोणताही विषय असोे. भाजपा रिपाईच्या कार्यकर्त्यांनाच सोडा, नेत्यांना सुद्धा विचारात घेत नाही. त्यामुळे, आम्ही फक्त यांचे झेंडे लावण्यासाठी आणि सतरंजा उचलण्यासाठी आहोत का? असा प्रश्‍न रिपाईच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी केला. आम्ही लोकसभेच्या दोन जागा मागत होतो, किमान आठवले यांना शिर्डीची उमेदवारी तरी द्यायची होती. मात्र, आम्हाला गृहीत धरुन डावलले जात आहे. हे आम्ही खपून घेणार नाही. त्यामुळे, सदाशिव लोखंडे यांची उमेदवारी रद्द करा आणि ती आठवले यांना द्या अशी मागणी रिपाईचे विजय वाकचौरे, श्रीकांत भालेराव, राजाभाऊ कापसे, दिपक गायकवाड यांच्यासह अनेक नेत्यांनी केली आहे. जर असे झाले नाही. तर, राज्यभर रिपाई कार्यकर्ते भाजपाच्या विरोधात उमेदवारी अर्ज भरेल आणि नगर दक्षिण व शिर्डी मतदार संघात वाजत गाजत उमेदवारी अर्ज भरला जाईल. जर, लोखंडेंची उमेदवारी रद्द केली नाही. तर, आम्ही करेक्ट कार्यक्रम करु अशी तंबी रिपाई नेत्यांनी दिली आहे. त्यामुळे, एकतर तिकीट मिळणे मुश्‍लिल होते, त्यात मतदार संघात नाराजी, त्यात नेते देखील नााराज, वरुन घोलप नावाची तलवार अद्याप देखील टांगती आहे. अशात रिपाईने बंड पुकारला आहे. त्यामुळे, लोखंडे यांची उमेदवारी म्हणजे नक्टीच्या लग्नाला सतरा विघ्ने या म्हणीप्रमाणे झाली आहे अशी बोचरी टिका होऊ लागली आहे.

केंंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना भाजपाने अगदी मनसेत जमा करुन टाकले आहे. फक्त आम्ही सांगू तेथे तुम्ही यायचे आणि  लाव रे तो व्हिडिओ म्हणत भाषणे ठोकायची, कविता करून लोकांचे मनोरंजन करायचे आणि चालते व्हायचे. इतके सिमित करुन टाकले आहे. राज्यात एकेकाळी सत्तेत कोणी बसायचे हे ठरविणारा रिपाई पक्ष एक जागेसाठी वंचित ठेवला आहे. अर्थात राज्यसभेतून खासदार होऊन मंत्रीपद घेणार्‍या कवीकारास त्याचे सुखदूख नाही. मात्र, आमच्या नेत्यास उमेदवारी नाही याचे शल्य नेते व कार्यकर्त्यांना पचेनासे झाले आहे. त्यामुळे, आता राज्याच्या विरोधात प्रजेने बंड पुकारावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणून तर, सदाशिव लोखंडे यांची उमेदवारी रद्द करुन ती आठवले यांना द्यावी अशी मागणी होत आहे.

मुळात, भाऊसाहेब वाकचौरे यांना शह देण्यासाठी लोखंडे हे सक्षम उमेदवार नाहीत असा ग्राऊंड रिपोर्ट देखील वरिष्ठांकडे आहे. मात्र, एकीकडे घोलप यांची न्यायप्रविष्ठ बाब निकाली निघेणा आणि दुसरीकडे आठवलेंना तिकीट देऊ वाटेना. त्यामुळे, भाजपाची गोची झाली आहे. तर, महत्वाचे म्हणजे आठवले यांची उमेदवारी ही विखेंना जड जाऊ शकते. कारण, डॉ. विखेंना मंत्रीपदाचे डोहाळे लागले आहेत. तर, आठवले निवडून आले तर त्यांना समाज आणि राजकीय गणिते बघता मंत्रीपद द्यावे लागेल. त्यामुळे, एकच जिल्ह्यातून दोन केंद्रीय मंत्रीपदे ही अशक्य बाब आहे. त्यामुळे, हातानी खाजवून जखम करुन घेण्यात विखे पा. दुधखुळे नाहीत. म्हणून त्यांना आठवले उमेदवार नको असावा असे बोलले जात आहे. मात्र, पुढील मंत्रीपदाची गणिते आखण्यापुर्वी लंकेंकडून त्यांची निराशा झाली नाही म्हणजे देव पावला..!!

एकंदर आठवले यांना डावलल्यामुळे रिपाईचे नेते फार नाराज आहेत. आम्ही पाच वर्षे मतदारसंघात काम केले आहे. लोखंडे यांनी काय कामे केली? त्यांच्यापेक्षा आठवले निवडून येतील असे अनेकांचे मत आहे. विशेेष म्हणजे जनतेतून लोखंडे यांच्याबाबत फार नकारात्मक चर्चा आहे. त्यामुळे, अजून देखील उमेदवार बदलावा अन्यथा आम्ही करेक्ट कार्यक्रम करू अशी भुमिका नेत्यांनी घेतली आहे. तर, लोखंडे उमेदवार दिल्यामुळे उद्धव ठाकरे गटाकडून आत्ताच पेढे वाटप सुरू झाले आहे. ही निवडणुक पुर्णत: एकतर्फी होणार आहे. त्यामुळे, लोखंडेच उमेदवार असावा अशे त्यांना मनोमन वाटते आहे. असे असताना देखील शिंदे किंवा भाजपाने नेमकी काय पाहुन लोखंडे यांना उमेदवारी दिली याचे गमक अनेकांना समजले नाही. तर, स्वत: मुख्यमंत्री होऊ पाहणार्‍या फडणविस यांना उपमुख्यमंत्री व्हावे लागले अन त्यांनी आठवलेंना केंद्रात मंत्रीपदासह राज्यात मंत्री व महामंडळे देऊ केली. यावर विश्‍वास फक्त आठवलेच ठेवू शकतात. खरंतर, अडिच-अडिच वर्षे मुख्यमंत्रीपद हा शब्द पाळला नाही म्हणून शिवसेना सत्तेतून बाहेर पडली. याचा विसर साहेबांना कसा झाला? असा प्रश्‍न रिपाई नेत्यांना पडला आहे. त्यामुळे, उद्यापेक्षा आज लोखंडेंची उमेदवारी रद्द करुन ती आठवलेंना द्या अन्यथा करेक्ट कार्यक्रम.!! या भुमिकेवर नेते ठमा आहेत.

क्रमश: भाग ५