गर्भपात करताना महिलेचा मृत्यु, बेजबाबदार डॉक्टरांवर गुन्हा दाखल.! जीव वाचविणार डॉक्टर नव्हे जीव घेणारा.!
सार्वभौम (राजूर)-
पोटातील गर्भ खराब असल्यामुळे तो काढून टाकण्याचा सल्ला सोनोग्राफी करणार्या डॉक्टरांनी दिला होता. मात्र, अधिकार नसताना देखील चुकीच्या पद्धतीने गोळ्या देऊन महिलेवर उपचार करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यात महिलेच्या अंगाहून जाऊन अतिरिक्त रक्तस्त्राव झाला आणि ती माऊली झोपेतच मयत झाली. ही धक्कादायक घटना अकोले तालुक्यातील राजूर येथे ११ मार्च २०२३ रोजी रात्रीच्या सुमारास घडली. यात सिताबाई संदिप तळपे (वय २८, रा. शेणीत, ता. अकोले. जि. अ.नगर) या महिलेचा मृत्यु झाला होता. तर, याप्रकरणी मार्च महिन्यात रोखठोक सार्वभौमने आवाज उठविला होता. त्याबाबत पुढील कार्यवाही काय केली पाहिजे आणि डॉक्टर चुकीचे कसे आहेत यावर अभ्यासपुर्ण मांडणी केली होती. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या समितीने चौकशी केली आणि आज ९ महिन्यानंतर मयत महिलेस न्याय मिळाला आहे. या गुन्ह्यात डॉ. बाबासाहेब तुकाराम गोडगे (रा. दिगंबर रोड, राजूर, ता. अकोले) याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी. की, दि. ०४ मार्च २०२३ रोजी सिताबाई तळपे (रा. शेणीत) या महिलेच्या पोटात दुखू लागले होते. त्यामुळे तिला राजूर येथे आणून डॉ. बाबासाहेब गोडगे याच्या स्वामी समर्थ हॉस्पिटल येथे ऍडमिट केले होते. पोट दुखत असल्यामुळे गोडगे याने सोनोग्राफी करण्यासाठी सिताबाई यांना चिठ्ठी दिली होती. तेव्हा तिने वैष्णवी सोनोग्राफी ऍण्ड कलर डॉप्लर क्लिनिक येथे सोनोग्राफी केली आणि तो रिपोर्ट डॉ. भोकनळ यांना दाखविला होता. त्यानंतर भोकनळ यांनी सांगितले. की, सिताबाई यांच्या पोटातील गर्भ खराब असून तो काढून टाकावा लागेल. त्यानंतर मयत महिला आणि तिच्या सोबत असणार्या व्यक्तींनी पुन्हा डॉ. गोडगे यांचेकडे तो रिपोर्ट नेला. त्यांनी काही गोळ्या दिल्या आणि तिला घरी पाठवून दिले.
दरम्यान, त्यानंतर सिताबाई तळपे या माऊलीच्या अंगाहून जाऊ लागले. दि. १० मार्च २०२३ रोजी तिच्या पोटात जास्तच दुखू लागल्याने तिला पुन्हा डॉ. बाबासाहेब गोडगे याच्याकडे आणले गेले. त्याला काही शंका आल्यामुळे त्याने पुन्हा सोनोग्राफी करण्यास सांगितले. त्यावर डॉ. भोकनळ याने सांगितले. की, गार्भपात झाला असला तरी त्याचे काही अवशेष तथा तुकडे गर्भात शिल्लक आहेत. त्यामुळे पोट दुखत आहे. त्यासाठी तुम्हाला गर्भपिशवी साफ करावी लागेल. म्हणून तळपे कुटुंब पुन्हा डॉ. बाबासाहेब गोडगे याच्याकडे गेले. त्याने त्याच दिवशी गर्भपिशवीचे ऑपरेशन केले. काही गोळ्या देऊन तिला घरी पाठवून दिले. आता काही काळजी करु नका, पोट दुखले तरी गोळ्या घेतल्यानंतर सर्व काही ठिक होईल असे सांगितल्यानंतर सिताबाई तेथून घरी गेल्या.
दरम्यान, दि. ११ मार्च २०२३ रोजी रात्री सिताबाई हिचे फारच दुखत होते. त्यामुळे, तिने जेवणापुर्वीची गोळी घेतली आणि ती झोपी गेली. सकाळ झाली तेव्हा तिचे पती तिला उठविण्यासाठी गेले तर तिने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर एकच आरडाओरड झाली आणि चुकीच्या उपचारामुळे एका निष्पाप महिलेचा बळी गेला. त्यानंतर अकोले तालुक्यातील अनेक माध्यमांनी डॉक्टरांच्या विरोधात आवाज उठविला. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. कारण, डॉक्टरांवर गुन्हा दाखल होण्यासाठी त्याला देखील काही प्रक्रिया आहेत. त्यावर रोखठोक सार्वभौमने सविस्तर मांडणी केली होती. त्यानंतर वातावरण शांत झाले, या दरम्यानच्या काळात डॉक्टर, पोलीस आणि पत्रकार यांच्यावर अनेक आरोप प्रत्यारोप झाले. मात्र, ९ महिने वातावरण शांत राहिले.
दरम्यान, या घटनेची चौकशी म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक यांनी आठ जणांची चौकशी नेमली होती. वैद्यकीय अहवाल, पोलिसांची चौकशी, व्हिसेरा, नातावेईकांचे आरोप आणि वास्तव कागदपत्रे यांचा आधार घेऊन अने निष्पन्न झाले. की, यात डॉ. भोकनळ यांची काहीच चुक नाही. त्यांनी जे केले ते कायदेशीर होते. मात्र, डॉ. बाबासाहेब गोडगे यांना गर्भपात करण्याचा अधिकार नाही. गर्भपात करण्याच्या गोळ्या देण्याचा अधिकार नाही. मग त्यांनी हा शहाणपणा केला कशासाठी? केवळ त्याच्या बेजबाबदारपणामुळे आणि चुकीच्या उपचारामुळे सिताबाई तळपे यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर आज शुक्रवार दि. २४ नोव्हेंबर २०२३ रोजी राजूर पोलीस ठाण्यात डॉ. बाबासाहेब गोडगे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.