पक्षाच्या विरोधात काम करतो म्हणून आदिवासी तरुणांना मारहाण.! चौघांवर ऍट्रॉसिटीसह गुन्हे दाखल, या सगळ्यांना संपून टाका...
निर्मळ पिंप्री येथील घटना अगदी ताजी असताना संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पक्षाच्या विरोधात काम केले म्हणून काही आदिवासी तरुणांना चौघांनी बेदम मारहाण केली. तुम्हाला खुप माज आला आहे का? तुम्ही येथे थांबायचे नाही, तुमच्या सगळ्या समाजाला घारगावमधून संपून टाकू, तुम्ही आमच्या मर्जीप्रमाणे वागत नाही, आमच्या पक्षाच्या विरोधात काम करता असे म्हणून जातीयवादी शिविगाळ करीत मारहाण केली. ही घटना दि. २० डिसेंबर २०२३ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. यात दोघे जखमी झाले असून या घटनेनंतर घारगावात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी मुकेश पवार यांनी फिर्याद दाखल केली असून चार जणांना आरोपी करण्यात आले आहे.
याबाबत फिर्यादीत दिलेली सविस्तर माहिती अशी. की, दि. २० डिसेंबर रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास मुकेश पवार आणि किरण लामखडे ही दोघे दुचाकीहून बोटा गावातून घरागावकडे चालले होते. तेव्हा घारगावात जरा गर्दी जमलेली होती. ही गर्दी का जमली आहे? म्हणून यांनी गाडी थांबविली आणि तेथे गेले. त्याच वेळी आरोपी निलेश अशोक आहेर, संकेत रमेश आहेर, विकास बाळु मते, अनिल बबन डोके जातीवाचक बोलत म्हणाले. की, हे फार माजले आहेत, तुम्हाला खूप माज आला आहे का? तुम्ही येथे थांबायचे नाही, तुमच्या जातीचे सगळे लोक आम्ही संपून टाकू, तुम्ही आमच्या पक्षाच्या विरोधात काम करतात असे बोलुन त्यांनी थेट मारहाण करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, हा सर्व प्रकार किरण लामखडे याने पाहिला असता तो मध्यस्ती आला आणि त्याला देखील निलेश आहेर याने लाथाबुक्क्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तेव्हा किरण हा समजून सांगत असताना निलेश म्हणत होता. की, तुम्ही तुमच्या जातीच्या तरुणांना एकत्र करता आणि आमच्या पक्षाच्या विरोधात काम करता. यावेळी किरण याची गचांडी धरुन त्यास मारहाण करीत असताना त्याच्या गळ्यातील चैन कोणीतरी काढून घेतली. या सर्व प्रकरणातून किरण याने स्वत:ची सुटका करुन घेण्यासाठी तेथून पळ काढला. मात्र, तेव्हा संकेत रमेश आहेर, विकास बाळु मते, अनिल बबन डोके हे त्याच्या मागे पळू लागले. त्याला काही अंतरावर जाताच यांनी पकडले आणि खाली पाडून लाथा बुक्क्यांनी बेदम मराहाण केली.
दरम्यान, आपल्या मित्राला मारहाण होते आहे म्हणून मुकेश देखील त्यांच्या दिशेने पळाला. मित्राला मारु नका म्हणून त्याने या चौघांना विनंती केली. मात्र, यांनी मुकेशला देखील मारहाण सुरू केली. तुम्ही तुमच्या जातीचे सगळे किती लोक आहेत? तुम्हा सगळ्यांना मारहाण करुन घारगावातून काढून देऊ, तुम्ही आमच्या पक्षाच्या विरोधात काम करायचे नाही असे म्हणत मारहाण करुन जातीवाचक शिविगाळ दमदाटी करुन धमकी दिली. त्यानंतर हा वाद काही व्यक्तींनी सोडविला. मात्र, या दोन्ही तरुणांनी थेट घारगाव पोलीस ठाणे गाठले. जे काही घडले त्याबाबत पोलीस निरीक्षक एस.बी. खेडकर यांना माहिती दिली. फिर्यादीनुसार निलेश आहेर, संकेत आहेर, विकास मते, अनिल डोके अशा चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, राहाता तालुक्यातील निर्मळ पिंप्री येथे अशा पद्धतीने जातीयवाद झाला होता. त्याला राजकीय किनार आणि कारण देखील निवडणुकांचे होते. हा विषय राज्यभर गाजला. आता तेच वलय संगमनेरात निर्माण होऊ लागले आहे. मुळात कोणी कोणत्या पक्षात जावं, कोणाला मतदान करावे, कोणाला सपोर्ट करावा हा लोकशाहीने बहाल केलेला अधिकार आहे. पण, मानसिक गुलामीची प्रथा आजून देखील गेलेली नाही. गरिब जातीची किंवा एससी, एसटी लोकांनी केवळ आमच्या ताटाखालचे मांजर व्हावे, आमच्या नेत्यांना आणि आम्हाला मुजरा करावा अशी मानसिकता आजकालची तरुण पिढी स्विकारण्यास तयार नाही. त्यामुळे, गुलामगिरी मोडीत काढू इच्छीनार्या तरुणांच्या पाठीशी उभे राहून हुकूमशाही गाजविणार्यांवर प्रशासनाने चाप बसविला पाहिजे. तर, जातीच्या नावाखाली जर कोणी पोळ्या भाजत असेल, राजकीय अनैतिकता दाखवत असेल तर त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई केली पाहिजे असे सुज्ञ मानसांचे मत आहे.
असे काही घडलेच नाही.!
घारगाव मध्ये यापूर्वी कधीही दलीत सुवर्ण व हिंदु-मुस्लिम असा जातीवाचक प्रकार घडला नाही. कालचा झालेला प्रकार परप्रांतीय वाहन चालका कडून एका ऊस तोड कामगाराला धक्का लागला. काही युवकांनी घारगाव स्टँड येथे या परप्रांतीय वाहन चालकाला मारहाण केली. त्यानंतर प्रतिष्ठित व्यापारी हे मध्यस्थी करण्यासाठी गेले. तेथे काही युवकांनी या प्रतिष्ठित व्यापाऱ्यालाच मारहाण केली. त्यामुळे, घटनास्थळी असलेले काही व्यापारी युवक यांच्या मध्ये धुमचक्री झाली. यामध्ये कुठला जातीवाद झाला नाही. खरंतर,घडलेल्या घटनेवर दोन्ही समाजातील प्रतिष्टीतांनी यावर बैठक घेऊन सामाजिक सलोखा राखायला हवा. आणि आपली संस्कृती जपायला हवी.!
गणेश धात्रक (सामाजीक कार्यकर्ते,घारगाव)