मोठी बातमी.! कुख्यात आरोपी आण्णा वैद्य याची हत्या, पेरु तोडला म्हणून वाद झाला होता.! चार महिलांच्या खुनाचे आरोप ते जन्मठेप.!
एका गरीब मुलीने पेरु तोडले म्हणून तिला अण्णा वैद्य (सुगाव खुर्द, ता. अकोले, जि. अ.नगर) याने तिच्या घरात घुसून तिला मारहाण केली. तिच्याशी चुकीच्या पद्धतीने वागून तिला ठार मारण्याची धमकी दिली. जेव्हा हा प्रकार बाकी लोकांनी पाहिला तेव्हा त्यांना देखील ठार मारण्याची धमकी अण्णा वैद्य याने दिली होती. मात्र, जेव्हा पीडित मुलीच्या घराचे लोक सायंकाळी घरी आले तेव्हा त्यांना वैद्य याचे कारणामे समजले. तेव्हा एका समाजाचा जमाव एकत्र आला आणि त्यांनी वैद्य याच्या घरात घुसून त्याला बाहेर काढले. त्याला बेदम मारहाण केली. या दरम्यान पोलिसांनी हा वाद मिटविला. मात्र, त्याला इतके मारले होते. की, त्याच्या शरिरात अंतर्गत रक्तस्त्राव झाला त्यामुळे, त्याचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. ही धक्कादायक घटना आज रविवार दि. १० डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास सुगाव खुर्द येथे घडली. याप्रकरणी आता पोलिसांनी चौकशी सुरू केली असून त्यास कोणीकोणी मारहाण केली. याचा तपास सुरु असून याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. (अण्णा वैद्य याला ताराबाई राऊत हिच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तर, त्याच्यावर अन्य चार खुनांचे देखील आरोप होते.)
याबाबत सविस्तर माहिती अशी. की, अनेक खुनांचे आरोप असणारा अण्णा वैद्य गेल्या काही दिवसांपुर्वी जेलमधून बाहेर आला होता. त्यानंतर त्याची जिवणशैली फार रौद्र स्वरुपाची होती. त्यामुळे, त्याच्या नादाला फारसे कोणी लागत नव्हते. मात्र, आज दुपारी एका गरिब कुटुंबातील मुलीने त्याच्या हाद्दीत असणारा एक पेरु तोडला असे त्याला वाटले होते. त्यामुळे त्याने मुलीस शिविगाळ केली. तर, तिला घरात बोलावून घेत चुकीच्या उद्देशाने हातवारे केले असे आरोप अण्णा वैद्य याच्यावर लावण्यात आले होते. या दरम्यान त्याने ज्या मुलीस घरात बोलविले होते ती मुलगी त्याच्याकडे घरात गेली नाही. तिने भितीपोटी तिचे घर गाठले आणि आतून दरवाजा लावून घेतला. अर्थात मुलीची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे, घर कच्चे म्हणजेच कुडाचे होते त्यामुळे अण्णा वैद्य हा तिच्या घरी गेला आणि तिला बाहेर बोलवत होता.
दरम्यान, वैद्य याचा इतिहास हा फार गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. त्यामुळे, त्याने आवाज दिल्यामुळे मुलगी फार घाबरुन गेली होती. ती बाहेर आली नाही त्यामुळे अण्णा वैद्य याने एका लाथाडीत दरवाजा तोडून टाकला आणि तो घरात गेला. तेथे जाताच त्याने मुलीस बेदम मारहाण केली. यावेळी मुलगी ओरडत होती. मात्र, कोणी मध्ये येण्याचा प्रयत्न देखील करत नव्हते. कारण, अण्णा वैद्य म्हणत होता. की, जर कोणी मध्ये आले तर त्याचा देखील असेच हाल केले जाईल. त्याच्या या धमकीमुळे उपस्थित लोक घाबरुन गेले होते. त्याने पेरु तोडणार्या मुलीस मारहाण केली. त्याचे मन समाधान झाल्यानंतर तो तेथून निघुन त्याच्या घरी गेला होता.
दरम्यान, तो घरी गेला आणि सायंकाळी ज्या मुलीस मारहाण केली, त्या मुलीचे पाहुणे संध्याकाळी घरी आले. चर्चा सुरू झाली असता त्यांना घडलेली सर्व हकीकत माहित झाली. या व्यक्तींनी थेट अण्णा वैद्य याचे घर गाठले आणि त्यास घरातून बाहेर ओढले. ज्या पद्धतीने त्याने मुलीस मारहाण केली, त्याच पद्धतीने या व्यक्तींनी देखील त्यास बाहेर ओढून मारहाण केली. हा प्रकार येथेच थांबला नाही. तर, या व्यक्तींनी त्यास ओढत-ओढत गावत आणले आणि त्यास लाठ्या काठ्यांनी मारहाण केली. सर्व जमावाने वाट्टेल तसा हात धुवून घेतला. मात्र, त्यास कोणी सोडविण्याचा प्रयत्न केला नाही. त्यावेळी कोणीतरी गावातील एकाने पोलीस ठाण्यत फोन केला आणि घडलेली हकीकत सांगितली.
दरम्यान, अकोले पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वैद्य याची सोडवणूक केली. तोवर मारहाण करणारे अनेकजण पसार झाले होते. त्यानंतर वैद्य यास अकोल्यातला आणले आणि त्यास ग्रामीण रुग्णालय येथे उपचार करण्यासाठी नेले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. की, यांना फार मार लागलेला असून त्यांना पुढील उपचाराची गरज आहे. यावेळी पोलिसांच्या पुढाकाराने अण्णा वैद्य यास संगमनेर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तोवर फार उशिर झाला होता. रात्री ९ ते १० वाजण्याच्या सुमारास वैद्य याचा मृत्यू झाल्याची खात्रीलयाक माहिती पोलिसांकडून मिळाली होती. त्यानंतर वैद्य यास नेमकी कोणी मारले, आता फिर्यादी होणार कोण? यात आरोपी कोणकोण होणार? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत असले तरी पोलीस निरीक्षक विजय करे यात कायदेशीर कठोर भुमिका पार पाडतील यात तिळमात्र शंका नाही. कारण, गुन्हेगार असला तरी त्याला अशा पद्धतीने मारहाण करणे हे चूक आहे. त्यामुळे, यात कलम ३०२ नुसार कारवाई करण्याच्या हलचाली सुरू करण्यात आल्या होत्या.