जोर्वे नाक्यावर पुन्हा राडा.! अतिक्रमणात मुख्याधिकार्यांवर दोघे धावले, तुझे देख लुंगा मै म्हणत शिविगाळ.! अंगावर गठ्ठा फेकला.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर शहरातील जोर्वे नाका परिसरात झालेल्या दंगलीनंतर हा नाका पुन्हा चर्चेत आला आहे. या परिसरात परत अतिक्रमण झाले असता त्याबाबत नगरपरिषदेकडे तक्रार करण्यात आली होती. आज जोर्वे नाका येथे अतिक्रमण काढण्यासाठी मुख्याधिकारी आणि त्यांची टिम पोलीस फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाली होती. मात्र, नोटीस, समज आणि संधी देऊन देखील दोघांनी या ठिकाणी धिटाई करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुख्याधिकारी राहूल वाघ यांनी कायद्यावर बोट ठेवले असता दोन्ही आरोपींनी त्यांच्याशी हुज्जत घातली. त्यांना शिविगाळ, दमदाटी करुन त्यांच्या अंगावर कागदाचा गठ्ठा फेकला. त्यानंतर लखमीपुरा येथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी वाघ यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यात शेख रफिक एजाजुद्दीन उर्फ रफिक सुन्नी आणि सारीक एजाज शेख उर्फ सार्या (रा. लखमीपुरा, ता. संगमनेर) या दोघांना आरोपी करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी. की, संगमनेर शहरातील जोर्वे नाका येथे एका स्थळाच्या संरक्षक भिंती तोडून दोघांनी अतिक्रमण केले होते. हे अतिक्रमण काढण्यासाठी त्याच परिसरातील २४ जणांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांना निवेदन दिले होते. त्यानुसार नगरपरिषदेच्या वतीने अतिक्रमण करणार्यांना नोटीसा देण्यात आल्या होत्या. त्यातील काही नोटीसा यांनी स्विकारल्या तर काही नाही. मात्र, नगरपरिषदेने त्यांचे काम कायदेशीर पार पाडले होते. वारंवार सुचना करुन देखील या दोघांनी अतिक्रमण काढले नाही. त्यामुळे, नगरपरिषदेने दि. ५ डिसेंबर २०२३ रोेजी अंतीम नोटीस दिली होती. मात्र तरी देखील ट्रस्टी आणि आरोपी यांनी संबंधित अतिक्रमण काढले नाही.
दरम्यान, नगरपरिषदेच्या अधिकार्यांनी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना पोलीस संरक्षणाच्या संदर्भात मागणी केली आणि त्यानुसार पुढील कार्यवाही सुरू झाली. मात्र, दि. १२ डिसेंबर २०२३ रोजी नगरपरिषदेचे कर्मचारी, अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा आरोपी शेख रफिक एजाजुद्दीन उर्फ रफिक सुन्नी आणि सारीक एजाज शेख उर्फ सार्या यांनी संबंधित अतिक्रमण काढून घेण्याची तयारी दर्शविली होती. त्यामुळे, त्यांना दोन दिवसांची मुदत देण्यात आली होती. त्यावेळी प्रशासनाने कोणतीही धिटाई न करता समझदारीची भुमिका घेतली होती. मात्र दोन दिवस उलटले तरी या दोघांनी कोणतेही अतिक्रमण काढले नाही. उलट पोलिसांचे बॅरिकेट्स तेथे लावून त्यावर धार्मिक झेंडा लावून दिला. त्यामुळे, दि. १४ डिसेंबर रोजी हे अतिक्रमण काढण्याचा निर्णय मुख्याधिकारी यांनी घेतला होता.
दरम्यान, ठरल्यानुसार आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मुख्याधिकारी, पोलीस अधिकारी, नगरपरिषदेचे कर्मचारी आणि अधिकारी जोर्वे नाक्यावर दाखल झाले होते. तेव्हा आरोपी शेख रफिक एजाजुद्दीन उर्फ रफिक सुन्नी आणि सारीक एजाज शेख उर्फ सार्या या दोघांना अतिक्रमण काढणे तसेच तेथील सामान उचलण्याची अंतीम सुचना करण्यात आली होती. मात्र, त्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. उलट कार्यवाही सुरू झाली असता आरोपी यांनी मुख्याधिकारी वाघ यांच्या अंगावर काही कागदांची गठ्ठा फेकून मारला. त्यांच्या अंगावर धावून जात त्यांना शिविगाळ, दमदाटी केली. तुझे देख लुंगा मै, फिरसे यही दुकान लगाऊंगा अशी धमकी दिली. ही दोघे वाघ यांच्यावर धावून जात असताना काही कर्मचार्यांनी त्यांना धरले. त्यामुळे, अतिक्रमण काढल्यानंतर आज रात्री वाघ यांनी संगमनेर शहर पोलीस ठाणे गाठले आणि दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. यावेळी जोर्वे नाक्यावर फार गर्दी जमा झाली होती. तर, संगमनेरात मोठमोठे दवाखाने, बिल्डिंगी अशा अनेक ठिकाणी अतिक्रमणे आहेत. त्यावर देखील अशी धडक कारवाई व्हावी अशी मागणी सोशल मीडियाहून होताना दिसली.