संगमनेर पुन्हा अस्थिर! कोल्हेवाडी रोड नाटकी जवळ तलवार, लोखंडी रॉड व कुर्हाडींनी मारामार्या, लक्ष्मीनगर मध्येही रॉड, कोयत्याने वार.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर शहरात काल दि. १२ मार्च २०२४ रोजी २४ तास दोन घटनांमध्ये काठ्या, लोखंडी रॉड, कुर्हाडी आणि कोयत्यांनी नंगानाच केला. रात्री 12:30 वाजता लक्ष्मीनगर परिसरात पुर्वी दोन गटात वाद झाला आणि ११ जणांनी दोघांवर सशस्त्र हल्ला करुन त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी ११ जणांवर गुन्हे दाखल करुन पाच जणांना अटक करण्यात आले. सकाळी हे प्रकरण मिटते ना मिटते कोठे नाहीतर सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास कोल्हेवाडी रोड नाटकी जवळ पिकअपचा कट मारल्याच्या कारणाहून वाद झाला आणि काही क्षणात तेथे काठ्या, कुर्हाडी आणि तलवारीने रैद्ररुप धारण करत तिघांना जखमी केले. यात आठ जणांना आरोपी करण्यात आले आहे. या दोन्ही घटनांमुळे शहरातील वातावरण तणावपुर्ण झाल्याचे पहायला मिळालेे.
पहिल्या घटनेतील सविस्तर माहिती अशी. की, हुसेन बाबामियॉं शेख (रा. तिरंगा चौक, संगमनेर) हा दि. १२ मार्च २०२४ रोजी रात्री १२ वाजल्यानंतर त्याचा मित्र धिरज पवाडे (रा.लक्ष्मीनगर, संगमनेर) यांच्या घरी गेला होता. तेव्हा त्या घराजवळीला गल्लीत गोट्या घेघडमल, निलेश काथे, अविनाश काथे, ओम काथे, साहिल देव्हारे, ऋषी धिमते, अरबाज पठाण, प्रथमेश अशोक पावडे, सनी शेखर तरटे, अविनाश सोमनाथ मंडलिक आणि सौरभ राजेंद्र फटांगरे (सर्व रा. संगमनेर) यांनी जमाव केला आणि शिविगाळ दमदाटी करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, गोट्या घेगडमल याच्या हातात कोयता होता आणि बाकी आरोपींच्या हाती गज आणि काठ्या होत्या. त्यांनी धिरज पावडे यास धरुन मागिल वादाचे कारण उकरुन काढले. तु जास्त दादा झाला काय? असे म्हणून थेट मारहाण करण्यास सुरुवात केली. तेव्हा हुसेन शेख हा सोडविण्यासाठी गेला असता गोट्याने त्याच्या हातातील कोयता शेखच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधान राखून तो वाचविला. मात्र, तरी देखील तो उजव्या हातावर लागल्याने गंभीर दुखापत झाली. त्यानंतर निलेश व साहिल या दोघांनी रस्त्याच्या कडेला जी दगडे पडली होती. ती उचलली आणि थेट शेख यांच्या डोक्यात टाकली. त्यामुळे, रक्तातळलेल्या आवस्थेत तो जमिनिवर कोसळला आणि बेशुद्ध पडला. त्यानंतर त्यास रुग्णालयात दाखल केले. या दरम्यान शहरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी काही गाड्या देखील जाळल्याचा प्रकार रात्री घडला होता. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन पाच जणांना अटक केली आहे.
दरम्यान, रात्रीचा गुन्हा पोलीस निस्तारतात कोठे नाहीतर दि. १२ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान राहुल सोपान गुंजाळ (रा. कोल्हेवाडी रोड, सुकेवाडी, ता. संगमनेर) हे त्यांच्या दोन मुली घेऊन दुचाकीहून एका वाढदिवसाला चालले होते. यावेळी नाटकी नाल्याजवळ असताना त्यांच्या पाठीमागून नंबर नसलेली एका पिकअप गाडी आली आणि कट मारुन निघुन गेली. पुढे गतिरोधक असल्याने पिकअप स्लो झाली तेव्हा गुंजाळ यांनी पिकअप चालकाकडे पाहिले. त्या क्षणी तो म्हणाला, की माझ्याकडे काय बघतो? असे म्हणत शिविगाळ करु लागला. मात्र, दुर्लक्ष करून सोबत मुली असल्यामुळे गुंजाळ पुढे निघाले. मात्र, पिकअप चालक अल्फाज शेख याने गाडी जोरात घेऊन त्यांना आडवी मारली. गाडीची चावी काढून घेत कोणताही प्रश्न न करता मोठमोठ्याने शिविगाळ करीत थेट मारहाण करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, त्याने फोन काढून तेथील काही व्यक्तींना कॉल केला. त्यानंतर अवघ्या काही मिनिटात नाटकी परिसरात कोणी तलवार, कोणी कुर्हाडी, कोणी लाकडे तर कोणी लोखंडी रॉड घेऊन सात ते आठजण आले. त्यांनी गुंजाळ यांना मारहाण सुरू केली. तेवढ्यात रस्त्याने अमोल गुंजाळ, संदिप गुंजाळ, संकेत कोरडे, रवि गुंजाळ हे आले आणि त्यांनी वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, यांना देखील सशस्त्र आलेल्या आठ जणांनी मारहाण सुरू केली. तर, पिकअप चालक शेख याने त्याच्या हातातील तलवार अमोल गुंजाळ यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यासाठी उगारली. मात्र, तो वार चुकला म्हणून अमोल वाचला तेव्हा अमोलने घटनास्थळाहून काढता पाय घेतला. याच दरम्यान, कोल्हेवाडी रोड परिसरात प्रचंड गर्दी जमा झाली होती. त्यामुळे पिकअप चालकाने देखील तेथून पळ काढला. त्यानंतर राहुल गुंजाळ यांनी थेट शहर पोलीस ठाणे गाठले आणि घडलेला प्रकार कथन केला. त्यानंतर पिकअप चालक अल्फाज शेख, अरबाज कुरेशी, समद कुरेशी (रा.संगमनेर) यांच्यासह पाच जणांना आरोपी केले आहे. या घटनेमुळे कोल्हेवाडी रोड नाटकी परिसर जोर्वे नाका पुन्हा चर्चेत आला असून तेथील चौक मोकळा केला आहे, जोर्वेनाका परिसरात पोलीस चौकी देखील उभी केली आहे. मात्र, हे सर्व कुचकामी ठरले आहे की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.