बबन घोलप आणि आठवले दोघे भाऊसाहेब वाकचौरेंची डोकेदुखी.! लोखंडे म्हणजे शुल्लक गोष्ट.! बदलाच्या हलचाली.!

   

- सागर शिंदे

सार्वभौम (अकोले) :- 

शिर्डी मतदारसंघात जोवर अर्ज दाखल होत नाही. तोवर राजकारणात काय बदल होईल याचा काहीच नेम नाही. जसजशी अर्ज भरण्याची तारीख जवळ येत आहे. तसतशी राजकीय खलबते पहायला मिळत आहे. एकीकडे रामदास आठवले यांनी विखेंवर निशाणा साधला असून तिकीट कापले म्हणून युतीच्या विरोधात बंड पुकारले आहे. त्यांना अजून देखील अपेक्षा आहे. की, पक्ष संधी देईल. तर, दुसरीकडे १० वर्षे संधी मिळून देखील विकास कामे तर सोडाच पण सामान्य मानसांना खासदार कोणी ही ओळख करुन देण्यात अपयशी ठरलेल्या लोखंडे यांच्या विरोधात ७० टक्के नाराजी दिसून येत आहे. त्यामुळे, कायद्याच्या कचाट्यातून मुक्त झालेल्या बबन घोलप यांनी ठाकरे गटास जय महाराष्ट्र करुन शिंदे गटात प्रवेश केला आणि लोखंडे यांची डोकेदुखी केली. जनतेतून दिसणारा विरोध लक्षात घेता हे विनिंग सिट नाही हे भाजपाला काही नव्याने सांगण्याची गरज नाही. त्यामुळे, लोखंडे यांचा पत्ता कट होऊन तेथे घोलप उमेदवार असू शकतात. त्यामुळे, एकतर्फी होणार्‍या निवडणुकीला आता रंग चढू शकतो. यात एक मात्र खरे की, लोखंडे यांच्यापेक्षा आठवले आणि घोलप हे वाकचौरे यांना शंभर टक्के शह देऊ शकतात. मात्र, जर लोखंडे उमेदवार असतील तर वाकचौरे यांच्यासाठी विजय हा शुल्लक गोष्ट असणार आहे असे राजकीय विश्‍लेषकांचे मत आहे.

खरंतर शिर्डी लोकसभेची जागा आरक्षित असल्यामुळे नेत्यांचा अक्षरश: फुटबॉल केला जातो. दगडापेक्षा विट मऊ आणि डोईजड नको कानाखालचा हवा अशा संकल्पना फक्त एसी मतदारसंघात रुढ झाल्या आहेत. त्यामुळे, फार मोठी रस्सीखेच होताना दिसते आहे. त्यात सदाशिव लोखंडे, भाऊसाहेब वाकचौरे, बबन घोलप, नितीन उदामले यांच्यासह अनेकांना जरी आपण विट संबोधत असलो तरी यांनीच उमेदवारीसाठी एकमेकांवर दगडफेक सुरु केली आहे. मात्र, यांच्यात चांगला कोण? तर राजकीय गणिते म्हणून जरी पक्षांनी उमेदवार दिले. तरी जनता चांगल्या व्यक्तीवर मोहर लावणार आहे. म्हणून लोखंडे बरे की घोलप चांगले याचे सर्वेक्षण शिर्डी मतदारसंघात सुरू आहे. त्यामुळे, तिकीट जरी लोखंडे यांना घोषित झाले असले. तरी येणार्‍या काळात उमेदवार बदलला तर वावघे वाटण्याचे काहीच कारण नाही. कारण, या महाराष्ट्रात असे अनेकदा झाले आहे. की, तिकीट घोषित केले आणि ते रद्द करुन दुसर्‍याला दिले. अन असे झालेच तर लोखंडे जातील करी कोठे? एकतर राज्यसभेचा अग्रह किंवा मुलाचे पुनर्वसन यात तडजोड होऊ शकते.

