आळंदीकडे जाणार्‍या दिंडीचा अपघात, कंटेनर दिंडीत घुसला. चार वारकर्‍यांचा मृत्यु, १० जण जखमी, चालक मद्यपी.!

सार्वभौम (संगमनेर) :-

     शिर्डी ते आळंदी पायी जाणार्‍या काशिकानंद महाराज यांच्या दिंडीतील वारकर्‍यांना एका कंटेनर चालकाने उडवुन दिल्याची धक्कादायक घटना आज सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. यात चार वाकर्‍यांचा मृत्यु झाला असून १५ ते २० वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. तर यातील काही वारकर्‍यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे देखील बोलले जात आहे. यात बाळासाहेब अर्जुन गवळी (रा. मढी, ता. कोपरगाव, जि. अ.नगर), चोफदार असलेले बबन पाटीलबा थोरे (रा. द्वारकानाथ शिर्डी. जि. अ.नगर), भाऊसाहेब नाथा जपे (वय ५०, कनकोली, ता. राहाता, जि. अ.नगर) आणि ताराबाई गंगाधर गमे (रा. कोर्‍हाळे, ता. राहाता) अशी मयत झालेल्या वारकर्‍यांची नावे आहेत. या घटनेमुळे संपुर्ण महाराष्ट हळहळ करीत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी. की, आळंदी येथे किर्तीकी एकादशीच्या निमित्ताने शिर्डी येथून सालाबाद प्रमाणे काशिकानंद महाराज यांची पायी दिंडी जात असते. या दिंडीसाठी राज्यातील वेगवेळ्या जिल्ह्यांतून वारकरी शिर्डीत दाखल होतात आणि त्यानंतर पायी प्रवास सुरू होतो. मजल-दरमजल करीत वारकरी संगमनेर तालुक्यातून घारगाव मार्गे आळंदीकडे प्रस्तान करीत असतात. ही दिंडी ३० नोव्हेंबर २०२३ रोजी शिर्डीतून निघाली होती. गेल्या चार दिवसांपासून आळंदीकडे प्रवास सुरू असताना दिंडी आज दि. ३ डिसेंबर २०२३ रोजी उत्तम आरगडे यांच्याकडे चंदनापुरी येथे मुक्कामी होती. तेथून ते सकाळी निघाले असताना सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास खंदरमाळवाडी शिवारात हॉटेल गोकुळवाडी येथे असताना समोरून एक कंटेनर आला आणि त्याने पायी चालणार्‍या वारकर्‍यांना उडवून दिले.

दरम्यान, विठ्ठल नामाचा गजर आणि माऊलीचे नाम स्मरण सुरू असताना अचानक मृत्यू चालुन आला. कंटेनर एम.एच १२ व्ही.टी. १४५५ या वाहनाने काही क्षणात होत्याचे नव्हते करुन टाकले. आळंदीकडे जाणारी पालखी स्थिरावली आणि एकच आरडाओरड सुरू झाली. कंटेनर मोठा असल्याने तो एकाच वेळी २० ते २५ जणांना धक्का देऊन गेला. त्यामुळे वयोवृद्ध असणार्‍या व्यक्तींना मार लागला. त्यात काहींना डोक्याला तर काहींना मोठमोठ्या जखमा झाल्या. त्यामुळे, एकच रडारड सुरू झाली. मात्र, जे काही वाटसरु होते त्यांनी जखमी झालेल्या व्यक्तींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रयत्न केले. यात दहा जणांना चांगलाच मार लागला होता. तर, काही ज्याच्या त्याच्या पद्धतीने दवाखान्यात चालते झाले. तर, काहींनी दिंडीतून घरी जाणे पसंत केले होते.

दरम्यान, जखमी व्यक्तींमध्ये बिजलाबाई शिरोळे (रा. वाळकी, ता, राहाता), राजेंद्र कारभारी सरोदे (रा. मढी, ता. कोपरगाव), भाऊसाहेब दशरथ गायकवाड, ओंकार नवनाथ चव्हाण (रा. मढी, ता. कोपरगाव), निवृत्ती पुंजा डोंगरे (रा. पंचाळा, ता. सिन्नर, जि. नाशिक), शरद सचिन चापके (रा. परभणी), अंकुश ज्ञानेश्‍वर कराळ (रा. अकोला) आणि मिराबाई मारुती ढमाले (रा. वावी, ता. सिन्नर, जि. नाशिक) अशी जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. यातील जे वारकरी मयत झाले आहेत त्यांना मृत्युपुर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने त्यातील चौघे वाचू शकले नाही. या अपघातातील सहा जणांवर उपचार सुरु आहेत. तर, काही व्यक्ती अन्य रुग्णालयात आणि काही किरकोळ जखमी असणारे घरी गेल्याची माहिती मिळाली आहे. तर, ज्या चालकाने हा प्रकार केला तो गाडी सोडून पळुन गेला असून तो मद्यपी होता अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.