भांगरेंच्या दोन्ही पीएवर गुन्हा दाखल, आमदार किती टक्केवारी घेतात याहून पेटला वाद.!

सार्वभौम (अकोले) :- 

डॉ. किरण लहामटे यांना बदनाम करण्यासाठी प्रस्तापित नेत्यांनी कधी त्यांच्यावर जातीयवादाचे आरोप केले. तर, कधी त्यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टिका केली. अर्थात हे राजकीय हेवेदावे ठराविक मर्यादेपर्यंत ठिक आहे. मात्र, आमदार किती टक्केवारी घेतात अशा प्रकारचा एक एक्झिट पोल तयार करुन त्यात काही ऑप्शन देण्यात आले होते. अशा प्रकारे लोकांचे मत घेऊन त्याच्याविषयी वातावरण दुषित करुन त्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचले गेले. अर्थात आमदार स्वत: सांगतात मी हरिश्‍चंद्राच्या नगरीतल सच्चा माणूस आहे. त्यामुळे, त्यांच्यावर अद्याप कोणता कलंक नाही. उलट त्यांनी गेल्या कित्तके वर्षाचा विकासातील गॅप भरुन काढला आहे. हे विरोधकांना दाखवत नाही. त्यामुळे, समाज्यात सहानुभूती निर्माण करण्यासाठी असा बदनामीचा घाट घातला जात आहे असे मत डॉ. लहामटे यांच्या समर्थकांनी व्यक्त केले आहे. या प्रकरणात आमन अन्सार तांबोळी यांनी फिर्याद दाखल केली असून भांगरे यांचे दोन्ही पीए पोपट चौधरी आणि अनिकेत तिटमे या दोघांच्या विरोधात राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खरंतर डॉ. किरण लहामटे यांनी हिवाळी आधिवेशनात पीडब्लुडी अधिकार्‍यांची वरात काढली होती. तारांकीत प्रश्‍न उपस्थित करुन हे अधिकारी दर्जेदार काम करीत नाहीत अशी तक्रार केली होती. रस्त्यांना लाखो व कोट्यावधींचा खर्च केला जातोय. त्यामुळे, त्याचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम होऊ नये यासाठी त्यांनी अधिकार्‍यांना धारेवर धरले होते. त्यामुळे, आमदारांवर टक्केवारीचा ठपका लावणे हे संयुक्तीक वाटत नाही. मुळात गुणवत्ता, विकास आणि समस्या यातून विरोध होणे ही राजकीय नैतिकता आहे. ती, स्व. अशोकराव भांगरे यांच्यात पहायला मिळत होती. त्यानंतर त्यांच्या गटातील व्यक्तींकडून असे वर्तन होऊन आमदाराला बदनाम करणे हे तालुक्यातील जनतेला फारसे रुतले नाही. त्यामुळे, आमदारकीचे स्वप्न प्रत्येकाने पहावे त्यात गौर काही नाही. मात्र, दुसर्‍याची रेष पुसून मोठे होण्यापेक्षा स्वत:ची रेष मोठी करुन विजय मिळविला तर तो जनमान्य ठरू शकेले असे मत सुज्ञ अकोलेकरांना वाटते आहे. 

कालचे दोस्त आजचे वैरी.!

सन २०१९ च्या निवडणुकीत डॉ. लहामटे यांना विजयी करण्यासाठी स्व.अशोकराव भांगरे यांनी शरद पवार यांच्याशी निष्ठा दाखवत पिचड कुटुंबाचा पराभव केला होता. त्यानंतर एकमताने पिचडांना शह देण्याचा चंग बांधला खरा. मात्र, निवडणुकीनंतर यांच्यातील साख्य टिकले नाही. परंतु निष्ठेच्या बदल्यात भांगरे कुटुंबाला जिल्हा बँकेत संचालक आणि कारखान्यावर व्हा.चेअरमन होण्याची संधी दिली गेली. स्व.अशोकराव भांगरे साहेब यांच्या पश्‍चात देखील ताईंना संधी मिळाली. त्यात डॉ. लहामटे यांची भुमिका दुर्लक्षित करुन चालणार नाही. आता मात्र, राज्यात दोन गट पडले आणि काका पुतणे विभक्त होताच त्याचा परिणाम तालुक्यात दिसून आला. आज दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडताना दिसत आहे. म्हणजे कालचे मित्र आज कट्टर वैरी झाल्यासारखे वागत असून एकमेकांवर तोंड टाकणे, आरोप प्रत्यारोप करणे या गोष्टी सुरु आहेत. मात्र, एखाद्या आमदाराला अशा पद्धतीने बदनाम करुन स्वत: किती धुतल्या तांदळासारखे आहे हे सिद्ध करण्याचे केविलवाना प्रयोग चुकीचा असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

दोघांचे भांडण तिसर्‍याचा लाभ.!

अकोले तालुक्यात मतांचे विभाजन होत गेले आणि पिचड कुटुंबाने राजकीय गणिते तयार करुन ४० वर्षे अकोले तालुक्यावर निर्विवाद अधिराज्य गाजविले. अर्थात ते मोठ्या साहेबांचे कौशल्य होते. त्यामुळे, तळपाडे, भांगरे, मेंगाळ, लहामटे यांच्यात कामय मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा पिचडांना झाला. आता देखील तालुक्यातील वातावरण त्याच दिशेला चालले आहे. आज भांगरे आणि लहामटे यांच्यातील वाद दिवसेंदिवस टोकाला जात राहिल. या २०२४ च्या निवडणुकीत अनेक उमेदवार आपले नशिब आजमावतील आणि त्यातून पुन्हा एका कोणलातरी फायदा होईल. म्हणजे पुन्हा दोघांचे भांडण तिसर्‍याचा लाभ अशी स्थिती पहायला मिळणार आहे. मग तो तिसरा कोण? हे येणारा काळच ठरवू शकतो.

नेत्यांच्या पायी सामान्यांवर गुन्हे.!

आता कोणी किती टक्केवारी घेतय, कोणी आपल्या प्रॉपर्ट्या कशा उभ्या केल्याय आणि कोणी किती भ्रष्टाचार करतय हे लोकांना नव्याने सांगण्याची गरज नाही. राज्यभरात नेते किती धुतल्या तांदळासारखे आहेत आणि अकोले तालुका त्यास अपवाद आहे असेही काही नाही. त्यामुळे, कार्यकर्ता कोणत्याही गटाचा किंवा पक्षाचा असो. त्याने नेत्यांच्या नादाला लागून किंवा त्यांची चापलुसी करताना आपल्यावर हकनाक गुन्हे दाखल होणार नाही. याची काळजी सामान्य कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे. आज दखलपात्र गुन्हे आहे उद्या दखलपात्र गुन्ह्याला देखील सामोरे जाण्याची वेळ आली तर आत बसायला नेता नसेल आणि जामीन द्यायला देखील त्यांना वेळ नसेल. त्यामुळे, निवडणुकीचा काळ आहे. हकनाक आयुष्य बरबाद करुन घेऊ नका हीच प्रत्येक कार्यकर्त्यांला हात जोडून विनंती असेल.