भाजपाचा नगरसेवक हितेश कुंभारसह राकेश कुंभकर्णला अटक.! भिवंडीच्या नऊ बारवाल्यांकडून खंडणी घेतली. मी मुंबईचा नगरसेवक सांगून वसुली.!
सार्वभौम (अकोले) :-
मी भाजपाचा नगरसेवक आहे, तुम्हाला जर बार चालवाचे असेल तर मला ऑर्केट्रा बारचे पाच लाख, सर्व्हीस बारचे तीन लाख आणि दरमहा २५ हजार अशी रक्कम द्यावी लागेल. अन्यथा तुम्ही कसे बार चालविता हेच आम्ही पाहतो असे म्हणून खंडणी वसुल करण्याचा प्रयत्न केला. त्यावर आठ बार चालकांनी बैठक घेतली आणि या नगरसेवकासह तिघांना धडा शिकविण्याची योजना आखली. यांनी सगळ्या बारवाल्यांकडून २७ हजार रुपये जमा केले आणि ते यांना देण्यासाठी बोलावून घेतले. यांचे म्हणणे ऐकूण घेतल्यानंतर थेट कोणगाव पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी भाजपाचा नगरसेवक हितेश कुंभार यांच्यासह तिघांवर सापळा रचला आणि २७ हजार रुपयांची खंडणी घेताना यांना रंगेहात ताब्यात घेतले. ही घटना शुक्रवार दि. २२ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी हितेश रामकृष्ण कुंभार (रा. कमानवेस, ता. अकोले, जि. अ.नगर) देवेंद्र चंद्रकांत खुंटेकर (रा. चर्चगेट, मुंबई) आणि राकेश सदाशिव कुंभकर्ण (रा. पोलीस वसाहत शेजारी, ता. अकोले) अशा तिघांना आरोपी करून अटक करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी. की, ठाणे हाद्दीत रांजणोली बायपास येथे संतोष भोईर आणि हरिष हेगडे या दोघांचा लैला बार आहे. गेल्या रविवार-सोमवारी अकोले नगरपंचायतीत निवडून आलेला भाजपाचा नगरसेवक हितेश कुंभार हा लैला बारमध्ये गेला होता. तो म्हणाला. की, मी मुंबईत भाजपाचा नगरसेवक आहे. तुमचा बार चालवायचा असेल तर मला ऑर्केट्रा बारचे पाच लाख, सर्व्हीस बारचे तीन लाख आणि दरमहा २५ हजार अशी रक्कम द्यावी लागेल. तेव्हा बार मालक संतोष भोईर म्हणाले. की, मी बाकी बार मालकांशी बोलतो आणि आमच्यात काय ठरते हे तुम्हाला संगतो. त्यानंतर भोईर यांनी देवीदास बार, किंग्स बार, किनारा बार, सरोज बार, पारो बार, सिंगर बार, स्वागत बार आणि लवली बार अशा आठ बारमालकांना बोलविले आणि भाजपाचा नगरसेवक सात लाख रोख आणि प्रत्येकी दरमहा २५ हजार मागतो आहे. त्यामुळे, काय करावे?
दरम्यान, त्यानंतर बुधवार दि. २० डिसेंबर २०२३ रोजी आरोपी हितेश कुंभार, राकेश कुंभकर्ण आणि देवेंद्र खुंटेकर हे बारमध्ये गेले. त्यांनी पुन्हा बार मालकास तंबी दिली. की, तुम्हाला जे सांगितले होते ते केले का? बार चालवायचा असेल तर तुम्हाला गुडलकमध्ये ही रक्कम द्यावीच लागेल. तेव्हा त्यांनी सांगितले. की, आम्ही पुन्हा चर्चा करतो आणि तुम्हाला पैसे देऊन टाकतो. त्यानंतर दि. शुक्रवार दि. २२ डिसेंबर २०२३ रोजी भोईर यांनी प्रत्येकाकडून ३ हजार रुपये जमा करुन २७ हजार जमा केला. त्यानंतर हितेश कुंभार आणि या तिघांनी लैला बारमध्ये बैठक बसविली. तेव्हा तिघांची ओळख काय अशी विचारणा केली असता यांनी त्यांची नावे देखील सांगितली. त्यावेळी बार मालक म्हणाले. की, वन टाईम देण्याची रक्कम फार होते आहे. त्यात काहीतरी कमी करा. तेव्हा कुंभार म्हणाला. की, तो विषय आपण चर्चेतून सॉल करु. त्यानंतर अन्य बारचे मालक लैला हॉटेलात जमा झाले. एकरकमी सात लाख ही रक्कम देणे शक्य होणार नाही. त्यामुळे आम्हाला थोडा वेळ द्या आम्ही जमा करुन तुम्हास देण्यास तयार आहे.
