पिंपळगाव खांड धरणावर ‘गोडबोले गेट’ निमिर्ती, १० कोटींचा प्रस्ताव, तत्काळ काम मार्गी लावा अजित पवारांचे आदेश.!
- सागर शिंदे
सार्वभौम (अकोले) :-
संगमनेर ता. पठारभागावरील १० गावे आणि अकोले तालुक्यातील तीन अशा १३ गावांना जल जीवन मिशन अंतर्गत ४३ एमसीएफटी पाण्याची मागणी पिंपळगाव खांड धरणातून करण्यात आली आहे. मात्र, ६०० एमसीएफटी पाणीसाठा असणार्या धरणातून इतके पाणी गेले तर शासनाच्या सर्वेक्षणानुसार २५० हेक्टर सिंचित क्षेत्र धोक्यात येणार आहे. म्हणून लाभक्षेत्रातील शेतकर्यांनी १३ गावांना पाणी देण्यास तिव्र विरोध केला आहे. त्यावर तोडगा म्हणून डॉ. किरण लहामटे व सिताराम पा. गायकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यावर दादांनी उत्तम उपाय शोधला असून आता पिंपळगाव खांड धरणावर गोडबोले गेटची निर्मित्ती केली जाणार आहे. या प्रकल्पामुळे धरणाची उंची १ मिटरने वाढणार असून ५३ एमसीएफटी पाण्याचा अतिरिक्त साठा होणार आहे. या प्रकल्पास ९ कोटी ४६ लाख ५९ हजार रुपयांची मंजुर करण्याचा प्रस्ताव शासनापुढे मांडण्यात आला आहे.
दि. १२ मे २०२२ रोजी सिताराम पा. गायकर यांनी पत्रकार परिषद घेतली होती, तेव्हा त्यांनी सांगितले होते. की, समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार कोणाला पिण्याचे पाणी देण्यास आमचा विरोध नाही. पण, आधी पिंपळगाव खांड धरणात अतिरिक्त पाणी निर्माण करा आणि मग खाली पाणी सोडा. यात कोणी राजकारण करु नका आणि एकमेकांच्या विरोधात माथी भडकावू नका. आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना साकडे घालुन योग्यतो मार्ग काढू असा विश्वास गायकर यांनी दिले होते. त्यानंतर अतिरिक्त पाणी कसे उपलब्ध करता येईल यासाठी आ. डॉ. किरण लहामटे व सिताराम पा. गायकर यांनी सर्वेक्षण केले होते. त्यानंतर अधिकार्यांशी देखील चर्चा केली होती. त्यातून गोडबोले गेटची निर्मीत्ती करण्याचे शासनाने निच्छित केले आहे.
पिंपळगाव खांड धरणाच्या माध्यामातून १७७८ हे क्षेत्र हे सिंचनाखाली येते. मात्र, जल जीवन मिशन अंतर्गत या धरणातून पाण्याचा उपसा केला तर येथील शेतकर्यांना अनेक संकटांना सामोरे जाण्याची वेळ निर्माण होऊ शकते, अशी स्थिती निर्माण झाली होती. इतकेच काय तर येणार्या काळात देखील विविध योजनांच्या माध्यामातून या धरणातील पाण्याचे विरतण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे, मुळा विभागातून शेतकर्यांनी जल जीवन मिशन अंतर्गत होणार्या योजनेला प्रकर्षाने विरोध केला होता. अनेक मोर्चे, आंदोलन आणि उपोषण करुन योजना बंद पाडल्या होत्या. यात काही व्यक्तींनी व्यक्तीद्वेष आणि हकनाक राजकारण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावर संयमाने उत्तर देत डॉ. किरण लहामटे आणि सिताराम पा. गायकर यांनी तोडगा काढला आहे. या दोघांनी दि. २१ नोव्हेंबर २०२३ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. पिंपळगाव खांड धरण ही दादांची विशेष देण आहे आणि त्यातून पाणी खाली गेले तर काय होईल याची दाहकता पटवून सांगितली.
