कर्तबगार युवा संचालक, ढोकरीच्या विकासाचे पहिले आणि शेवटचे नाव विकास.! निश्चयाचा महामेरू बहुत जणांचा आधारु
- कवी ज्ञानेश पुंडे
सार्वभौम विशेष :-
महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांच्या स्वराज्याचा वचननामा होता. सर्वांस पोटास लावणे आहे, तो कोणत्या जातीचा, कोणत्या पंथाचा आणि कोणत्या धर्माचा हे महत्वाचे नाही. तो दु:खी आहे आणि त्याला मदत करायची आहे. तो संकटात आहे त्याला वर काढायचे आहे. त्याच्या प्रत्येक सुख दु:खात त्याच्या पाठीशी उभे रहायचे आहे. हा विचार राज्यांनी मावळ्यांसाठी सोडला आहे. तो खर्या अर्थाने एक मावळा म्हणून विकासराव शेटे पा. यांनी अंगिकारला आहे. घरातील पुरोगामी विचारांचा वारसा अंगिकारुन मोठ्या उमेदीने हा तरुण समाजकारणात आला. नकळत त्यास राजकीय वयल मिळाले आणि त्याचा फायदा घेत समर्थक असो व विरोधक त्याच्या सुख दु:खात उभे राहण्याचे सामर्थ्य विकासरावांच्या पंखात निर्माण झाले. लोका सांगे ब्रम्हज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण ही म्हण या तालुक्यातील अनेक बोलघेवड्या तरुण नेत्यांना लागू होते. मात्र, विकासराव यांनी कोणाला ब्रम्हज्ञान न सांगता स्वत:च्या गावापासून विकासाचा झेंडा रोवला. विरोधक कोणाला नसतात? मात्र, विरोधकांना देखील हेवा वाटावा असे काम त्यांनी करुन दाखविले. दुर्दैव या व्यवस्थेचे. की, एकेकाळी हिवरे बाजार आणि राळेगणसिद्धी ही गावे चर्चेला आली. मात्र, त्यापेक्षा अधिक प्रभावी काम विकासराव सरपंच असताना ढोकरी गावात झाले. अर्थात बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. म्हणून अशा कर्तुत्वान व्यक्तीमत्वाच्या जन्मदिनी शब्दरुपी त्यांची पाऊले वंदावी असे एक गावकरी म्हणून मला वाटते.
कुटुंब, समाज, मित्र परिवार, सहकारी या सर्वांना दारिद्ररेषेच्या वर आणण्यासाठी कायम प्रयत्नशील असणारा शांतीदूत म्हणजे विकासराव होय. एखाद्या वस्तूला परिसाचा स्पर्श व्हावा आणि त्याचे सोने व्हावे अगदी तसाच स्पर्श सन २०१० ते २०१५ साली आमच्या ढोकरी गावाला झाला आणि आमचे गाव विकासाच्या दृष्टीने राज्याच्या नकाशावर नमुद झाले. हा पाच वर्षाचा काळ म्हणजे गावाने सुवर्णकाळ म्हणून अनुभविला. म्हणून तर आज दहा-बारा वर्षे उलटली तरी देखील तेव्हा केलेल्या कामांचा उपभोग आणि योजनांचा लाभ गावातील अनेक व्यक्ती घेत आहेत. एक गोष्ट मुद्दामहून नमूद कराविशी वाटते. की, सन २०१५ ते सन २०२० या काळात ढोकरी ग्रामपंचायत निवडणुकीत माझे वडील स्व.दादाभाऊ आण्णा पुंडे हे विकासराव शेटे यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार होते. आण्णांचा दारुण पराभव झाला त्यानंतर दोन दिवसात त्यांना अर्धांगवायूचा सौम्य झटका आला होता. तेव्हा त्यांना तत्काळ संगमनेरला हलविण्यात आले होते. तेव्हा भुतकाळातील राजकारण बाजुला ठेवून तब्येतीची विचारपूस करणारी पहिली व्यक्ती म्हणजे विकासराव शेटे होते. त्यांनी आण्णांची भेट घेऊन त्यांना धिर देण्याचा प्रयत्न केला होता. म्हणून विरोधकांच्या देखील काळजावर त्यांनी आपलेपणाचा ठसा उमटविला आहे.
