भरल्या डोळ्यांनी मधुभाऊंचे पालकांना वचन, मुलांचे नुकसान होऊ देणार नाही.! विरोधकांनी संस्थेला ओरबडू नये.!

  

सार्वभौम (अकोले) :-

    काल (दि.९) धर्मादाय आयुक्तांनी अभिनव शिक्षण संस्थेबाबत एक खळबळजणक निकाल दिला आणि तालुक्यात एकच चर्चा रंगली. त्यानंतर तर्क वितर्क पुढे येऊ लागल्याने पालकांची मने दोलायमान झाली. या सर्व गोष्टींवर एकच उत्तर होते, ते म्हणजे अभिनव शिक्षण संस्थेचा श्‍वास मधुभाऊ नवले. त्यांनी जरा देखील अस्थिर न होता पालकांशी संवाद साधला आणि त्यांना वचन दिले. की, संस्थेच्या अंतर्गत वादाचे काय होईल माहित नाही. पण, आमचे शिक्षक आणि व्यवस्थापन एका सुद्धा विद्यार्थ्यांचे यत्किंचितही नुकसान होऊ देणार नाही. तसेच विरोधकांना विनंतीवजा सुचना करीत त्यांनी आवाहन केले. की, आपल्या वादाचे काय होईल ते कायदेशिर पाहू. पण, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल हा विद्यार्थ्यांच्या परिक्षांचा काळ आहे.  त्यामुळे, येथील शैक्षणिक वातावरण दुषित होणार नाही. याची नैतिक जबाबदारी म्हणून काळजी घेतली पाहिजे. सन १९९२ ते २०२३ हा ३० वर्षाचा काळ क्षणभरात मांडताना त्यांचे डोळे पान्हावले होते.

दै. रोखठोक सार्वभौमशी बोलताना मधुभाऊ म्हणले. की, अभिनव शिक्षण संस्थेला जन्म देताना आम्ही प्रचंड कळा सोसल्या आहेत. मात्र, आज या गोष्टीचे वाईट वाटते. की, हे लेकरु आपल्या मांडीहून कोणीतरी बोचकडून, हिसकडून घेण्याचे प्रयत्न करीत आहे. अर्थात आमचे पालकत्व गेल्याचे आम्हाला जरा देखील दु:ख वाटणार नाही. पण, काल एक लेकरांचे मातृत्व असणारी संस्था आज तीन हजार बालकांचे दायीत्व स्विकारुन बसली आहे. अन इतक्या मुलांचे आयुष्य अंध:काराच्या खाईत लोटले जात आहे. ते आम्ही उघड्या डोळ्यादेखत कसे पाहू शकतो? म्हणून जीवाचा आकंत होतो आहे. खरंतर तेव्हाच १९९२ मध्ये प्रवाहात वहायचे असते तर माध्यमिक विद्यालये काढून मोकळा झालो असतो. पण, या तालुक्यातील मुलांचा शैक्षणिक पाया पक्का करण्याच्या हेतूने प्रायमरी, सेकंडरी आणि सीबीएससी पॅटर्न तालुक्यात आणला पाहिजे हे स्वप्न उराशी बाळगले होते. आज ते स्वप्न साकार झाले खरे पण त्याची रोख रांगोळी करण्याचे काम काही लोक करु पहात आहे.

खरंतर अभिनव शिक्षण संस्था सुरू झाली आणि चार वर्षानंतर माझा अपघात झाला. त्यानंतर तीन वर्षे मी मृत्युशी झुंज देत होतो. तेव्हा संस्थेची परिस्थिती काय होती हे नव्याने सांगण्याची गरज नाही. पण, जेव्हा देवाने जगण्याचे बळ दिले त्यानंतर स्व. खांडगे सर आणि आम्ही अभिनवचा वेलु अगदी गगणाला भिडविला. संस्थेला जागेची गरज होती. तर, स्वत:च्या नावे कर्ज काढून शाळेसाठी चार एकर जागा खरेदी केली, त्यानंतर असे प्रसंग अनेक वेळा आले. पण, संस्थेच्या गगनभेदी भरारीला आम्ही कधी वेसन घातली नाही. दुर्दैवाने संस्थेच्या वाटेत आज नकळत अनेक समस्यांचे डोंगर उभे राहिले आहे. आज ही संकटं दुर करताना प्रचंड यातना आणि वेदना होत आहे. मात्र, आम्ही मनोधैर्य खचलो नाही. संस्थेच्या वटवृक्षाचे व्रत आम्ही स्विकारले आहे ते तसूभर सुद्धा डळमळीत होऊ देणार नाही.

आज संस्थेत प्रायमरी स्कुल, सेकंडरी स्कुल, सीबीएससी पॅटर्न, डिएड, बीएड, एमबीए, पत्रकारीता अभ्यासक्रम, आदिवासी मुलांचा प्रोजेक्ट असे अनेक अभ्यासक्रम आहेत. संस्थेचे नाव रुपाला आले आहे, जागतीक पातळीवर काही विद्यापीठांशी टायब झाले आहे, वेगवेगळे राज्य व राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार संस्थेला मिळत आहे, शाळेचे विद्यार्थी राज्यपातळीवर झळकत आहेत. म्हणून तर काही व्यक्तींच्या जेलोसितून काही मतभेद निर्माण झाले आहेत. त्यामुळे, गुणवत्ता आणि भरारी हेच दु:ख असेल. तर, येणार्‍या काळात मी मुलांचे भविष्य कोणाच्या हाती देऊ शकत नाही. म्हणून मला कायदेशीर लढा लढायचा आहे. जेव्हा संस्था उभी केली जात होती. तेव्हा मुलांचे पाया पक्का करुन त्यांना सामाजिक व बौद्धीक दृष्ट्या या जगाच्या रेसमध्ये उतरविण्याचे स्वप्न मी पाहिले होते. आज त्या स्वप्नांच्या वेलीला बहर येऊन फळे आली तर काहींनी हव्यासापोटी मुळांवर घाव घालणे सुरू केले आहे. अर्थात त्यातून माझे नव्हे.! तर तीन हजार विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारमय होणार आहे. म्हणून मला लढायचे आहे. अर्थात ही माझ्या विजयासाठी नव्हे.! तर माझ्या वैचारिक मुल्यांची लढाई असणार आहे.

उद्याचा काळ काय असेल हे माहित नाही. पण, मुलांसाठी, पालकांच्या शब्दपुर्तीसाठी, माझ्या वैचारिक मुल्यांसाठी मी येणार्‍या काळात हा लढा लढणार आहे. जर मी लढलो नाही. तर, उभी हयात मी स्वत:ला माफ करू शकनार नाही. कारण, आजवर मी जे काही जगलो आहे. ते एक कार्यकर्ता म्हणून जगलोय. नेता व पुढारी म्हणून कधी मिरवलो नाही. म्हणून माना सन्मानाने जनता, शिक्षक, पालक, सहकारी, विद्यार्थी आणि नात्यागोत्यांनी मला आदराचे स्थान दिले आहे. त्यामुळे, मी प्रमाणिकपणे लढेल आणि जिंकेल देखील. तोवर पालकांनी आम्हाला सहकार्य कारावे.