आण्णा वैद्य खुन प्रकरणी आठ जणांवर गुन्हे.! चौघे ताब्यात, त्याला धिंड काढून अर्धनग्न होईपर्यंत मारला.!

      
सार्वभौम (अकोले) :-

     चार महिलांची हत्या केल्याचा आरोप आणि एका गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगून आलेल्या आण्णा वैद्य (रा. सुगाव खुर्द. ता. अकोले, जि. अ.नगर) याची काल रविवार दि. १० डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी त्याच्याच गावात गावकर्‍यांनी निघृणपणे हत्या केेली. एका मुलीने त्याच्या झाडाचे पेरु तोडले म्हणून तिच्या घरात घुसून तिच्याशी घाणेरडे कृत्य केले. तर, तिला बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी जमावाने त्याला देखील घरातून ओढून चव्हाट्यावर आणले आणि त्याला मरेपर्यंत चोप दिला. यात त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर वैद्य यांचा मुलगा प्रशांत वैद्य याने अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी आठ जणांना आरोपी केले आहे. त्यात रविंद्र सुर्यभान सोनवणे, बापू दिलीप अभंग, सुनिता रविंद्र सोनवणे, सोमनाथ गबाजी मोरे, सविता गणेश वाकचौरे, सागर मंगेश दिवे, स्वाती सागर दिवे, दत्ता सोनवणे यांच्यावर फिर्यादीनुसार गुन्हा नोंदविला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी. की, आण्णा वैद्य हा २००५ मध्ये सिरियल किलर म्हणून जेलमध्ये गेला होता. तो २०१८ मध्ये येरवाडा जेलमधून बाहेर आला होता. त्यानंतर तो एकटाच सुगाव खुर्द या गावात राहत होता. दरम्यान, काल रविवारी (दि.१०) एक मुलगी त्याच्या घराजवळ खेळत होती. तेथे असणार्‍या एका पेरुच्या झाडाचा पेरु तिने तोडला असे आण्णा वैद्य याला वाटले आणि त्याने त्या ११ वर्षाच्या मुलीस आवाज दिला. मात्र, गुन्हेगारी प्रवृत्तीचा हा व्यक्ती असल्याने मुलगी त्याच्याकडे गेली नाही. तेव्हा त्याने तिला मोठ्याने आवाज दिला. इकडे ये नाहीतर तुला मारुन टाकीन, तुझा मृतदेह एका लाकडाला बांधून नदीत फेकून देईल अशा प्रकारची धमकी दिली. त्यामुळे, मुलगी प्रचंड घाबरली.

दरम्यान आण्णा वैद्य आणि या मुलीचे घर यात किमान तिनशे ते चारशे मिटरचे अंतर आहे. तरी देखील तो मुलीच्या घरी गेला. तेथे जाऊन तिला आवाज दिला. मात्र, भितीपोटी तिने दार लावून घेतला होता. आण्णाने एका लाथेत दरवाजा तोडला आणि मुलीस मारहाण सुरू केली. तिला घराबाहेर काढून भर गल्लीतून रस्त्याने मारहाण करीत त्याच्या घराकडे नेले. तो तिला घरात ओढून नेत असताना तेथे काही महिला आल्या. असे काही करु नका, ती लहाण मुलगी आहे असे त्या म्हणाल्या असता वैद्य याने महिलांना देखील धमकी दिली. अर्थात याने यापुर्वी चार मर्डर केले असे आरोप असल्यामुळे महिलांनी फारशी धाडस केली नाही. मात्र, त्याच वेळी काही माणसे तेथे आले. या मानसांनी संबंधित अल्पवीन मुलीची सोडवणुक केली. तेव्हा मुलीला वैद्य याने प्रचंड बोचकले होते.

दरम्यान, हा सर्व प्रकार गावातील काही व्यक्तींना समजला. तेव्हा त्यांनी थेट वैद्य याचे घर गाठले. तु त्या मुलीसोबत असे का वागला? अशी विचारणा केली असा वैद्य याने त्यांना देखील मारहाण केली. मात्र, सायंकाळी गावात मोठा जमाव जमला आणि त्यांनी आण्णा वैद्य याच्या पापाचा घडा भरविण्याचा ठरविलेे. त्याने जसे मुलीस घरातून ओडून अमाणूष मारहाण केली. त्यास पद्धतीने यांनी देखील त्यास घरातून ओढले आणि मारत-मारत भर चौकात आणले. आण्णा वैद्य याच्या आयुष्यात त्याने जे काही पाप केले होते. त्याची सर्व कसर त्या दिवशी निघाली आणि लोठ्याकाठ्यांनी जमावाने त्याचा समाचार घेतला. यात कोण कोठे आणि कसे मरते याचा काहीच ठाव लागला नाही. मात्र, या सर्व प्रकारात त्याने अखेरचा श्‍वास घेतला.

फिर्यादीत मुलगा म्हणतो की.!

