...तर भाऊसाहेब वाकचौरेंच्या पराभवाची गुढी उभारण्याचे भाग्य पवार गट आणि कॉंग्रेसला जाईल.!

 

- सागर शिंदे 

सार्वभौम (अकोले) :- 

 शिर्डी लोकसभेची जागा ठाकरे गटाच्या पारड्यात पडल्यानंतर २०२४ साली सर्वात पहिली गद्दारी करणारे भाऊसाहेब वाकचौरे होते. सत्तेच्या लालसेपोटी विखे पाटलांच्या बोटाला धरुन कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे त्यांचा दारुन पराभव झाला. पुन्हा त्यात बोटाला धरुन त्यांना भाजपात नेवून सोडले. तेथेही ते पडल्यामुळे त्यांचे मन रमले नाही म्हणून पुन्हा शिवसेनेत आले. इथवर त्यांचा प्रवास हा प्रचंड अपयशी राहिला आहे. आता इथे देखील शरद पवार गटाचे कार्यकर्ते त्यांच्या विरोधात प्रचार करताना दिसत आहेत. अन कॉंग्रेस तर अक्षरश: दुसावट्याची वागणूक देत आहे. एकीकडे महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षाताई रूपवते यांचे बंड, दुसरीकडे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, नंतर अनु. जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे अशा अनेक कॉंग्रेसच्या नेत्यांनी वाकचौरे यांना विरोध केला असून बंडाचे निशाण हाती घेतले आहे. त्यामुळे, भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पराभवाची गुढी उभारण्याचे खरे भाग्य जर कोणाच्या माथी जाईल. तर, ते कॉंग्रेस आणि शरद पवार गटाला जाणार अशी जोरदार चर्चा मतदारांमध्ये सुरु आहे.

खरंतर शिर्डी राखीव असल्यामुळे... नाका परिस जड एक नाही धड भाराभर चिंध्या या म्हणीची प्रचिती आता येऊ लागली आहे. १० वर्षे लोखंडे यांच्यावर जनता फारशी समाधानी नाही. कॉंग्रेसला बौद्ध उमेदवार नको आणि हा मतदारसंघ सुद्धा नको. त्यामुळे, प्रेमानंद रुपवते यांच्यापासून तर अगदी उत्कर्षाताई पर्यंत त्यांना कोणालाच संधी द्यायची नाही. त्यामुळे, बड्या पक्षाकडून चांगला चेहरा नसल्याने पर्याय कोण? तर, भाऊसाहेब वाकचौरे...! अर्थात २०१४ मध्ये शिवसेनेशी पहिली गद्दारी करणारा खासदार आणि त्याच शिवसैनिकांनी रोष व्यक्त केले म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल करणारा खासदार म्हणून यांची ओळख झाली होती. मात्र, लोखंडे यांना मतदारसंघ कवर करता आला नाही. म्हणून केवळ पर्यायी चेहरा म्हणून भाऊसाहेब वाकचौरे हे नाव पुढे येऊ लागले आहे. अन्यथा यांना जनतेतून पसंती आहे असा गोड गैरसमज त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी करुन घेणे बाळबोधपणाचे ठरेल.

वास्तवत: राज्याच्या राजकारणाला दिशाच राहिली नाही. शरद पवार साहेबांच्या काळात आमदार फोडून थेट पुलोद (१९७७) सारखे सरकार स्थापन केले जायचे. आता मात्र रित बदलली आहे. आमदार तर फोडायचे पण पक्ष चिन्हासह घेऊन जायचा आणि जो सोबत येत नाही त्याला जेलमध्ये टाकायचा फंडा राजकीय संस्कृतीत रुढ झाला आहे. त्यामुळे, नेतेच स्वत:च्या घरात आणि पक्षात राहिले नाही तर कार्यकर्त्यांनी करायचे काय? ते सुद्धा सौरभौर झाल्याचे दिसते आहे. शिंदे गट, दोन्ही पवार आणि ठाकरे गट यांच्या कार्यकर्त्यांची तर फार बिकट परिस्थिती झाली आहे. त्यामुळे, नेतृत्वाने दिलेला आदेश कितपत पाळायचा याचा विचार कार्यकर्ता करु लागला आहे. म्हणून तर, ठाकरे गटाच्या उमेदवाराचा प्रचार करायला शरद पवार गट तयार नाही आणि पवार गटाच्या उमेदवाराचा प्रचार करायला कॉंग्रेस आणि ठाकरे गट तयार नाही. सगळा राजकीय सावळा गोंधळ झाल्याचे दिसत आहे. यात कार्यकर्ता मात्र दोनच गोष्टी पाहताना दिसतो आहे. एक म्हणजे चांगला उमेदवार आणि दुसरे म्हणजे ज्याची खावी रोटी त्याची वाजवावी टाळी. यात निष्ठा, नेता, पक्ष, चिन्ह आणि आपलेपणा जरा देखील उरलेला नाही. हिच स्थिती महाविकास आघाडीत दिसून येऊ लागली आहे.

