गटशिक्षण अधिकार्याने बदल्यांमधून लाखोंची माया जमविली, ज्याची जमीन घेतली त्याचेच आरोप.! सीइओ साहेब चौकशी करा.!
सार्वभौम (अकोले) :-
अकोले तालुक्यात आजवर गटशिक्षण विभागाने ४४ बदल्या या बेकायदेशीर केल्या आहेत. तर, गरज नसताना काही ठिकाणी अतिरिक्त शिक्षक ठेऊन शासनाची फसवणुक केली आहे. तर, अनेक बिले मंजुरी असेल किंवा नेत्यांच्या कार्यक्रमाला मुले व शिक्षक पुरविणे असेल अशा अनेक गोष्टी अगदी अंदाधुंदपणे करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. तर, नुकतेच समायोजन प्रक्रियेत बदल्यांहून वाद निर्माण झाले होते. जवळच्या व मोठ्या शाळा फक्त अकोले गटशिक्षण विभागानेच ब्लॅक का केल्या होत्या? त्या कोणसाठी राखून ठेवल्या, त्यातून काही अर्थपुर्ण तडजोडींचा वास बाहेर आला आणि नगर शिक्षण विभागाचे एक पथक थेट अकोल्यात दाखल झाले. त्यात काही गैरव्यवहार देखील समोर आले. त्यामुळे, या चौकशा थांबविण्यासाठी काही शिक्षक आणि गटशिक्षण अधिकारी यांनी अक्षरश: पायाला भिंगरी बांधली होती. आजी-माजी आमदार, पदविधर आमदार, नेते, पुढारी, पत्रकार आणि मंत्री यांच्या पाया पडून चौकशी थांबावी यासाठी आटापिटा सुरु केला आहे. पण, सीईओ आशिष येरेकर यांनी यात लक्ष घातले असून या अनागोंदी कारभारावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे, येत्या काही दिवसात गटशिक्षण अधिकार्याची खुर्ची खाली होण्याची शक्यता असून तेथे दोन नावे चर्चेत आहेत.
यांच्या संपत्तीची चौकशी करा.!
गटशिक्षण अधिकारी याच्यावर गेल्या दोन आठवड्यापासून अनेक आरोप केले जात आहे. त्यात काय तत्थ्य आहे याची सखोल चौकशी सुरू आहे. मात्र, याच गटशिक्षण अधिकार्यांनी ब्राम्हणवाडा परिसरात काही जगा जमिनी खरेदी केल्याचे आरोप देखील केले जात आहे. याबाबत काही तक्रारी देखील शासकीय दरबारी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे, ही खरोखर अपसंपदा आहे का? जे आरोप केले जात आहे ते खरे आहे का? असेल तर हा मलिदा आला कोठून? एकीकडे बदल्या आणि अनेक भ्रष्टाचार तसेच अफरातफर केल्याचे आरोप होत आहे आणि त्यानंतर लगच एका व्यक्तीच्या पाहुण्यांची जमीन लाखो रुपयांना घेतल्याचे देखील बोलले जात आहे. त्यामुळे, खरोखर या गोष्टीची तटस्थ पद्धतीने चौकशी झाली पाहिजे. तर, जे काही आरोप माध्यमांवर आले आहेत. त्याची देखील शहनिशा होणे गरजेचे असल्याचे मत काही समाजसेवकांनी व्यक्त केले आहे. तसे झाले नाही. तर रिपाई, शेतकरी संघटना, बहुजन मोर्चा असे अनेक चळवळीतील लोक पंचायत समितीवर मोर्चा आणणार आहेत. त्यामुळे, गटशिक्षण अधिकारी यांची तालुकाबाहेर तत्काळ बदली करुन चौकशीअंती निलंबन करावे अशी मागणी केली जात आहे.
इतका आटापिटा कशासाठी?
आम्ही फार धुतल्या तांदळासारखे नितळ आणि निर्मळ आहोत हे सांगण्याची कसरत काही अधिकार्यांकडून होत होती. मात्र, अनेक गोष्टींची चौकशी लागली आणि यांना पळता भुई थोडी झाली. त्यानंतर यांनी थेट मा. आमदार डॉ. सुधिर तांबे साहेब यांची भेट घेतली. त्यानंतर सहकार महर्षी सिताराम पाटील गायकर यांच्याकडे देखील साकडे घातले. हा प्रवास येथेच थांबला नाही. तर, नंतर माजी. आ. वैभव पिचड यांच्याकडे दोन वेळा आणि त्यानंतर पुन्हा आ. डॉ. किरण लहामटे साहेब यांच्या दारात जाऊन गार्हाने मांडले. असे एक नव्हे अनेक पुढारी यांनी सीईओ यांच्याशी मध्यस्ती करण्यासाठी वापरले. राज्याचे महासुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी देखील संपर्क साधला. मात्र, आता यातून काय निष्पन्न झाले. हे सीईओ साहेब यांच्या कारवाई नंतरच जनतेसमोर येईल. मात्र, इतका आटापीटा करण्याची वेळ का आली? तर निच्छित येथे गैरकारभार झाला आहे. त्यामुळे, आता गटशिक्षण अधिकार्यांची गच्छंती कधी होते? याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले आहे.
डोईजड अध्यक्ष रुतू लागला.!
