नगर अर्बन बॅंक लुटणारा कोट्यावधींचा घोटाळेखोर अमित पंडित लग्नातून पळाला, बेडरुम मधून अटक.!

 

सार्वभौम (संगमनेर) :- 

                नगर जिल्ह्यातील बहुचर्चित नगर अर्बन बॅंक घोटाळ्याचे धागेदोरे आता संगमनेर मध्ये पोहोचले आहेत. मा. महसुलमंत्री यांच्या विश्वासातील प्रतिष्ठित उद्योजक व अमृतवाहिनी बँकेचा माजी चेअरमन अमित पंडीत याने परीस, पुष्कराज इस्पाक व पुष्कराज ट्रेडींग आशा कंपन्या स्थापन करून त्यावर कोट्यवधींचे कर्ज काढले. त्या कंपन्या परस्पर विकुन कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचे निष्पन्न झाले होते.  तेव्हापासून अमित पंडीतसह त्याची पत्नी व मुलगा हे फरार झाले होते. मात्र, अमित पंडीत हा आज एश्वर्या पेट्रोल पंपाच्या पाठीमागे राहत्या घरातुन दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास  संगमनेर शहर पोलीस निरिक्षक भगवान मथुरे यांच्या विशेष पथकाने ताब्यात घेतला आहे. नगर अर्थिक गुन्हे शाखेमध्ये त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होता. अमित पंडीत हा मा. महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे अगदी विश्वासु कार्यकर्ते आहे. त्याला अटक झाल्याने संगमनेर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अमित पंडीत याने वेगवेगळ्या तीन कंपन्या स्थापन केल्या होत्या. यापैकी परीस ,पुष्कराज इस्पाक आणि पुष्कराज ट्रेडींग आशी कंपन्यांची नावे होती. यामधील काही कुटुंबातील सदस्यांच्या देखील नावावर होत्या. या  कंपन्यांनी नगर अर्बन बँकेकडून 20 ते 22 कोटींच्या जवळपास कर्ज घेतले होते. एक कंपनीच्या नावावर कर्ज घ्यायचे आणि ती कंपनी दुसऱ्या कंपनीला विकून बँकेच्या डोळ्यात धुळफेक करायची. तीच कंपनी दुसऱ्या कंपनीला परस्पर विकली म्हणजे बॅंकेच्या अडचणी वाढत होत्या आणि हा मात्र नामानिराळा रहात होता. एक कंपनी रजिस्टर करायची दुसऱ्या कंपनीला विकायची असा याचा उद्योग सुरु होता. मात्र, कर्ज नियमीत न भरल्याने हे कर्ज इतके थकले की 30 ते 32 कोटींच्या आसपास गेले. ही सर्व रक्कम नगर अर्बन बँकेला देणे होते. काही कंपन्या बुडाल्या तर काही विकल्या या दरम्यान नगर अर्बन बँकेला कर्ज भरले नाही. त्यामुळे, बँकेचे मोठे नुकसान झाले. तर याने मात्र आपली मालमत्ता क्षितीजापार नेवून ठेवली. एकीकडे गुंतवणूक तर दुसरीकडे पेट्रोल पंपासह अलिशान बंगले. तसेच उच्च राहणीमान आणि आमदार, नामदार, खासदार यांच्यासोबत उठणे बसणे ऐटीत सुरु होते.

         दरम्यान, कंपनी स्थापन करून कधी सहा कोटी तर कधी नऊ कोटी पुन्हा सहा कोटी असे कोट्यावधी रुपयांचे कर्ज याने घेतले होते. हे कर्ज नियमीत भरले नाही. त्यामुळे, बँकेने वारंवार पत्रव्यवहार केला. ह्या कर्जचा डोंगर इतका झाला की, अमित पंडीत सह त्यांची पत्नी आणि मुलगा यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला. इतकेच काय.! त्याच्या मित्राला देखील आरोपी व्हावे लागले. जितका पैसा कमवला, जितकी मौज मजा केली तितके तोंड लपून फिरण्याची वेळ अमित पंडित याच्यावर आली. कागदोपत्रात स्वत:ला पंडित समजणारा व्यक्ती थेट आरोपी म्हणून आता जेलमध्ये बसला आहे. कागदात अफरातफर, बनावट कागदपत्रे, बॅंकेची फसवणूक अशी अनेक आरोप झाल्यापासून तो संगमनेरातुन फरार होते. मात्र, आज एका नगरसेवक व्यापाऱ्यांच्या मुलीचे लग्न होते. त्या लग्नाला अमित पंडीत हे भेट देणार ही कुणकुण संगमनेर शहर पोलिसांना लागली. पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी एक पथक तयार करून अगदी करडी नजर अमित पंडीत यांच्यावर ठेवली आणि त्याचा मागमुस घेऊन त्यास बेड्या ठोकल्या आहेत.

