संगमनेर बस स्थानकावर तरुणावर भ्याड हल्ला, घोषणा दे नाहीतर ठार मारु म्हणत दहशत निर्माण केली. बजरंगदलाच्या कार्यकर्त्यांसह नऊ जणांवर गंभीर गुन्हे.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर शहरातील बसस्टँड परिसरात रागाने काय पाहतो? घोषणा दे असे म्हणुन एका पंचवीस वर्षीय युवकाला बेदम मारहाण केली.जेव्हा तो निसटुन पळाला तेव्हा त्याला वीट फेकुन मारली ती सुदैवाने लागली नाही. मात्र, तो जिथे थांबला तेव्हा त्याला चारही बाजूने विळखा घातला आणि लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यापैकी एकाने हातातील टणक वस्तुने या युवकाच्या हातावर मारले ही खळबळजनक घटना शनिवार दि.23 मार्च 2024 रोजी सायं. 4:15 ते 4:45 दरम्यान शहरातील बसस्थानक परिसरात घडली. यामध्ये फिर्यादी हुजेब अय्याज शेख (वय 25, रा.मोमीनपुरा,ता. संगमनेर)यांच्या तक्रारीवरून अक्षय धुमाळ, गोलु ठाकुर, अमोल मिश्रा व इतर पाच ते सहा जणांवर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस करत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, हुजेब शेख या युवकाचे शिक्षण पुर्ण होऊन तो मेडीकलमध्ये काम करतो. या युवकाच्या आजीला बरे नसल्याने तो शनिवार दि. 23 मार्च 2024 रोजी मेडीकलमध्ये औषधे घेण्यासाठी बसस्टँड परिसरात आला होता. तेव्हा मेडीकल मध्ये गर्दी असल्याने हा युवक लघुशंका करण्यासाठी स्थानकात गेला. तो पुन्हा मेडीकलमध्ये आला असताना या युवकाच्या ओळखीचे मित्र त्याला भेटले. तेथे अन्य दोन ते तिन मुले रागात पाहुन पुढे जाऊन पुन्हा मागे आले आणि म्हणाले तु आमच्याकडे रागाने का पाहत होता? फिर्यादी हुजेब शेख हा बोला की, मी रागाने पाहत नव्हतो. तुमचा गैरसमझ झाला असेल. तरी देखील त्यांनी हुजेब शेख याला शिविगाळ, दमदाटी देण्यास सुरुवात केली. हुजेब शेख या युवकाला घोषणा देण्यासाठी बळजबरी करू लागले. त्याने घोषणा दिली नाही म्हणुन धक्काबुक्की करून लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, हुजेब शेख याने तेथुन पळ काढण्याचा प्रयत्न केला. तो एका ज्वेलरीच्या दुकानापुढे आला असता कोणीतरी पाठीमागुन विट फेकुन मारली. मात्र, ती सुदैवाने त्याला लागली नाही. तेथून हुजेब शेख हा रिक्षा स्टॉपजवळ गेला. तेथे काही मानसे उभी होती. त्यापैकी तीन चार लोक त्याच्या ओळखीतले होते. त्यातील अक्षय धुमाळ, गोलु ठाकुर, अमोल मिश्रा या तिघांसह काहींनी त्यास थाबुक्यांनी मारहाण केली. मारहाण करत असताना गोलु ठाकुर याने त्याच्या हातातील टणक वस्तुने हुजेब शेख याच्या डाव्या खांद्यावर जोरात मारुन जखमी केले. मोठमोठ्याने घोषणा देऊन व शिविगाळ करून मारत होते. त्यावेळी तेथे जमलेल्या काही लोकांनी हे भांडण सोडवले.
दरम्यान, हुजेब शेख यास बसस्टँड मधील एका मोबाईल शॉपमध्ये नेऊन बसवले. त्यानंतर तेथे पुन्हा अक्षय धुमाळ, गोलु ठाकुर, अमोल मिश्रा व इतर पाच ते सहाजणांनी शिविगाळ करु लागले. याला मारून टाका अश्या धमक्या देखील त्यांनी दिल्या. तेथे काहीकाळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर काही वेळातच घटनास्थळी पोलीस हजर झाले आणि तेथील जमाव हटविला. त्यानंतर हुजेब शेख याने दिलेल्या फिर्यादीवरून अक्षय धुमाळ, गोलु ठाकुर, अमोल मिश्रा याच्यासह अन्य पाच ते सहा जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस करत आहे.
या घटनेमुळे संगमनेर शहर पुन्हा एकदा चर्चेत आले असुन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ते कसोशीने प्रयत्न करत आहे. परंतु स्थानिक लोकप्रतिनिधींनी व हिंदु - मुस्लीम समाजातील नेतेमंडळीनी संगमनेर शहरात सलोख्याचे वातावरण कसे निर्माण होईल व भाईचारा कसा वाढेल यासाठी अधिक बैठक घेऊन पुढाकार घ्यायला हवा असे सुज्ञ संगमनेरकरांना वाटू लागले आहे. मात्र, दुर्दैवाने यावर कोणीच बोलत नाही. शांत, संयमी आणि सुसंस्कृत अशी ओळख असणाऱ्या संगमनेरात अशांततेने हैदोस माजविला आहे, शांतता मिटिंग देखील अशांततेत होत आहेत, पोलिसांना त्यांचे काम करु देण्यास दबाव वापरला जात आहे, त्यामुळे संगमनेर शहराला अक्षरश: छावनिचे स्वरुप आले आहे. नेत्यांनी राजकारण आणि मतांची गोळाबेरीज थोडी बाजुला ठेवून पोलिसांच्या मध्यस्तीने बैठका घेऊन हे तणावपुर्ण वातावरण कमी केले पाहिजे. हे असेच चालु राहिले तर संगमनेरात मुले-मुली शिक्षणासाठी येणार नाही, लोक बाजारपेठेत येणार नाहीत. परिणामी आजचे सुजलाम सुफलाम संगमनेर उद्या ओसाड पडलेले दिसू शकते. त्यामुळे, येथे रक्तरंजित कहाण्या घडण्यापुर्वी येथील ऐतिहासिक घटनांनी या शहराची ओळख कायम रहावी म्हणून शहाण्यांनी एकत्र येऊन यावर तोडगा काढावा असे मत सुज्ञ नागरिक व्यक्त करत आहेत.