उंचखडक बु शाळेत त्याचा कोणी व्यक्ती शिक्षण घेत नाही. त्यामुळे, तो शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष कसा झाला? असे म्हणत अनेक शिक्षक आणि अधिकारी आजी-माजी आमदारांपुढे धाय मोकलुन रडले. त्यात काही महिला भगिनी देखील होत्या. मात्र, त्यांना माहित नाही. की, जशी शाळा सुरु झाली. त्यानंतर एक विद्यार्थी त्याच्या पालकांच्या संमतीने कायदेशीर शैक्षणिकदृष्ट्या दत्तक घेण्यात आला होता. इतकेच काय? अनेक नात्यातील मुले या शाळेत शिक्षण घेत आहेत. त्यामुळे त्यांचे पाकत्व आई-वडिलांचे असावे असे बंधनकारक नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ही शाळा बंद पडली होती. ती पुन्हा चालु करताना तीन महिने ४० मुले जमा करताना हेच अध्यक्ष दिवसरात्र लोकांच्या दारोदारी जात होते, रात्र-रात्र एक करुन शाळेसाठी भौतिक सुविधा उभ्या करीत होते. तेव्हा कोण्या शिक्षकाला किंवा शिक्षण अधिकार्याला असे का वाटले नाही? की याचा या शाळेत कोणी विद्यार्थी नाही. तेव्हा काम करण्यास का मज्जाव केला नाही. त्यामुळे हे काम हा कशासाठी करीत आहे? असा प्रश्न यांना पडला नाही. अन विशेष म्हणजे ग्रामसभा घेऊन गावकर्यांनी तो निर्णय घेतला आहे. त्यामुळे, कामचुकार व्यक्तींना काम करणारा डोईजड व्यक्ती नको असेल तर त्याला एकच पर्याय आहे. त्याने स्वत:ची बदली करुन घ्यावी. विशेष म्हणजे जीर्ण अवस्थेतील शाळा आज राज्याच्या पटलावर गेली आहे. येथे आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, उद्योजक यांनी भेटी दिल्या असून लाखो रुपयांच्या लोकवर्गणीतून शाळा उभी केली आहे. तसेच सर्व शाळा डिजिटल झाली असून शाळेचा कॅम्पस अगदी बोलका असल्याचे दिसते. इतकेच काय? काल ज्या शाळेत एकही मुलगा नव्हता. त्याच शाळेत पुढील वर्षी मुलांना बसण्यासाठी जागा नाही. म्हणून आमदारांकडून ३५ लाख रुपयांचा निधी याच अध्यक्षांनी मंजूर करुन आणला आहे. फक्त गुणवत्ता आणि शिक्षण मागितली हाच शालेय शिक्षण समितीचा गुन्हा आहे.
तर तिव्र आंदोन करु.!
अकोले तालुका हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा आहे. येथे वाडी वस्ती असून तेथील शाळा आजही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे, ही शिक्षण व्यवस्था सुधरवायची असेल तर येथे प्रॅपर गटशिक्षण अधिकारी असणे आवश्यक आहे. प्रभारी व्यक्ती हे काम करु शकत नाही. त्यामुळे, शिक्षण अधिकार्यांनी देखील त्यांची मर्जी राखू नये आणि सीईओ साहेबांनी देखील कोण्या मंत्री किंवा आमदाराच्या दबावाला बळी पडू नये. जर येणार्या आठ दिवसात दोषींवर कारवाई आणि नवा गटशिक्षण अधिकारी अकोले तालुक्यास मिळाला नाही. तर, मोठ्या आंदोलनास आणि रोषास सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे, जो कोणी दोषी असेल त्याच्यावर थातुरमातुर कारवाई न करता कठोर कारवाई करावी. अन्यथा प्रशासनाला जनतेच्या रोषाला सोमोरे जावे लागेल.
- विजय वाकचौरे (रिपाई राज्यउपाध्यक्ष, आठवले गट)
झेडपीतील २०० शिक्षकांची चिंता वाढली
जिल्हा परिषदेमध्ये आंतरजिल्हा बदल्यांमध्ये सुमारे २०० शिक्षकांनी अपंगत्त्वाचे, तर काहींनी घटस्फाेटाचे बनावट दाखले सादर केले. त्यामुळे २०१७ ते २०२२ या काळात बदली झालेल्या शिक्षकांची यादी आणि बदलीचे कारण जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून नगरच्या कोतवाली पोलिसांना सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली. त्यामुळे झेडपीतील २०० शिक्षकांची चिंता वाढली आहे. यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी नगरमधील शिक्षक विकास भाऊसाहेब गवळी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह कोतवाली पोलिसांकडे तक्रार केली होती. या तक्रारीनूसार कोतवाली पोलिसांनी बदली झालेल्या शिक्षकांची माहिती मागवली आहे. त्यामुळे ज्यांनी अशा प्रकारचे दाखले देऊन बदल्या करून घेतल्या, असे शिक्षक हवालदिल झाले आहेत. २०१७ व २०२२ साली झालेल्या आंतरजिल्हा बदल्यांमध्ये काही शिक्षकांनी अपंगत्वाचे खोटे दाखले दिले. तसेच महिला शिक्षकांनी घटस्फोट घेतल्याची खोटी कागदपत्रे सादर करून बदली करून घेतली. मात्र, ज्या नवर्यापासून घटस्फोट घेतला. त्याच्याबरोबर आजही त्यांचा संसार सुरू आहे. त्यावरून अशा दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी त्यांची मागणी आहे. त्यालाच अनुसरुन अकोल्यात देखील असे प्रकार झाले आहेत. त्याची देखील आता चौकशीची मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे. त्यामुळे, अकोल्यात देखील शिक्षण विभाग थोड्याच दिवसात खंगाळून निघणार आहे.
क्रमश: भाग 7