अनैतिक संबंधातून जावयाने केली सासर्‍याची हत्या.! त्या दोघांना राईटहॉन्ड पकडले, दोघांना अटक, महिला पसार.!

     

सार्वभौम (संगमनेर) :-

अनैतिक संबंधाच्या कारणाहून शेजारील व्यक्ती आणि जावयाने सासर्‍यास जाळून मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मयताचे एका जवळच्या महिलांशी संबंध असल्याची शंका होती. त्यामुळे, त्याला एका लग्नातील वरातीला बोलावून दोघांनी गोरख दशरथ बर्डे (वय ४८, रा. लोहारे कसारे, ता. संगमनेर) याची निघृणपणे हत्या केली. ही घटना १६ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी १ वाजण्यापुर्वी घडली. याप्रकरणी दिनेश शिवाजी पवार (रा. वडगाव कांदळी, ता. जुन्नर) व विलास लक्ष्मण पवार (रा. माळवाडी, साकूर, ता. संगमनेर) अशा दोघांना अटक करण्यात आली आहे. तर, यात एका महिलेस देखील आरोपी करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी. की, मयत गोरख बर्डे हा आरोपी यांचा पाहुणा आहे. मात्र, बर्डे याची वागणूक ही चांगली नव्हती असे त्यांना वाटत होते. मयत याचे आरोपींच्या जवळच्या व्यक्तींशी अनैतिक संबंध आहे अशी आरोपींना शंका होती. त्यामुळे, हे मयत बर्डे याच्यावर पाळत ठेवून होते. दरम्यानच्या काळात बर्डे आणि संबंधित महिला यांची भेट झाली आणि आरोपी दिनेश पवार व विलास पवार यांनी त्यास रंगेहाथ पकडले. त्यामुळे, याला वारंवार समजून सांगून देखील तो ऐकत नाही त्यामुळे याचा काटा काढला पाहिजे असे आरोपींनी ठरविले.

दरम्यान, आरोपी यांनी मयत गोरख बर्डे याला दि. १५ डिसेंबर २०२३ रोजी एका लग्नाला बोलविले होते. पाहुण्यांचे लग्न असल्यामुळे बर्डे आणि त्याचा जीव जडलेली व्यक्ती देखील तेथे आली होती. दुपारी लग्न लागले तेव्हा यांच्यात वारंवार चर्चा होणे, एकमेकांकडे पाहणे सुरू होते. या सर्व घडामोडींवर आरोपींचे बारीक लक्ष होते. त्यामुळे, त्यांनी बर्डे यास समजून देखील सांगितले होते. मात्र, तो काही सुधरुन घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. लग्ना आटोपल्यानंतर रात्री वरात देखील होती. त्यामुळे बर्डे हा वरातीला देखील गेला होता. सगळ्यांच्या नजरा चुकवून रात्री काहीतरी डाव साधण्याच्या हेतूने तो गेला खरा. मात्र, तोच दिवस त्याचा शेवटचा असेल हे त्याला देखील वाटले नव्हते.

दरम्यान, रात्री वरात सुरू झाली. काही लोक मद्यपी होऊन झिंगाट झाले आणि सैराट चित्रपटाप्रमाणे सर्व नाचण्यात दंग असताना बर्डे आणि त्याची प्रेयसी बाजुला गेले. मात्र, या देखील हलचालिंवर आरोपींची नजर होती. हे दोघे बाजुला गेले आणि त्यांची चर्चा सुरू असताना या दोघांनी अचानक तेथे ऐन्ट्री केली. त्यानंतर बर्डे यास बेदम मारहाण करुन त्याला कायमचे संपविण्याचा कट यांनी आखला. बर्डे यास मारहाण करुन धारधार शस्त्राने त्याच्या गळ्यावर वार केले. त्यानंतर त्याचा गळा आवळून ठार मारुन टाकले. हा सर्व प्रकार एका अंधार्‍या रात्री सुरू असताना दोन व्यक्ती आणि एक महिला भेदरुन गेले होते.

दरम्यान, मारून टाकलेल्या व्यक्तीचे करायचे काय? त्याची विल्हेवाट लावायची कशी? तेव्हा यांनी एक युक्ती वापरली. जर ज्वलनशिल पदार्थाने याचा चेहरा जाळून टाकला तर हा व्यक्ती कोण आहे हे लक्षात येणार नाही. त्यामुळे, यांनी तोच उपक्रम राबविण्याचे ठरविले. मयत बर्डे याला उचलून त्यांनी रणखांब येथील जांभुळवाडी शिवारात फॉरेष्टच्या हाद्दीत आणले. त्याच्या अंगावर, तोंडावर ज्वलनशिल पदार्थ टाकून पेटून दिले. त्यानंतर मयताचा चेहरा, छाती पुर्णपणे जळली होती. आता आपले काम फत्य झाले असे समजून आरोपी हे घटनास्थळाहून निघून गेले. दुसर्‍या दिवशी जसे काही घडले नाही असे समजून ते पाहुण्यांमध्ये मिसळून गेले.

दरम्यान, दि.१६ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास या फॉरेस्ट परिसरात एक जनावरे वळणारा व्यक्ती शेळ्या घेऊन गेला होता. तेव्हा त्याने हा मृतदेह पाहिला आणि त्याने तत्काळ पोलीस पाटील यांना फोन केला. त्यानंतर काही वेळानंतर गावकरी घटनास्थळी हजर झाले आणि याबाबत घारगाव पोलिस ठाण्यात माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलीस निरीक्षक खेडकर यांच्यासह त्यांच्या पथकाने घटनास्थळी घाव घेतली आणि पंचनामा करुन तपास सुरू केला. दोन दिवसानंतर मयताची ओळख पटली आणि त्यानंतर आरोपी कोण? त्यांनी ही हत्या का केली? पुरावे कसे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. हत्या करण्याचे कारण काय होते असा सर्व उलगडा केला. अतिशय अवघड असा तपास घारगाव पोलिसांनी करुन या खुनाचा उकल केली. आता यात दिनेश शिवाजी पवार व विलास लक्ष्मण पवार अशा दोघांना अटक करण्यात आले असून एक महिला आरोपी अद्याप पसार आहे. या गुन्हाची उकल केल्यामुळे घारगाव पोलिसांचे कौतुक होत आहे.