अखेर समशेरपूर येथील एटीएम फोडणारी टोळी जेरबंद, पाच अटक, एक पसार, ७ लाख ५२ हजारांजा मुद्देमाल हस्तगत.! अकोले संगमनेरचे तरुण वाह्यात.!
सार्वभौम (अकोले) :-
गेल्या आठवड्यात अकोले तालुक्यातील समशेरपूर येथून एक एटीएम फोडल्याची घटना घडली होती. यात जवळ-जवळ लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लुटला होता. हा गुन्हा दाखल होताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (LCB) आणि अकोले पोलीस यांनी या घटनेचा समांतर तपास केला. यात अकोले आणि संगमनेर तालुक्यातील सहा जणांची नावे निष्पन्न झाली असून यातील पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून फोडलेले एटीएम, एक गाडी, मोबाईल, रोख रक्कम असा ७ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलिसांना मिळालेली गोपनिय माहिती आणि तपास यंत्रणेतील काही टेक्निकल गोष्टी यांच्या आधारे हा गुन्हा उघड झाला आहे. अकोले पोलीस ठाण्याच्या हाद्दीत एटीएम फोडल्याचे काही तुरळक गुन्हे आहेत. मात्र, पोलीस निरिक्षक विजय करे यांच्या कार्यकाळात त्यांचे स्थागुशाचे मित्र पीआय दिनेश आहेर आणि सुपोनी हेमंत थोरात यांच्या टिमने अतिशय उल्लेखनिय असा तपास करीत काही मुद्देमालासह चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यामुळे, पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी सर्व टिमचे कौतूक केले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी. की, शनिवार दि. २३ डिसेंबर २०२३ रोजी रात्री काही व्यक्तींनी समशेरपूर येथील इंडिया बँकेचे एटीएम उखडून नेले होते. त्यानंतर ही घटना सीसीटीव्हीत कैद देखील झाली होती. गुन्हा दाखल होताच अकोले पोलीस निरीक्षक विजय करे आणि पोलीस उपनिरीक्षक भुषण हांडोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हा दाखल केला आणि तपासाला गती देखील दिली होती. याच दरम्यान एटीएम फोडीच्या घटनेचे गांभिर्य लक्षात घेता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांनी देखील तांत्रिकदृष्ट्या तपासाची चक्रे नगरहून हालविली. त्यानंतर मोबाईल लोकेशक, आरोपींच्या हलचाली, सीसीटीव्ही फुटेज आणि पोलिसांचे सोर्स यांचा आधार घेऊन आरोपी थेट पोलिसांच्या जाळ्यात अडकले.
यात आरोपी म्हणून सुर्यभान उर्फ काळ्या लक्ष्मण घोडे (वय २३), अशोक रघुनाथ घोडे (वय २५) भरत लक्ष्मण घोडे (वय २४) (सर्व रा. तिरडे, ता. अकोले, जि. अ.नगर), सुयोग अशोक दवंग (वय २०, रा. हिवरगाव पठार, ता. संगमनेर) आणि अजिंक्य लहाणू सोनवणे (वय २१, रा. चिंचोली गुरव, ता. संगमनेर) अशा पाच जणांना अटक करण्यात आली आहे. यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल, गाडी, गॅसकटर, ऑक्सिजन सिलेंडर असा ७ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तर, यातील आणखी एक आरोपी गणेश लहु गोडे (रा. तिरडे, ता. अकोले) हा पसार असून अशा सहा जणांनी हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील गणेश गोडे याने देखील त्याचा वाटा घेतला असून तो पसार असल्याने पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
कसा केला होता गुन्हा.!
आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार हे एटीएम फोडणे हे त्यांचे पुर्वनियोजित होते. त्यातील मास्टर माईन्ड म्हणून भरत गोडे हा महत्वाचा पंटर होता. त्याने संगमनेर आणि अकोले तालुक्यातील काही मित्र गोळा केला. एटीएम कसे फोडायचे? तर, ते जाग्यावर कटरने कापणे सोपे जाणार नाही. होणारा आवाज आणि लागणारा कालावधी यात चोरी पकडली जाऊ शकते. म्हणून एक गाडी एटीएमच्या बाहेर न्यायची गाडीच्या मागे दोर बांधायचा आणि गाडीने ओढून एटीएम उखडून ते निर्जनस्थळी न्यायचे. ठरल्यानुसार यांनी एक बोलेरो गाडी घेतली. अंधाराचा फायदा घेत कोणी समशेरपूर फाट्यावर थांबले तर कोणी घटनास्थळी आजुबाजुला थांबून एकमेकांना सावध करत होते. यांनी ठरल्याप्रमाणे गाडीला बांधून एटीएम उखडले आणि गाडीत घालुन ते म्हसवड वळणाच्या घाटातून एकदरी गावाच्या परिसरात नेले. तेथे त्यांनी गॅसकटरने ते कापले. त्यातून जी काही रक्कम मिळाली तिचे समांतर भाग केले आणि प्रत्येकाने ते वाटून घेतले. त्यानंतर ते मशिन त्याच परिसरात फेकून दिले आणि आम्ही ज्याच्यात्याच्या घरी निघुन गेलो. अशा प्रकारे चोरी केली.
कसा केला तपास..!
गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक विजय करे आणि भुषण हांडोरे यांनी समशेरपूर, ठाणगाव, टहाकारी, तिरडे, पाचपट्टा, सिन्नर अशा भागात आपली यंत्रणा कामाला लावली होती. तर, काही रेकॉर्डवरील गुन्हेगारांना देखील चाचपून पाहिले होते. यांचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर आणि सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांनी देखील या गुन्ह्यात काही टेक्निकल बाबी मिळतात का? आरोपींचा काही शोध लागतोय का? त्यांच्या मोबाईल लोकेशनपासून ते अनेक तांत्रीक बाबींना थोरात यांनी हात घातला. त्यात काही संशयित गोष्टी पोलिसांच्या हाती आल्या. त्यानंतर पोलिसांच्या गोपनिय सुत्रांकडून देखील काही माहिती मिळाली आणि स्थागुशाचे पथक थेट अकोल्यात दाखल झाले. अकोले पोलीस आणि नगरचे पथक असा दोघांनी समांतर तपास करुन पहिला आरोपी भरत लक्ष्मण घोडे हा तिरडे येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. हे पथक सदरस्थळी पोहचताच त्यांना एकाच ठिकाणी पाच आरोपी मिळून आले. त्यांना काही समजण्याच्या आत पोलिसांनी त्यांच्यावर झडप मारली आणि प्रत्येकाला त्यांची नावे विचारली. एटीएम फोडीबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी जो काही घटनाक्रम झाला. त्याची सविस्तर माहिती दिली आणि गुन्हा सबळ पुराव्यंासह निष्पन्न झाला.
सावधान.! पोलिसांची तुमच्यावर नजर आहे.
गुन्हा करताना पोलीस घटनास्थळी नसतात. तरी देखील काही तासात किंवा काही दिवसांत पोलीस घटनेचा उलगडा करतात. याचे आश्चर्य अनेकांना आहे. अर्थात काही सराईत गुन्हेगार वगळले तर कानूण के हाथ लंबे होते हैं.! याची प्रचिती आपल्याला बाहुतांशी गुन्ह्यांमध्ये येतेच. त्यामुळे, आपल्यावर कोणाची नजर नाही. आपण फार हुशार आणि शातीर आहोत, आपण डॉन वैगरे आहोत या अविर्भावात राहू नका. दिवसागणिक अनेक अधुनिक तंत्रज्ञान विकसित झाले आहे. ते सामान्य मानसांपर्यंत पोहचले नसले तरी ते पोलीस प्रशासनाकडे आहे. त्यामुळे, कष्टाने पैसा कमविण्याचे टाळून झटपट श्रीमंती किंवा धनलाभ होण्यासाठी गैर मार्गाचा अवलंब करु नका. एक तरुणाईत अनेकांचे आयुष्य गुन्हा दाखल झाल्यामुळे उध्वस्त होत आहे. त्यामुळे तरुणांनी अशा गुन्ह्यांकडे वळू नये हीच अपेक्षा...!!