शुभ मंगलं सावधान.! मिरवणुक सुरु असताना डिजेचे ब्रेक फेल, आख्खं वऱ्हाड चिरडलं, दोघांचा मृत्यू, 15 जण जखमी.!
संगमनेर (सार्वभौम) :-
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथे नवरदेवाच्या मिरवणुकीमध्ये अचानक डीजेच्या गाडीचा ब्रेक लागला नाही. त्यामुळे, या डिजे चालकाने समोर असणारे आख्खे वऱ्हाड चिरडले. यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दहा ते पंधराजण गंभीर जखमी असुन खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहे. बाळासाहेब हरिभाऊ खताळ (वय 48 रा. धांदरफळ, ता. संगमनेर) व भास्कर राधु खताळ (वय 73 रा. धांदरफळ खुर्द, ता. संगमनेर) अशी मयत व्यक्तींची नावे आहे. ही खळबळजणक घटना आज गुरुवार दि. 4 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान घडली. या घटनेने संपूर्ण धांदरफळ खुर्द गाव आणि संगमनेर तालुका हळहळ व्यक्त करीत आहे. सदर घटना घडताच पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली आणि पुढील कारवाई सुरु केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, किसन रंगनाथ खताळ यांच्या मुलाचे संगमनेर तालुक्यातील रणखांब येथे लग्न होते. त्यामुळे, सर्व नातेवाइक व वऱ्हाडी मंडळी नवरदेवाच्या मिरवणुकीसाठी उपस्थित होते. नवरदेवाची घरुन मिरवणूक निघाली. मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. गाजत वाजत ही मिरवणुक गावाच्या दिशेने चालली होती. आनंदात असलेल्या ह्या सोहळ्यात लोक मिरवणूकीत सहभागी झाले. गावात नवरदेव जात असताना एम. एच.१६.ए.इ. २०९७ या डीजेच्या गाडी समोर वऱ्हाडी चालली होती. मात्र, ही डीजेची गाडी गावातील डांबरी रस्त्यावर आली आणि तिने वेग पकडला. पण, अचानक डीजेच्या गाडीला ब्रेक लागला नाही. त्यामुळे, काही क्षणात होत्याचे नव्हते झाले. डीजेच्या गाडीने भर मिरवणुकीत माणसे चिरडली. डीजेसमोर चाललेल्या माणसांना हालचाल देखील करून दिली नाही. काहीक्षणात तेथे सर्वरक्त रस्त्यावर दिसत होते. दोघेजण रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.
दरम्यान, डीजेची गाडी इतकी वेगाने होती. की, पळण्यासाठी मिरवणुकीतील लोकांना संधी सुद्धा मिळाली नाही. येवढे मोठे अवजड वाहनाचा धक्का लागल्याने मार मोठ्याप्रमाणात लागला. त्यामुळे, दहा ते पंधरा नागरिक मोठ्या प्रमाणावर जखमी झाले. मात्र, दोघेजण घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडले त्यांचा जागीच मृत्यू झाला. जखमी व्यक्तींना तात्काळ दवाखान्यात हलवण्यात आले. संबंधित घटना घडल्यानंतर स्थानिक व्यक्तींनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. अपघात झालेला डीजेची गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. फिर्याद दाखल होऊन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.