भाऊसाहेब वाकचौरे यांची उमेदवारी फायनल झाल्यापासून त्यांना ग्रहन लागले आहे. त्यांनी २०१४ साली गद्दारी केली. त्यामुळे, त्यांना उमेदवारी देऊ नका असा पहिला सुर निघाला. त्यानंतर ठाकरे शिवसेनेत दोन गट पडले बबन घोलप व वाकचौरे तेथे देखील वाद पहायला मिळाले. घोलपांना डावलुन वाकचौरे यांनी पुन्हा जम बसविला. मात्र, कार्यकर्त्यांची फार मोठी फळी तुटली. यात काही कार्यकर्ते आज त्यांच्या बरोबर आहेत. मात्र, केळव शरिराने..म्हणून तर भर सभा आणि बैठकीत एकमेकांवर धावूना जाणे आणि अनेक गोपनिय माहित्या लिक होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे, ठाकरे गटाची शिवसेना जरी एक जिवाची वाटत असली. तर, प्रत्येकाने भाऊसाहेब वाकचौरे स्विकारले असे म्हणणे फार धाडसाचे ठरेल. तसेच पक्षात राहुन अशोक गायकवाड यांनी देखील वाकचौरे यांचा प्रचार करणार नाही. त्यांची उमेदवारी मान्य नाही असे त्यांनी स्पष्ट सांगितले होते. त्यामुळे, पक्षांतर्गत देखील फार अलबेले वातावरण आहे. असे म्हणणे फार धाडसाचे ठरेल.  

खरंतर महायुतीचा उमेदवार म्हटल्यानंतर इथे बाळासाहेब थोरात, तांबे कुटुंब, श्रीरामपूरमध्ये आ. कानडे आणि नव्याने जबाबदारी स्विकारलेल्या जयश्रीताई यांनी किती काम करायला पाहिजे. मात्र, वाकचौरे यांच्यासोबत कॉंग्रेसचा एक देखील व्यक्ती दिसत नाही. उलट महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षाताई रूपवते यांचे बंड, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, आणि कॉंग्रेसचे अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे यांनी या उमेदवारीवर बंड केले आहे. कॉंग्रेसच्या धोरणांवर टिका केली आहे. त्यामुळे हा महाविकास आघाडीला घरचा आहेर समजला जात आहे. या सगळ्या गोष्टींचा तोटा हा भाऊसाहेब वाकचौरे यांना होणार असून कॉंग्रेसचे दोन आमदार असून देखील त्यांचा फायदा वाकचौरे यांना होईल की नाही? हाच मोठा प्रश्‍न अनेकांना पडला आहे.

खरंतर शरद पवार गट शिर्डी लोकसभा मतदार संघात अगदी बोटावर मोजता येईल अशा ठिकाणी आहे. विशेषत: अकोले सोडून फार कोठे इतके वलय दिसत नाही. मात्र, त्यातील अनेकांना वाकचौरेंची उमेदवारी मान्य नाही. त्यात रिपाईतून बंडखोरी केलेले शांतराम संगारे आणि चंद्रकांत सरोदे यांनी थेट शरद पवार यांची भेट घेतली आहे. शिर्डीतून त्यांनी बौद्ध उमेदवार द्यावा अशी मागणी केली असून ठाकरे यांच्याकडे देखील पत्रव्यवहार केला आहे. एकंदर पवार गट व कॉंग्रेस कार्यकर्त्यांना उत्कर्षाताई रुपवते यांच्यासारख्या तरुण चेहर्‍याला पसंती असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे, कॉंग्रेस आणि शरद पवार गट हा फक्त वेट ऍण्ड वॉच या भुमिकेत आहे. मात्र, हे चित्र असेल राहिले तर एक नवा चेहरा वाकचौरे यांचे फार मतदान खाऊ शकतो. याचे अंतीम सत्य म्हणजे वाकचौरे यांच्या भराभवाची गुढी कॉंग्रेस आणि शरद पवार गट उभारु शकतो असे मत राजकीय विश्‍लेषक व्यक्त करतात.

क्रमश: भाग 7