खरंतर विकासराव आता ४५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. नैसर्गिक रित्या त्यांची वाटचाल जेष्ठ नागरिकत्वाकडे सुरू आहे. मात्र, जसे ८५ वर्षाचा तरुण म्हणून शरदचंद्र पवार साहेबांकडे पाहिले जाते. तसेच गाव आणि तालुक्यासाठी विकासराव एक आयडॉल आहेत. मुळात आम्हाला खात्री आहे. की, त्यांचे देखील आदर्श पवार साहेब आहेत. त्यामुळे, त्यांच्या वैचारिक पाऊलांवर पाऊल ठेवून विकासराव देखील गाव आणि तालुक्यासाठी सदैव कार्यरत राहतील यात तिळमात्र शंका नाही. खरंतर त्यांच्या आयुष्यात नेहमी राजकीय उपेक्षा वाट्याला आली आहे. जनतेची इच्छा असताना देवठाण गटातून विकासराव जिल्हा परिषदेत गेले असते. मात्र, घरचा भेदी, लंका दहन. त्यामुळे, नात्यागोत्याच्या राजकारणात त्यांचा बळी गेला आणि विकासराव यांना थांबावे लागले. मात्र, आज ते अगस्ति सहकारी साखर कारखान्याचे संचालक असताना देखील त्यांनी जिल्हा परिषदेत जाऊन आमच्या गटाचे प्रतिनिधित्व करावे असे अनेकांना वाटते. मात्र, जे काही नशिबाने पदरात दिले त्याचा हसत स्विकार करुन ज्या पदावर आहेत त्याला सार्थ ठरण्याचे काम ते करत आहेत. कारखान्यात देखील आदरणीय सहकार महर्षी सिताराम पा. गायकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली एक विश्वासू सहकारी म्हणून दिलेल्या सर्व जबाबदार्या ते पार पाडतात. त्यामुळे, समाजसेवा, व्यवसायीक, सहकार, कुटुंब आणि राजकारण यात त्यांनी चांगले नाव कमविले आहे. विशेष म्हणजे त्यांना इतर तरुण राजकारण्यांसारखे टवाळक्या मारणे आणि याच्या त्याच्या कुरघोड्या करुन राजकारण करणे हे मुळीच आवडत नाही. तो त्यांची पिंड नाही. त्यामुळे, नितळ, निर्माळ आणि प्रांजळ जगणे हेच त्यांच्या आयुष्याचे गमक आहे.
खरतर एका व्यक्तीकडे किती कौशल असावीत? हे त्याच्या बुद्धमत्ता आणि जगण्याच्या शैलीतून प्रतित होते. म्हणजे समाजसेवा, व्यवसाय, सहकार, आणि राजकारण यापलिकडे आदरणीय कचरुपाटील शेटे यांनी कुटुंबाची धुरा देखील त्यांच्यावर सोपविली आहे. मुळात कुटुंबात जितकी शेती महत्वाची आहे तितकाच व्यवसाय देखील महत्वाचा आहे. या दोन्हींचा वसा आणि वारसा येणार्या पिढीने नक्की जोपासला पाहिजे. मात्र, तत्पुर्वी उच्चशिक्षण फार महत्वाचे आहे. त्याकडे घरातील कोणत्याही तरुणांनी दुर्लक्ष करता कामा नये अशी धारणा संपुर्ण शेटे कुटुंबाची आहे. कारण, पुस्तके हे जगण्याचे ज्ञान तर देतेच मात्र पुरोगामी विचारांची शिदोरी आणि संस्कार देखील शिकविते. म्हणून तर विकासराव यांच्या कुटुंबातील दोन मुले आज परदेशात शिक्षण घेत आहेत. तर बीएस्सी ऍग्री, सिव्हिल इंजिनिअर असे उच्चपदस्थ मुलं कुटुंबात असून त्यांचे मोठे बंधू क्लासवन ऑफिसर बाळासाहेब शेटे हे अधिक्षक अभियंता म्हणून नगर जिल्ह्यात कार्यरत आहेत. त्यामुळे, हे कुटुंब जितके धार्मिक आहे तितकेच पुरोगामी विचारांचे पाईक आहेत. जितके एकसंघ आहेत तितकेच ते सामाजिक देखील आहे. एखाद्या गावातीलच काय.! पण, वाटसरुने देखील वाड्यावर जावं आणि हक्काने मदत मागावी इतकं प्रेमळ कुटुंब दादांनी उभं करून ते विकासरावांच्या खांद्यावर दिले आहे. त्याच विश्वासाने विकासराव तसूभर सुद्धा ते कोठे कमी पडताना दिसत नाहीत.