मी अकोल्यात रंगकाम करीत होतो. तेव्हा मला फोन आला. की, तुझ्या वडिलांना गावातील काही व्यक्ती मारहाण करीत आहेत. तेव्हा मी तेथे तत्काळ गेला. त्यावेळी वडिल आण्णा वैद्य यांना काही लोक आणि महिला मारहाण करीत होत्या. ते गावातील चिंचेच्या झाडाखाली पडलेला होते. जेव्हा मी तेथे गेलो तेव्हा लोक म्हणाले. की, आरे त्याचा मुलगा आला आहे, धरा-धरा त्याला, मारा-मारा असा आरडाओरड झाला असता मला देखील भिती वाटली. त्यामुळे मी तेथून मागे वळलो आणि पुन्हा अकोल्याला आलो. त्यानंतर काही वेळाने मला समजले की, वडिलांना ग्रामीण रूग्णालय अकोले येथे आणले आहे. तेव्हा मी तेथे गेलो आणि पाहिले तर वडिल खाली जमिनिवर पडलेले होते. त्यांच्या अंगात टि-शर्ट आणि फक्त अंडरवेअर होती. त्यांच्या तोंडातून रक्त आणि अंगावर अनेक जखमा होत्या. त्यावेळी मी वडिलांना विचारले. की, तुम्ही असे कशाला केले. तेव्हा ते म्हणाले. की, मला पाच जणांनी मारले आहे. त्यानंतर त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालय, त्यानंतर डॉ. भांडकोळी आणि नंतर संगमनेर येथील मेडिकव्हर येथे उपचार केले. मात्र, रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ते मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले असे फिर्यादीत म्हटले आहे.

कोण आहे आण्णा वैद्य.!

आण्णा वैद्य हा सुगाव खुर्द येथील रहिवासी असून त्याच्यावर चार महिलांची हत्या केल्याचे आरोप होते. त्यात ताराबाई राऊत (रा. संगमनेर), पुष्पा देशमुख (रा. कुंभेफळ, ता. अकोले), आण्णा वैद्य याची सख्खी बहिण शशिकला गोर्डे (रा. पानसरवाडी, ता. अकोले) आणि कमल कोल्हे (रा. धांदरफळ, ता. संगमनेर) अशी चौघींची नावे आहेत. हे चारही गुन्हे सन २००५ मध्ये अकोले पोलीस ठाण्यात दाखल होते. यातील पुष्पा देशमुख खून प्रकरणात त्याला जन्मठेप लागली होती. मात्र, हायकोर्टात तो निर्दोष झाला होता. या गुुन्ह्यांचा तपास जेव्हा सुरू झाला. तेव्हा जसजसे वावर खोदत जाऊ तसतसे हाडांचे सापळे बाहेर येत होते. त्या वावरातून (शेतातून) चार हाडांचे सांगाडे बाहेर काढले होते. त्यामुळे, हे प्रकरण राज्यात नव्हे तर देशात गाजले होते. यातील गुन्ह्यांत आण्णा वैद्य यास २००५ मध्ये अटक झाली होती. तर तो २०१८ मध्ये बाहेर आला होता. त्यानंतर त्याचे वास्तव्य सुगाव येथे होते. तर तो एकटाच त्याच्या घरात राहत होता. मात्र, त्याची दहशत पुर्ण गावात होती. आज या प्रकरणात काही व्यक्ती अटक झाल्या. काही दिवस जेलमध्ये राहतील. मात्र, त्यांनी आण्णा वैद्य हा चाप्टर कायमचा संपून टाकला आहे. 

कायदा हातात घ्याल तर सुट्टी नाही.

दरम्यान, इतकी मोठी घटना घडल्यानंतर अकोले पोलीस निरीक्षक विजय करे यांनी हे प्रकरण चांगल्या पद्धतीने हताळले. नंतरच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ दिला नाही. मोठा पोलीस फौज फाटा घेऊन त्यांनी अंत्यविधी पार पाडला. तर, सुगाव खुर्द गाव देखील शांततेत होते. त्यानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी तत्काळ आठ जणांची नावे निष्पन्न केली. यात दोघांना अटक देखील केली. तर पुढील कारवाई ज्याचा त्याचा रोल काय? हे पाहून सुरु आहे. त्यानंतर काही प्रत्यक्षदर्शी व्यक्ती आणि सबळ पुरावे जमा केले आहेत. हा मॉब लिंचिंगचा प्रकार नाही हे देखील त्यांनी नमुद केले असून मुलीच्या नातेवाईकांनीच हा प्रकार केल्याचे ते म्हणाले. यात जे काही होईल ते कायद्याच्या चौकटीत राहून केले जाईल. गुन्हा गुन्हा असतो. त्यामुळे, त्यात कोणालाही माफी किंवा सिम्पथी दिली जाणार नाही. काय खरे आणि काय खोटे हे न्यायालय ठरवित असते. त्यामुळे, जो कोणी कायदा हातात घेईल त्याला सुट्टी नाही. अशा प्रकारची प्रतिक्रिया करे यांनी दिली.