पत्रकारांचे महाराष्ट्राच नेतृत्व, कर्तृत्व, दातृत्वाचा त्रिवेणी संगम:- डॉ. विश्वासराव आरोटे
पुत्र व्हावा ऐसा गुंडा,
त्याचा तिन्ही लोकी झेंडा..
या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणाने आदिवासी अकोले तालुक्यातील एक युवक ग्रामीण भागात बातमीदारी करताना, महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांची मोट बांधतो, संघटनेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवितो, या कार्याची दखल अमेरिकेतील विद्यापीठ घेते आणि त्याबद्दल डॉक्टरेट जाहीर करते. असा हा तिन्ही लोकात आपल्या नावाचा डंका गाजवणारे व्यक्तिमत्व, पेपर विकून शिक्षण घेऊन वृत्तपत्राचे मालक झालेले अकोले तालुक्याचे भूमिपुत्र, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस, दै. समर्थ गावकरी चे मालक डॉ. विश्वासराव आरोटे होय.
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाईच्या पायथ्याशी वसलेल्या, आदिवासी डांग भाग असलेल्या अकोले तालुक्यातील चितळवेढे या छोट्याशा डोंगर कुशीतील आणि अमृतवाहिनी प्रवरामाईच्या तिरावर असलेल्या गावी विश्वासराव आरोटे यांचा जन्म झाला. परिस्थिती सामान्य असल्यामुळे शिक्षण घेत असताना सकाळी चितळवेढे येथून दूध वाटप करून, नंतर वर्तमानपत्र वाटण्याचे काम करायचे, वर्तमानपत्र वाटत असताना वर्तमानपत्र वाचण्याची गोडी निर्माण झाली. ग्रामीण भागात वृत्तपत्राचा खप वाढवायचा असेल तर त्या भागातील समस्या वृत्तपत्रात येणे आवश्यक आहे याची जाणीव विश्वासरावांना झाली. त्यानंतर त्यांनी ग्रामीण भागातूनच आपल्या पत्रकारीतेचा श्रीगणेशा केला. ग्रामीण भागातील समस्या आपल्या लेखणीच्या माध्यमातून मांडण्यास सुरवात केली. ध्येयवेडी स्वप्ने उराशी बाळगून कर्तव्य करत राहिले. यावेळी ग्रामीण भागातील वास्तवत मांडताना अनेक अडीअडचणी आल्या. अकोले तालुक्याला विचारांचा वारसा लाभलेला असल्यामुळे पत्रकारीता क्षेत्रातील अनेक ज्येष्ठ पत्रकारांशी त्यांची विचारसरणी जुळली. त्यातूनच मार्गदर्शनाची दिशा मिळत गेली . कर्तृत्व आणि नेतृत्व यांचा सुरेख संगम अस्तित्वात आला. लेखणीला चालना देता-देता ग्रामीण भागातील वास्तव मांडतांना व दैनिक गावकरी या वृत्तपत्रात काम करत असताना ग्रामीण भागातील पत्रकारांशी त्यांची नाळ जोडली गेली. त्यातूनच ग्रामीण समस्यांची उकल त्यांना झाली.
पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी काही तरी केले पाहिजे या उद्देशाने त्यांनी संघटना बांधणी सुरू केली. वार्ताहर म्हणून अनेक वृत्तपत्रांमध्ये काम केल्या नंतर तालुका प्रतिनिधी आणि नंतर विभागीय कार्यालयाचे उपसंपादक म्हणून त्यांनी ‘दैनिक गांवकरी’या उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य दैनिकाची जबाबदारी यशस्वीरीत्या पेलली. गांवकरीच्या माध्यमातून ग्रामीण भागाची, या भागातील ग्रामस्थांची विश्वासार्हता जपली. त्यांचे प्रश्न आपल्या लेखनीच्या माध्यमातून सातत्याने मांडले. पत्रकारीता करत असतानाच ग्रामीण भागातील पत्रकारांशी देखील त्यांची नाळ जोडली गेली. या पत्रकारांच्या समस्या त्यांना समझू लागल्या. या समस्या सोडविण्यासाठी काही तरी केले पाहिजे, असे त्यांना सारखे वाटत होते. त्यांनी ग्रामीण भागात काम करणार्या पत्रकारांची मोट बांधली. सर्वांना बरोबर घेऊन अकोले तालुका ग्रामीण पत्रकार संघाची स्थापना केली. या पत्रकार संघाच्या माध्यमातून त्यांनी पत्रकारांसाठी खर्या अर्थाने कार्य सुरु केले.
