..अखेर रुद्रचा मृदतेह आडात सापडला, पतंगाने चिमुरड्याचा जीव घेतला, आईने फोडला टाहो.!
काल दुपारी अकोले शहरातील थेटर गल्ली येथून एक पाच वर्षाचा मुलगा गायब झाला होता. सायंकाळी उलटून गेली तरी तो घरी येईना म्हणून शोधाशोध सुरू झाली. पोलिसांनी पाच पथके रवाना करुन अनेक संशयित बाबी तपासल्या. सोशल मीडियावर देखील या बाळाचे व्हायरल करण्यात आले. नदी, नाले, ओढे, गटारी अशी अनेक ठिकाणे पायाखाली घातली. मात्र, रात्री ११ वाजले तरी त्याचा शोध लागला नाही. त्यानंतर जी मुले दुपारी पतंग खेळत होती. त्यांचाकडे चौकशी केली आणि काही ठिकाणी सीसीटीव्ही तपासले. त्यानंतर या मुलाचा मागमुस लागला. अंतीमत: सखोल तपास करताना चिरेबंदी वाडा येथील एका ६० ते ७० फुट आडात संबंधित मुलाचे प्रेत दिसून आले. त्यानंतर त्याची आई आणि वडिलांनी एकच टाहो फोडला. रुद्र आकाश पवार (वय ५, रा. थेटर गल्ली, अकोले) असे मयत मुलाचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी. की, सोमवार दि. १५ जानेवारी रोजी संक्रांत असल्यामुळे शाळेला सुट्टी होती. दुपारी रुद्रने जेवण केले आणि तो मुलांसोबत खेळायला गेला. संक्रांतीचा सन असल्यामुळे काही मुले मोकळ्या पटांगणात तर कोणी गच्चीहून पतंग उडवत होते. हा सर्व खेळ रुद्र पहात होता. त्यानंतर एका कटलेल्या पतंगाच्या मागे धावत धावत काही मुले चिरेबंदी वाड्याकडे गेली. मात्र, त्यातील काही मुलांनी पतंगाच्या मागे पळणे सोडले तर रुद्र तो पतंग घेण्यासाठी त्या परिसरातील अडगळीत गेला. आपल्याला पतंग मिळावा या आशेने त्याने कोणताही विचार केला नाही. त्यामुळे, अडचण असली तरी त्याने पतंगाला जवळ करणे पसंत केले.
दरम्यान, तो पतंगाचा पाटलाग करताना एका ठिकाणी पत्रा होता. त्यावर त्याने उडी मारली. मात्र, त्या पत्र्याखाली खुद्द रुद्रसाठी यमराज येऊन बसले होते. कोणाच्या काही लक्षात येण्यापुर्वीच अघटीत घटना घडली आणि पत्र्याखाली असणार्या ६० ते ७० फुट खोल आडात रुद्र पवार हा चिमुरडा पडला. चिरेबंदी वाड्यात असणार्या या आडगळीच्या ठिकाणी कोणी जाईल अशी शंका देखील कोणाला नव्हती. त्यामुळे, तेथे आवाज दिला तरी कोणाला ऐकू जाईल अशी परिस्थिती नव्हती. रुद्र आडात पडल्यानंतर त्याने प्रचंड आवाज दिला असेल, रडला असेल, त्याने एकच आकांत केला असेल. मात्र, आडाचा व्यास कमी असल्यामुळे त्याचा आवाज बाहेर येऊ शकला नाही. अखेर प्रचंड भिती आणि भेदरलेल्या आवस्थेमुळे त्याने प्राण सोडले असा अंदाज डॉक्टरांनी वर्तविला आहे.