त्यानंतर अजित पवार यांनी जलसंपदा विभागाशी चर्चा करुन तत्काळ सर्वेक्षण करा तेथे गोडबोले गेटचा प्रकल्प उभा करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर कार्यकारी संचालक तिरमनवार (औरंगाबाद), मुख्य अभियंता मिसाळ (नाशिक) अधिक्षक अभियंता बाळासाहेब शेटे (अ.नगर) व कार्यकारी अभियंता गणेश हारदे यांनी आदेशाची अंमलबजावणी केली. त्यामुळे, पिंपळगाव खांड धरणाची १ मिटरणे उंची वाढणार असून त्यात ५३ एमसीएफटी पाणीसाठा अतिरिक्त होणार आहे. त्यामुळे, कोणतेही भुसंपादन नाही, पुराच्या पाण्याची भिती नाही, धरणातील मुळ पाणीसाठ्याला धक्का लागणार नाही. स्वयंचलित यंत्रावर गोडबोले असेल त्यासाठी ९ कोटी ४६ लाख ५९ हजार रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे १० एमसीएफटीपेक्षा जास्त पाणीसाठा लाभक्षेत्रातील शेतकर्यांना जास्तीचा मिळणार असून जेथे २५० हेक्टर सिंचित क्षेत्राचे नुकसान होणार होते. तेथे आता उलट जास्तीचे क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याचा अहवाल अप्पर मुख्य सचिव श्री. कपूर (जलसंपदा विभाग मंत्रालय) यांच्याकडे प्राप्त झाला आहे.
काय आहे गोडबोले गेट
गोडबोले गेट बसविल्याने नविन पाणीसाठा (एफआरएल) ६७१.५०० मी होईल. तर पाणीसाठा हा १.५० दलघमी ने वाढेल.(आता असणारा मंजुर पाणी वापर ९.४६ दलघमी व नव्याने प्रस्तावीत पाणीसाठा १.५० दलघमी ने वाढून तो एकूण १०.९६ असा होईल) गोडबोले गेट हे स्वयंचलित असून पुर्ण संचय पातळी (एफआरएल) गाठल्यानंतर गेट्स आपोआप उघडून संचय पातळीच्या वरील पाण्याचा प्रवाह गेटवरुन नदीत सोडला जाईल, पाणी पातळी संचय पातळीच्या खाली गेल्यानंतर गेट आपोआप पुन्हा बंद होईल. यात एकूण ४४ गेट असणार असून सर्व गेटमध्ये इमर्जन्सी हायड्रोलिक लुझिंग सिस्टम बसविण्यात येणार आहे. त्यामुळे पाणी साठ्याच्या पातळीनुसार पाणी आपोआप नदीपात्रात जाईल. या गेटची दुरुस्ती व देखभाल करण्यासाठी ६७५.५० मी चा स्टील ब्रीज उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पास धरणाची उंची ही १ मिटरने वाढणार असून त्यामुळे, ५३ एमसीएफटी पाणीसाठा वाढणार आहे.
गोडबोले गेटमुळे होणारा फायदा
धरणात ५३ एमसीएफटी पेक्षा जास्त पाणीसाठा वाढणार आहे, २५० पेक्षा जास्त हेक्टर सिंचित क्षेत्राचे होणारे नुकसान टळणार आहे. १३ गावांना पिण्याचे पाणी मिळणार आहे, धरणात पुर्ण क्षमतेने पाणी साठा झाल्यानंतर पुढे ते आपोआप नदीपात्रात जाणार आहेे. धरणात जास्तीचा पाणीसाठा होणार आहे, कोणत्याही प्रकारचे भुसंपादन करण्याची गरज नाही, धरणातील शासन निर्धारीत वापराचे पाणी वाढणार आहे. शेती आणि पिण्याच्या पाण्याचा तुटवडा कमी होण्यास मदत होणार, राज्यात वर्धा, नांदेड आणि इतर मोजक्या प्रकल्पात पिंपळगाव खांड धरणावर गोडबोले गेट उभे केले जाणार आहे. या धरणाहून गेल्या कित्तेक दिवस ज्यांनी राजकारण केले त्यांचे राजकारण संपुष्टात येणार आहे.