हे काम करत असतानाच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्यसंघटक संजयजी भोकरे यांचा संपर्क आला. दोघांचेही ध्येय एकच..पत्रकारांच्या समस्या सातत्याने मांडून त्यासाठी राज्यस्तरावर नव्हे तर राष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करणे. ध्येय्य एकच असल्याने या जोडगोळीने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून एकत्रित काम सुरु केले. पत्रकारांसाठी चालविल्या जात असलेल्या या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी राज्यस्तरीय अधिवेशने घेतली. जिल्ह्यात, तालुक्यात विविध मेळावे घेतले. राज्यभरातील सर्व जिल्ह्यातील पत्रकारांना या पत्रकार संघामध्ये सामावून घेतले. प्रत्येकाला संघाचे ओळखपत्र देऊन नवी ओळख दिली. सर्वच जिल्ह्यातील पत्रकारांचा विमा काढून खर्या अर्थाने पत्रकार संघ या पत्रकारांसाठी काम करत असल्याचा विश्वास निर्माण केला. संघटनेच्या पदाधिकार्यांनी त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना अहमदनगर जिल्हाध्यक्ष आणि नंतर राज्य सरचिटणीस या पदावर काम करण्याची संधी दिली. राज्य कार्यकारिणीवर काम करतानाच त्यांचे काम अतिशय जोमाने सुरु झाले. स्पर्धा परीक्षांबरोबरच क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या गुणवंतांचा राज्यस्तरावर पत्रकारसंघाच्या माध्यमातून गौरव केला जात आहे. हलाखीची परिस्थिती असणार्या पत्रकारांना औषधोपचारासाठी व इतर गरजा भागविण्यासाठी पत्रकारसंघाच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्नही डॉ. विश्वासराव आरोटे यांनी केला आहे. अशा राज्यभरातून अनेक पत्रकारांना संघटनेने आर्थिक मदत केली आहे. पत्रकारिता करताना नि:स्वार्थीपणाची भावना अंगीकारून पत्रकारांच्या समस्यांचे निराकरण करून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पत्रकार संघाचा अमृतवेल वाढविण्याचे काम व ग्रामीण पत्रकारांना व्यासपीठ निर्माण करून देण्याचे काम डॉ. विश्वासराव आरोटे यांनी केले.
पत्रकारांना संरक्षण मिळावे यासाठी संरक्षण कायदा व्हावा यासाठी ते नेहमीच आग्रही राहीले आहे. पत्रकारांवर होणार्या हल्ल्यांचा निषेध करत आरोपींना अटक होईपर्यंत त्यांनी पाठपुरावा केला आहे. ग्रामीण भागातील पत्रकारांनाही श्रमिक पत्रकारांप्रमाणेच अॅक्रीडीशन कार्ड मिळावे, एस. टी. बस तसेच रेल्वेसारख्या विविध सवलती मिळाव्यात, शासनाने आरोग्य विमा काढावा, पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक सवलती द्याव्यात, पत्रकारांना निवासी व्यवस्था उपलब्ध करावी या व अशा अनेक मागण्यांसाठी पत्रकार संघाच्या माध्यमातून प्रामाणिक प्रयत्न डॉ. विश्वासराव करत आहेत. त्यांनी राज्यातील सर्व पत्रकारांना हेल्मेट वाटप केले. दरवर्षी छत्री, रेनकोट वाटप करतात. डायरी, पेन, कॅलेण्डर दिले जाते. दिवाळी गोड व्हावी म्हणून मिठाई, साखरेसह तूप दिले जाते. कोरोनाच्या काळात किराणा किट, कपडे वाटप करून एकल महिलांना आधार देण्याचे काम आरोटे यांनी केले आहे. कोरोना काळात मास्क, सॅनिटायझर वाटप केले. गरिबांना अन्न धान्य, किराणा दिला आहे. आदिवासी भागात आजही ते साड्या वाटप करण्याचे काम करीत असतात. अनेक पत्रकारांना रोख मदत या काळात केली आहे. कोरोना योद्ध्यांचा मान सन्मान केला, त्यांचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन दिले.
आपण गरिबीत शिकलो, ते शिकताना जे कष्ट झेलले त्यातून एखादा गरीब विद्यार्थी मागे राहू नये म्हणून राज्यभर गरीब विध्यार्थ्यांना वह्या व शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचे काम ते करतात. या विध्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप म्हणून गुणवंत विद्यार्थी यांचा सन्मान करण्याचे काम वर्षभर चालू असते. विश्वासराव आरोटे यांच्या या कार्याची दखल अनेक संस्था घेत असतात, त्यांना अनेक पुरस्कार मिळाले असुन त्यांनी केलेल्या कार्याचा तो सन्मान आहे. त्यामुळे राज्यात आणि देशात नव्हे तर सातासमुद्रा पार अमेरिकेच्या विद्यापीठाने दखल घेत त्यांना डॉक्टरेट बहाल केली आहे. हा खरा त्यांच्या सामाजिक कार्याचा उचित बहुमान झाला असे म्हणावे लागेल.
पेपर विकताना जे स्वप्न उराशी बाळगले होते ते सत्यात उतरवत आज भांडवलशाही वृत्तपत्रांना उत्तर देण्यासाठी स्वतःच्या मालकीचे दैनिक समर्थ गावकरी सुरू केले असून ग्रामीण भागातील पत्रकारांना या वृत्तपत्राच्या माध्यमातून काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. कधीकाळी आपली बातमी पेपरात छापून यावी यासाठी कष्ट करणारे विश्वासराव आज नुसते संपादकच नव्हे तर वृत्तपत्राचे मालक झाले आहेत. या वृत्तपत्रात राज्यातील कानाकोपऱ्यातील बातम्यांना प्रसिद्धी दिली जाते. आपल्या कर्तृत्वाचा, नेतृत्वाचा अन दातृत्वाचा झेंडा देशात नव्हे तर विदेशा फडकविणाऱ्या कळसुबाई शिखराची उंची लाभलेल्या विश्वासराव आरोटे यांना उदंड आयुष्य लाभो.
- भाऊसाहेब वाकचौरे पा.
प्रसिद्धीप्रमुख (महा.म.पत्रकार संघ)