दरम्यान, जेव्हा दुपारी २:३० वाजता रुद्र खेळण्यासाठी घराबाहेर पडला. त्यानंतर सायंकाळ झाली तरी तो घरी आला नाही. म्हणून त्याची आई आणि अन्य वाड्यातील व्यक्तींनी त्याची शोधाशोध केली. मात्र, त्याचा काहीच पत्ता लागला नाही. अखेर सोशल मीडियावर त्याचा फोटो आणि काही माहिती फिरविण्यात आली. मात्र, तरी देखील कोठून प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर नातेवाईकांनी थेट पोलीस ठाणे गाठले आणि पोलीस निरीक्षक विजय करे यांना हकीकत सांगितली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल केला आणि त्यापुर्वी आपल्या पाच टिमा मुलाच्या शोधासाठी रवाना केल्या. एकीकडे कायदेशीर प्रोसेस आणि दुसरीकडे युद्धपातळीवर तपास सुरू होता. त्यासाठी नगरहून काही यंत्रणा हलविण्यात आली होती. मात्र, तरी देखील मुलाचा शोध लागला नाही.
पोलिसांनी मुलाच्या शोधासाठी गल्ली न गल्ली धुंडाळून काढली. असे एकही ठिकाण नव्हते जेथे पोलीस पोहचले नाही. असा एकाही संशयित व्यक्ती सोडला नाही ज्याच्यावर शंका होती. मात्र, मुलाचा शोध लागत नव्हता. पोलिसांची एक टिम सीसीटीव्ही तपासत होती. तर एक टिम त्याची चौकशी करत होती. एक टिम नदी, नाले, विहिर शोधत होती तर काही व्यक्ती तांत्रिक दृष्ट्या तपास करीत होती. कारण घटस्थापना आणि संक्रात या काळात अकोले तालुक्यात वेगवेगळे प्रकार झाल्याचा इतिहास आहे. त्यामुळे, अनेकांच्या काळजाचे ठोके द्वितगतीने पडत होते. यावेळी पोलीस निरीक्षक विजय करे आणि त्यांची टिम मुलगा घरापासून ते त्याचे अंतीम लोकेशन काय होते? याची चौकशी करीत पुढे सरकत होते.
दरम्यान, एका महिलेने सांगितले. की, सायंकाळी काही मुले पतंगाच्या शोधात या दिशेने गेली होती. त्यानंतर पोलिसांनी सुताहून स्वर्ग गाठला. अंतीमत: रुद्र पवार हा चिरेबंदी वाड्यातील एका आडात पडू शकतो अशी शंका आली. त्यानंतर रात्री १० वाजण्याच्या सुमारास त्या आडात कॅमेरा आणि बॅटरी खाली सोडण्यास आली होती. तेव्हा तो त्यात दिसून आला. पोलिसांनी त्यास काही तरुणांच्या मदतीने वर काढले. त्यानंतर रुद्रचा मृतदेह अकोले ग्रामीण रुग्णालय येथे आणला. त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. मात्र, या घटनेमुळे मयत रुद्रचे आई-वडिल आणि नातेवाईक यांनी एकच टाहो फोडला होता. त्यामुळे, उपस्थितांच्या अंगावर शहारे दाटले होते. या घटनेने संपुर्ण शहर हळहळुन गेले होते.
गेल्या तीन दिवसात अनेक व्यक्ती आणि पशू पक्षांचे बळी या पतंगाने घेतले आहे. कोणाचे गळे चिरले आहेत तर कोणाला प्रचंड मोठ्या दुखापती झाल्या आहेत. तरी देखील मांजा वापरणे थांबले नाही आणि पतंग उडविणे देखील थांबले नाही. अर्थात सन उत्सव साजरे केलेच पाहिजे. पण, कोणाचा जीव घेऊन सन साजरा होत असेल तर यावर विचार केला पाहिजे. किमान आता तरी मुलांना या मांजा आणि पतंगापासून बाजुला ठेवले पाहिजे. स्वत:ची जीव गेला तरी चालेल पण पतंग हवा ही भावना कमी होण्यासाठी एकतर पालकांनी मुलांना तोडका मोडका पतंग तरी उपलब्ध करुन द्यावा. किंवा आपल्या लेकरांना पतंग ही संकल्पनाच आवडणार नाही. अशी त्याची मानसिकता करावी. पण, पतंगापासून असे जीवघेणे प्रकार टाळले पाहिजे.