महिलेवर वाईट नजर टाकतो म्हणून २३ वर्षीय तरुणाची हत्या, दारु पाजून मित्रांनीच केले वार.! अफवा पसरवू नका...!!

 
सार्वभौम (संगमनेर) :- 

 महिलांवर वाईट नजर ठेवतो म्हणूने एका तरुणाची धारधार शस्त्राने हत्या करण्यात आली. त्याला दारु पाजून विश्‍वासात घेतले आणि निर्जनस्थळी नेवून त्याचा धारधार शस्राने गळा कापुन हत्या केल्याची धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यातील समनापूर येथे घडली. हा प्रकार काल सायंकाळी ७ ते ८ वाजण्याच्या सुमारास घडला असून आज दि. २३ मार्च २०२४ रोजी सकाळी मृतदेह आढळून आला. अब्दुल उर्फ अतुल शोभाचंद सावंत (वय २३, रा. समनापूर, ता. संगमनेर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. तर, याप्रकरणी त्याचे मित्र सागर रमेश मुळेकर व राजेश मनोज मकवानी, किसन सरदार सावंत (तिघे रा. समनापूर) या तिघांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. या प्रकरणाला काही संघटनांनी जात आणि धर्माचे स्वरुप देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सीसीटीव्ही फुटेज आणि पोलिसांची दक्षता त्यामुळे हा प्रयत्न हाणून पडला असून संगमनेर शांत राहण्यासाठी पोलिसांची भुमिका फार महत्वाची ठरली आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी. की, आब्दुल सावंत हा भटक्या विमुक्त जातीतून असून तो समनापूर येथील रहिवासी आहे. गेल्या काही वर्षापासून तो मजुरी करुन आपल्या कुटुंबाची गुजरान करीत होता. गावातील सात ते आठ जणांनी एक टोळी तयार केली होती. ते आजुबाजुच्या गावात जाऊन कोबी, फ्लावर काढण्याचे काम करीत होते. काल यांनी निंभाळे परिसरात दुपारी २ वाजण्याच्या सुमारास एका शेतात काम केले आणि त्यानंतर सायंकाळी हॉटेल नेचर येथे जमण्याचे नियोजन केले होते. आब्दुल हा महिलांवर वाईट नजर टाकतो ही बाब आरोपींच्या मनात खटकत होती. त्यामुळे याचा आज काटा काढायचा या हेतूने दोघांनी पुर्वनियोजित कट आखला होता.  ठरल्याप्रमाणे तिघे एकत्र आले आणि त्यांनी तेथून काही दारुच्या बाटल्या देखील घेतल्या व बाहेर जाऊन त्या रिचवायच्या आणि नशेत याचे काम करायचे असे यांचे नियोजन होते.

  दरम्यानच्या काळात मयत आब्दुल याला घेऊन सागर मुळेकर व राजेश मकवानी हे समनापूर येथील एका निर्जनस्थळी घेऊन गेले. तेथे या तिघांनी यथेच्च मद्य प्राशन केले त्यानंतर यांच्यात वाद देखील झाले होते. तू जवळच्या महिलांवर वाईट नजर टाकतो असे म्हणून एकमेकांशी झक्कडपक्कड देखील झाली. तिघांनी दारु प्यायली असल्यामुळे ते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत होते. मात्र, सागर आणि राजेश यांनी चाकू आणून नियोजनपुर्वक याला संपविण्याचा निर्धार केला होता. त्यामुळे, आब्दुल बेसावध व मद्याच्या नशेत असताना यांनी त्याच्या गळ्यावर चाकुने वार केले आणि त्याची हत्या केली. आपल्याला कोणी पाहिले नाही याची खात्री करीत त्यांनी घटनास्थळाहून पळ काढला. घडलेला प्रकार कोणाला माहिती होणार नाही किंवा आपले नाव देखील पुढे येणार नाही असे यांना वाटत होते. त्यामुळे, दुसर्‍या दिवशी जसे काही घडलेच नाही या अविर्भावात दोघे घरीच होते. 

दरम्यान, दुसर्‍या दिवशी सकाळी एका व्यक्तीने आब्दुल याचा मृतदेह पाहिला आणि त्यांनी गावातील काही प्रतिष्ठीत व्यक्तींना माहिती दिली. त्यानंतर पोलीस उपाधिक्षक सोमनाथ वाघचौरे व पोलीस निरीक्षक भगवान मथुरे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ पोलीस पथके कामाला लावली आणि गुन्ह्याची उकल करण्याचे प्रयत्न   सुरू केले. यावेळी हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज फार महत्वाचे ठरले.  त्यात आरोपी सागर मुळेकर व राजेश मक्वानी हे त्याच्यासोबत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी तत्काळ या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी पहिल्यांदा उडवाउडविची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी आपला खाक्या दाखविताच दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. या तपास पथकात पो.ना.धनंजय महाले, पो.ना.राहुल डोके, पो.कॉ.राहुल सारबंदे,पो.कॉ.अजित कुर्हे,पो.कॉ.विशाल कर्पे, पो.कॉ.साई पवार,पो. कॉ.आत्माराम पवार यांनी ही दमदार कामगिरी केली.

आब्दुल नावाहून गैरसमज.! 

संगमनेर शहरात दोन गटांमुळेे आधीच तणावपुर्ण वातावरण आहे. काही लोक फक्त जात आणि धर्म शोधून दंगे कसे घडविता येतील, दोन गटात वाद कसे निर्माण करता येतील, संगमनेर शहर अस्थिर कसे करता येईल याकरीता कार्यरत आहे. त्यामुळे, सामाजिक वातावरण दुषित होत असून त्याचा तोटा सामान्य नागरिकांना सोसावा लागत आहे. त्यामुळे, जोर्वे नाक्याहून निर्माण झालेला वाद जोर्वे नाक्यावरच सामोपचाराने संपविणे गरजेचे आहे त्याचे स्तोम तालुकाभर परसरणार नाही याची काळजी जसे प्रशासन घेत आहे. तसे प्रत्येक नागरिकांनी घेतली पाहिजे. आज या मयताचे नाव आब्दुल असल्यामुळे, अनेकांनी समनापुरकडे धाव घेतली. मात्र, नशिब सीसीटीव्ही फुटेज मिळाले अन्यथा समाजद्रेष्टांना हाती कोलीत घेण्याची संधी मिळाली असती. त्यामुळे, गट कोणताही असो. गुन्हेगाराला जात आणि धर्म नसतो. त्यामुळे, घटनेची सखोल माहिती घेतल्याशिवाय कोणी कायदा व सुव्यवस्था बिघडेल असे कृत्य करु नये असे आवाहन सजग नागरिकांनी केले आहे.