मैत्रीणीस फ्रेंड रिक्वेस्ट पाठविल्याने झोपेत गळ्यावर कोयता मारुन हत्या.! दोन मित्रांची क्वामन मैत्रीण.! बिबट्या बदनाम.!
इन्स्टाग्रामवर मैत्रीणीस फ्रेंड रिक्वेस्ट पाठविल्यामुळे दोन तरुणांमध्ये वाद झाले. ती माझी मैत्रीण आहे त्यामुळे तु तिला कशाला फॉलो करतो? असे म्हणत एकाच गावचे दोन मित्र एकमेकांना भिडले. मात्र, हा वाद काही तरुणांनी मध्यस्ती करुन मिटविला देखील होता. मात्र, पुन्हा एकमेकांकडे खुनशीने पाहणे, एकमेकांना कट मारणे यातून वाद टोकाला जाऊन थेट हत्या करण्यापर्यंत गेला. यात सचिन भानुदास कुरकुटे (वय २२, रा. कुरकुटवाडी, ता. संगमनेर) हा मयत झाला आहे. तर, याप्रकरणी गणेश बबन कुरकुटे (वय २१, रा. कुरकुटवाडी, ता. संगमनेर) यास पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेत मयत सचिन याच्यावर वाघाने हल्ला केला अशी अफवा पसरली होती. मात्र, वास्तवत: त्याच्या गळ्यावर कोयत्याने वार करुन गणेश हा पसार झाला होता. या सर्व घटनेची पोलिसांनी उकल केली असून खरं काय? ते घारगाव पोलिसांनी समोर आणले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी. की, सचिन कुरकुटे आणि गणेश कुरकुटे हे दोघे एकाच गावचे असून ते मित्र होते. मात्र, यांच्यात एक आळेफाटा येथील एक मुलगी क्वामन मैत्रीण झाली. सचिन याने गेल्या काही दिवसांपुर्वीच या मुलीस इन्स्टाग्रामवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली होती. त्यावर गणेश म्हणाला. की, ती माझी मैत्रीण आहे. त्यामुळे तु तिला फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवू नको. मात्र, तरी देखील सचिनने ऐकले नाही. तो देखील तिला फॉलो करत होता. त्यामुळे यांच्यातील भावनिक वाद टोकाला गेला. दि. २६ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास आरोपी गणेश हा बोटा येथे जात होता. तेव्हा मयत सचिन याने त्याला दुचाकीचा कट मारला होता. तेव्हा देखील या दोघांमध्ये बाचाबाची झाली होती. तेथे सचिनने गणेशला शिविगाळ करुन दमदाटी केली होती. त्यामुळे, गणेशच्या डोक्यात प्रचंड राग निर्माण झाला होता.
दरम्यान, दुसर्या दिवशी सचिनचा काटा काढायचा असा निर्धार गणेशने केला आणि दि. २७ ऑक्टोबर २०२३ रोजी रात्री तो सचिनच्या घराकडे निघाला. सचिनच्या घराच्या परिसरात एक तळे आहे. तेथे आरोपी गणेशने गाडी उभी केली आणि चोर पावलांनी तो सचिनच्या घराजवळ आला. तो बाहेर कोठे झोपतो याची कल्पना आरोपीस होती. त्यामुळे, तो बरोबर तेथे गेला आणि सचिनच्या तोंडावरील गोधडी उचकून त्याने खात्री केली. सचिन झोपेत असतानाच गणेशने त्याच्या गळ्यावर धारधार कोयत्याने वार केला आणि तो तेथून पसार झाला. तळ्याच्या जवळ गाडी लावली होती ती घेतली आणि रक्ताने माखलेला कोेयता त्याने तळ्यात फेकून दिला. त्यानंतर गावात कोणाला संशय यायला नको म्हणून आरोपी गणेश याने थेट आळेफाटा गाठले आणि एका मित्राच्या रुमवर जाऊन निवांत झोपला.
इकडे सचिन कुरकुटे हा तडफडत होता. त्याच्या तोंडातून केवळ थोडाच आवाज येत होता. त्यामुळे, त्याचा भाऊ उठला. तेव्हा त्याने पाहिले. की, सचिन तडफडतो आहे, त्याच्या गळ्यातून रक्त येत आहे. म्हणून भावाने सर्वांना जागे केले. शेजारील व्यक्ती देखील आल्यानंतर सचिनला बोटा येथील थोरात दवाखान्यात नेले. मात्र, तेथे डॉक्टर नसल्याने आळेफाटा येथे न्यावे लागले. तोवर फार उशिर झालेला होता. सचिनवर एकच घाव पण तो खोलवर होता. त्यामुळे, अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने तो मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. मात्र, हे झाले कशामुळे? त्याचे कारण कोणालाच माहित नव्हते. रात्रीची वेळ असल्यामुळे शंभर टक्के बिबट्याने हल्ला केला असणार असा अनेकांनी तर्क लावला. त्यामुळे, आरोपीने मोकळा श्वास टाकला. माध्यमांमध्ये देखील बिबट्याला आरोपी करण्यात आले. मात्र, त्या घटनेमागिल वास्तव वेगळेच होते. या दरम्यान, सचिनच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यातून वैद्यकीय अहवाल आणि व्हिसेरा यांच्या माध्यमातून समजले. की, हा बिबट्याचा हल्ला नसून ही नियोजनपुर्वक केलेली हत्या आहे.
दरम्यान, घारगाव पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांनी तपासाची चक्रे फिरविली. याप्रकरणी अनेकांकडे चौकशी करण्यात आली. यात सहा जणांचे जबाब तपासाला दिशा देणारे ठरले. त्यात महत्वाची बाब लक्षात आली. की, सचिन आणि गणेश यांचे क्वामन मैत्रीणीमुळे होणारे वाद गावाला परिचित झाले होते. त्यामुळे, पोलिसांनी आपला मोर्चा गणेश कुरकुटे याच्याकडे वळविला. अनेक संशयीत पुरावे हाती आल्यानंतर सर्कमटन्स इव्हिडन्सनुसार गणेश पोलिसांच्या जाळ्यात आडकला. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने उत्तरे देण्यास टाळाटाळ केली. मात्र, पोलिसांच्या तपासापुढे त्याचा गुन्हा दडू शकला नाही. त्यानंतर त्याने जे काही घडले. ते अशा पद्धतीने सविस्तर कथन केले. त्यानंतर पोलिसांनी त्यास बेड्या ठेकल्या आहेत. आज त्यास न्यायालयात हजर केले जाईल. त्यानंतर यात गणेशला कोणीकोणी मदत केली, यात आणखी कोणाचा हात आहे? आणखी काय कारणे आहेत का? याचा उलगडा होणार आहे अशी माहिती पोलीस अधिकार्यांनी दिली.