जसे घर परिवार तसाच आपला गाव हिच भावना त्यांच्या ह्रदयात दृढ झाली आहे. म्हणून जिल्हा परिषदेची शाळा असो व देवस्थान, ग्रामपंचायत असो व सोसायटी ह्या कोणाच्या ताब्यात आहेत हे महत्वाचे नाही. त्यांचा विकास होणे, त्यांच्यासाठी निधी आणणे यासाठी विकासराव नेमही पुढे असतात. गावातील कुणीही शिक्षण व आरोग्याच्या बाबतीत अडचणीत आला. तर, अशा प्रत्येकाच्या मदतीला विकासराव धावून जातात. खरंतर काही गोष्टी सांगायच्या नसतात. पण, तरी त्या उदात्त विचारांना शब्दबद्ध करावे हे आपले कर्तव्य आहे. म्हणून मोठ्या गर्वाने सांगावे वाटते. की, त्यांनी चार विद्यार्थ्यांना दत्तक घेतलेले आहे. पण त्याचा ते कुठे गाजावाजा करत नाहीत. आमच्या गावातील शेकड्याहून अधिक विकासकामे हे त्यांच्या कर्तुवाची साक्ष देतात. त्यामुळे त्यांच्या नावाला शोभा देईल असे काम त्यांनी ढोकरी गावासाठी केले आहे. आजवर त्यांची कोणतीही निवडणुक असुद्या गावाने त्यांना साथ दिली आहे. येणार्या काळात देखील तालुक्यात आणि जिल्ह्यात प्रतिनिधित्व करण्याची त्यांना अधिकची संधी मिळाली. तर राजकीय आखाड्यात कधीही पाठ न टेकविलेल्या या अजिंक्य योद्ध्यास आमचे गाव कधीच पाठीवर पडू देणार नाही.
खरंतर २५ डिसेंबर हा जन्म दिन खूप यशस्वी लोकांचा असतो. त्यात जगाला शांतीचा संदेश देणार्या येशू ख्रिस्तांचा आणि भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा आज जन्मदिन असतो. या महान व्यक्तीमत्वाशी मी यांची तुलना मुळीच करणार नाही. पण, जागाला हेवा वाटावा असे प्रभू येशू आणि वाजपेयी यांचे काम आहे. त्यांच्या कतुर्र्वाचा एक पैलु म्हणून नक्कीच गावाला आणि तालुक्याला हेवा वाटावा असे विकासराव यांचे काम आहे. बाकी जळणारे जळत राहतील, टिकाकार वाढत राहतील आणि विकासराव त्यांचे सत्कर्म करत राहतील. शेवटी देवाला सुद्धा नावे ठेवणारे आणि महापुरुषांची देखील विटंबना करणारे लोक या पृथ्वीतलावर आहेत. त्यात विकासराव काय चिज आहे. त्यामुळे, कोण काय म्हणेल याकडे दुर्लक्ष करुन हा विकासाचा रथ अविरत ते पुढे नेत रहो हिच त्यांना सदिच्छा.!
- गणेश रा. पुंडे (ढोकरी)