खरंतर २०१४ साली भाऊसाहेब वाकचौरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केली. त्यानंतर शिर्डीत घोलप नावाचे वादळ आले. तेव्हा घोलपांना चांगले वातावरण निर्माण झाले होते. मात्र, त्यांचे पुर्वीचे कारणामे काही कमी नव्हते. त्यामुळे, कायदेशीर कचाट्यात ते अडकले आणि लोखंडे नावाच्या अज्ञात व्यक्तीला शिवसेनेच्या नावाने मतदारांनी भरभरुन मतदान केले. २०१४ साली कोणाला माहित नसणारा व्यक्ती खासदार झाला इतकेच काय.! २०१९ साली देखील हे नाव मतदारांच्या स्मरणाशक्तीच्या गाभार्‍यापर्यंत पोहचले नाही. तरी देखील भगव्याच्या आडोशाला लोखंडे यांना अश्रय मिळला. २०२४ उजाडले तरी देखील लोखंडे नावाबाबत मतदार अनभिज्ञ राहिले. अर्थात जे वाकचौरे यांनी केले त्याच वळणावर लोखंडे गेले. त्यामुळे, शिर्डीचा खासदार कोण? हा एग्जिट पोल एका वृत्तवाहिनीने घेतला होता. त्यात फक्त २० टक्के मते लोखंडे यांना होती. तर, जनतेमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे पहायला मिळाले.

दरम्यान, जेव्हा सगळे साथीदार उद्धव ठाकरे यांना सोडून जात होते. तेव्हा बबन घोलप हे मोठ्या नेष्ठेने त्यांची साथ देत होते. त्यांना शिर्डी लोकसभेचे संपर्कप्रमुख म्हणून नेमले आणि त्यांनी पहिल्यांदा क्रांतीकारी निर्णय घेतले. अनेक वर्षे पदाला लटकून बसलेले, अवैध धंद्यांच्या जिवावर मोठे झालेले, मलिदा गोळा करणारे, ग्लोनी आलेले बहुतांशी पदाधिकारी पदाहुन पायऊतार केले.(त्यात काही चांगले देखील होते) मात्र, हे उद्धव ठाकरे यांच्या आसपास असणार्‍यांना खपले नाही. त्यांनी तेव्हापासून घोलप यांना दुसावट्यासारखी वागणून देण्यास सुरुवात केली. खुद्द ठाकरे यांनी देखील घोलपांना टाळले. मध्यस्तींनी केवळ वकीली केली. मात्र, घोलपांची पुर्णत: मानहाणी करण्याचा प्रयत्न केला. इतकेच काय! तर, घोलप यांनी ज्या नियुक्त्या केल्या होत्या, त्या देखील रद्द केल्या आणि पुन्हा काही जुन्या लोकांना पुर्ववत केले. हे म्हणजे अक्षरश: नाकावर टिच्चून केल्यासारखी कृती होती.

दरम्यानच्या काळात घोलप यांची एका कायदेशीर गोची त्यांना आडकाठी ठरत होती. त्यानंतर यांनी थेट शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. खरंतर जुने कारणामे त्यांना अडथळा ठरले नसते. तर, कदाचित लोखंडे यांच्या ऐवजी तेव्हाच घोलप उमेदवार असते. यात सर्वात महत्वाचे म्हणजे लोखंडे यांची उमेदवारी लांबविण्याचे कारण देखील हेच होते. घोलप यांचे एका प्रकरण न्यायप्रविष्ठ होते, त्याचा निकाल काही दिवसात लागणार होता. मात्र, त्यावर तारीख पे तारीख झाली आणि तो विषय प्रलंबित राहिला. त्यामुळे, प्रचारासाठी वेळ कमी पडायला नको म्हणून लोखंडे यांचे नाव अंतिम टप्प्यात घोषित करण्यात आले. आता मात्र, घोलप यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे कधी काय होईल हे सांगता येत नाही. तर, महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची आणि बबन घोलप यांची शिर्डी लोकसभा विषयावर गोपनिय बैठक झाली आहे. त्यामुळे, उद्या लोखंडे हे घोलप यांचा प्रचार करताना दिसले तर आश्‍चर्य वाटण्याचे काहीच कारण नाही. यात एक मात्र नक्की. की, घोलप असो वा आठवले हे उमेदवार झालेच तर सहज असणारा विजय हा भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासाठी किचकट झाल्याशिवाय राहणार नाही अशी सुज्ञ मतदारांना वाटते आहे.

क्रमश: भाग ६