पोलीस थेट लग्नात पोहचले.!

शनिवार दि. 16 मार्च 2024 रोजी दुपारच्या सुमारास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेला संगमनेर शहरातून कोणीतरी फोन केला. की, तुम्हाला पाहिजे असलेला आरोपी अमित पंडित हा एक व्यापाऱ्याच्या लग्नात आलेला आहे. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपाधिक्षक यांनी संगमनेर पोलीस निरिक्षक भगवान मथुरे यांच्याशी संपर्क साधून संबंधित मंगल कार्यालय येथे सापळा रचून पंडित याला ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मथुरे यांनी चोख भुमिका पार पाडून महिलांसह 10 जणांचे पथक तयार करुन थेट व्यापाऱ्याच्या लग्नात प्रवेश केला. लग्नात कोणत्या प्रकारचा व्यत्यय येणार नाही याची काळजी घेऊन चारही बाजुंनी सापळा लावला. पण, कदाचित अमित पंडित याला देखील पोलिसांच्या येण्याची चाहुल लागली होती. त्यामुळे त्याने लग्नातून तत्काळ काढता पाय घेतला. त्यानंतर पंडितने थेट घर गाठले आणि तो ज्या घोटाळ्याच्या पैशातून मौजमजा करीत होता. लोकांच्या कष्टाचे पैसे लुटून निवांत झोपत होता. त्या घरातील बेडमध्ये जाऊन दडून बसला होता. कदाचित त्याला शंका आली नसती तर पंडितला थेट लग्नमंडपातून अटक केली गेली असती.

अशी झाली अटक.!

दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास आरोपी अमित पंडित लग्नातून पळाला होता. त्याने थेट घर गाठले आणि कोणी आले तर मी घरी नाही असे सांग असा निरोप पत्नीकडे दिला. त्यानंतर, पोलीस निरिक्षक मथुरे यांचे विशेष पथक, डेप्युटींचे पथक, डिबी कर्मचारी, महिला कर्मचारी व अधिकारी यांनी पंडितच्या घराची बेल वाजविली, ताईसाहेबांनी दार उघडले आणि त्यांना चांगलाच झटका बसला. अमित पंडित आहेत का घरात? पोलिसांनी प्रश्न करताच ताईंनी खोटे बोलत नाही म्हणाल्या, साहेब पंपावर गेले आहेत, घरात कोणा नाही असे म्हणत त्यांनी पोलिसांना उडवाउडविची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी त्याचा पाटलाग केला होता. त्यामुळे तो घरात असल्याची खात्री होती. त्यावर अधिकाऱ्यांनी घरझडती घेण्यास विनंती केली. मात्र येथे सौ पंडित आणि पोलीस यांच्यात शाब्दीक चकमक झाली. मात्र, "आधी खाकी मग बाकी" त्यानुसार महिला कर्मचाऱ्यांनी ताईंना बाजुला केले आणि पोलिसांनी थेट घरात प्रवेश केला. कोट्यावधी रुपयांच्या अलिशान घरात आरोपी पंडितचा शोध घेताना नाकीनव आले. मात्र, आरोपी त्याच्या बेडरुममध्ये दडून बसला होता. पोलिसांनी त्याला एका बेडच्या कोपऱ्यातून ताब्यात घेतले आणि थेट बेड्या ठोकून पोलीस ठाण्यात आणले. स्टेशन डायरीला ऐन्ट्री करुन पंडित याला नगर येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या टिमच्या ताब्यात देण्यात येणार आहे.