दरम्यान, त्यानंतर काही बारमालक चर्चेतून उठून बाहेर आले. त्यांनी थेट कोणगाव पोलीस ठाण्यात फोन केला. जे काही घडते आहे त्याची माहिती दिली. पोलिसांनी बार मालकांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. त्यानंतर कायदेशीर कारवाई सुरू झाली. पोलिसांनी दुपारी २:३० वाजता दोन पंच घेतले. त्यानंतर ५०० रुपयांच्या ५४ नोटा त्यावरील नंबर पंचांसह नमुद केले. हे २७ हजार रुपये भोईर यांच्या ताब्यात देऊन त्यांना आरोपींच्या ताब्यात देण्यास सांगितले. यावेळी पोलिसांनी साध्या वेशात ग्राहक म्हणून आजुबाजूला सापळा रचला होता. बराच वेळ झाल्यामुळे नगरसेवक हितेश कुंभार म्हणाला. की, तुम्ही पैसे देणार आहेत की नाही? अन्यथा तुमचे बार कसे चालतात हे मी पाहतो. त्यानंतर भोईर पुन्हा चर्चाला बसले. त्यांनी विनंती केली. की, आता आम्ही नऊ बारचे २७ हजार रुपये देतो आणि ठारलेली रक्कम नंतर देतो. त्यानंतर पोलिसांनी दिलेली सापळ्यातील नियोजित रक्कम भोईर यांनी हितेश कुंभार याच्या ताब्यात दिली. ती हातात घेऊन कुंभार याने पॅन्टीच्या डाव्या खिशात ठेवली. जी रक्कम एकरकमी ठरली आहे ती लवकरात लवकर देऊन टाका. ती घेण्यासाठी मी परत येईल असे म्हणून तिघे बारमधून चालते झाले.
दरम्यान, बारमधुन बाहेर पडताना अजुबाजूला सापळा लावून बसलेल्या साध्या वर्दीतल्या पोलिसांनी तिघांवर झडप मारली. त्यांची अंगझडती घेतली असता भाजपाचा नगरसेवक हितेश कुंभार याच्या खिशात पोलिसांकडे नमुद असलेल्या नोंटांचे बंडल निघाले. त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी हितेश रामकृष्ण कुंभार (रा. कमानवेस, ता. अकोले, जि. अ.नगर) देवेंद्र चंद्रकांत खुंटेकर (रा. चर्चगेट, मुंबई) आणि राकेश सदाशिव कुंभकर्ण (रा. अकोले शहर) असे निष्पन्न झाले. त्यानंतर संतोष बबन भोईर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कोनगाव पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे अकोले तालुक्यात खळबळ माजली असून हितेश आणि राकेश हे दोन्ही शांत व संयमी व्यक्तीमत्व असून हितेश हे सामाजिक कामात अग्रेसर असल्यामुळे त्याला जनतेने भाजपाकडून निवडून देत नगरसेवक केले होते. तर त्याच्याकडे पाणी पुरवठा सभापती म्हणून कामकाज दिले होते. त्यामुळे, अकोल्याचा नगरसेवक मुंबईत जाऊन बार चालकांकडून खंडणी गोळा करतो हे सर्व अकोलेकरांना अविश्वसनीय वाटते आहे.