संगमनेर जेल तोडून सराईत चौघे आरोपी पसार.! पोलीस झोपले होते.! हे सर्व प्री-प्लॅनिंग- पोलिसांचे निलंबन.!

 सार्वभौम (संगमनेर)- 

संगमनेर जेल हे नेहमीच चर्चेत राहिले आहे. कधी अवैध गोष्टी आत आढळून आल्यामुळे, तर कधी भाईंचा बर्थडे जेलमध्ये सेलिब्रेट झाल्यामुळे, कधी पोलिसांना ताटल्या फेकून मारल्यामुळे तर कधी अधिकार्‍यांना शिविगाळ केल्यामुळे. आता तर या जेलचे गज कापून पुन्हा बलात्कार आणि खून प्रकरणातील चार आरोपी पसार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना आज बुधवार दि. ८ नोव्हेंबर २०२३ रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास घडली. यात अत्याचारामधील आरोपी रोशन थापा ददेल, अनिल ढोले, खुन प्रकरणातील राहुल देविदास काळे आणि मच्छिंद्र जाधव अशी पसार झालेल्या आरोपींची नावे आहेत. गार्ड आंमलदार साखर झोपेत असताना या आरोपींनी जेलमधून पलायन केले आणि आता सर्वच पोलिसांची झोप मोडली आहे. या लॉकपला LCB पीआय आणि SP यांनी एकदा तरी भेट दिली पाहिजे. कारण ?येथील अधिकारी केवळ कागदावर व्हिजिट दाखवितात. आरोपींच्या शिव्या आणि धमक्या ऐकण्यापेक्षा दुर्लक्ष केलेले बरे या विचारांनी ही दहशत माजल्याचे मत वर्दीतील काही व्यक्तींनी व्यक्त केले.

हे आहेत पसार आरोपी

 एखाद्या चित्रपटाला लाजवेल अशा पद्धतीने चार आरोपींनी जेल सोडून पलायन केले आहे. बुधवारी पहाटेपर्यंत जेल गार्ड म्हणून संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे राजू गोडे, घारगाव पोलीस ठाण्याचे राजेंद्र मेंगाळ, महिला पोलीस कर्मचारी भांगरे यांची कारागृह रक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. रात्री जेलमधील कैदी यांनी मोजले आणि ते सर्व बरोबर होते. त्यानंतर पोलीस कर्मचारी निवांत झाले. या दरम्यान आरोपींनी जेलचे गज कापण्यास सुरुवात केली. पोलीस गाढ झोपेत आणि अन्य आरोपी देखील गाड झोपेत असताना यांचा हा उपक्रम सुरू होता. मात्र, या कानाची खबर त्या कानाला लागली नाही.

दरम्यान, जेलचे गज कापणे म्हणजे वाटते तितके सोपे नाही. कारण, त्यासाठी लागणारे व्हेक्सपान आणि गज गुपचूप कापण्यासाठी लागणारा कालावधी लक्षात घेता हे एका दिवसाचे काम बिल्कुल नाही. त्यामुळे, हा प्लॅन गेल्या काही दिवसांपासून केल्याचे लक्षात येते. जेव्हा आरोपी गज कापत होते तेव्हा अन्य आरोपींना माहित होते. मात्र, सांगावे तर कोणाला? पोलिसच फॉर असतील तर? कारण, जेलमध्ये केक, मोबाईल आणि अन्य पदार्थ जाऊ शकतात ते कोणाच्या आशिर्वादाने? त्यामुळे, गेल्या वेळी चार पोलीस निलंबित देखील झाले आहेत. त्यामुळे, बाहेर पोलिसांना सांगावे तरी जो जेल कापू शकतो त्याला माणूस काय चिज आहे. त्यामुळे जे चालु आहे ते निमुटपणे पाहणे यापेक्षा उत्तम पर्याय नाही. त्यामुळे, आता सर्वच आरोपी म्हणणार. की, आम्ही झोपेत होतो ते काय करत होते याची कल्पना नाही.

विशेष म्हणजे रोज थोडाथोडा गज कापून आरोपींनी बरोबर ते बाहेर काढले. जेव्हा एक पोलीस कर्मचारी घरी फ्रेश होण्यासाठी गेला तेव्हा एका कर्मचार्‍यास या चौघांनी धमकाविले. हातात गज असल्यामुळे पोलीस देखील घाबरले आणि त्यांनी आरोपींची वाट मोकळी करुन दिली. तुम्हाला आश्‍चर्य वाटेल. की, आरोपी जेलमधून बाहेर आले तेव्हा त्यांना घ्यायला झायलो गाडी त्यांच्या सेवेत हजर होती. ते गाडीत बसले आणि गाडी भरधाव वेगात शहर पोलीस ठाण्याच्या हाद्दीतून निघून गेली. इतका हा प्लॅन पुर्वनियोजत होता. म्हणजे एखाद्या चित्रपटाला देखील लाजवेल असा प्रकार संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पहायला मिळाला.

जेलमध्ये अतिरिक्त कैदी.!

खरंतर कोपरगाव पोलीस ठाण्यातील जेलचे काम चालु आहे. तेथे यापुर्वी दरोड्यातील आरोपी छताचे कौल उचकून पसार झाले होते. तर एकाने त्याच छताला फाशी घेतली होती. त्यामुळे, तेथील आरोपी संगमनेर शहर जेलमध्ये ठेवले आहेत. या कारणास्तव येथेे जेलमधील आरोपींची मर्यादा ओलांडून तब्बल इवल्याशा खोलीत ५५ ते ६० आरोपी राहतात. त्यामुळे, पोलीस उपाधिक्षक यांनी सेशन कोर्टाला भेटून या सराईत आरोपींना येरवाडा किंवा नाशिक येथे पाठविले पाहिजे, येथे क्षमतेपेक्षा जास्त आरोपी झाल्याचे सांगून त्यांना तिकडे पाठविणे कसे योग्य आहे हे सिद्ध करून दिले पाहिजे. कारण, तीन वर्षापुर्वी देखील तीन आरोपी जेलमधून पळाले होते. मात्र, त्यांना तत्काळ बेड्या ठोकल्या होत्या. आता हे सराईत आरोपी पकडणार कसे? हे आव्हाण पोलिसांपुढे आहे. तर, पुणे पोलिसांनी नुकताच एक व्हिडिओ शेअर केला होता. की, जेलमधून आरोपी कसे पसार होतात. त्यातून संगमनेर पोलिसांनी काहीच धडा घेतला नाही. आता या सर्व प्रकारात किती जणांचे निलंबन होते. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण निलंबन बाकी अटळ आहे. 

मोठ्या गुन्ह्यातील आरोपींची दहशत.! 

जेव्हा एखाद्या कुख्यात गुंडावर किंवा सराईत गुन्हेगारावर कलम ३०२ किंवा पोस्को ३७६, डबल मर्डर, सामाजिक द्वेषातून झालेले गुन्हे दाखल होतात. तेव्हा त्यांना माहित असते. की, यात शिक्षा लागणे निच्छित आहे. तेव्हा, हे आरोपी जेलमध्ये असताना कोणताच विचार करत नाहीत. सामान्य आरोपींना मारहाण करणे, पोलिसांना शिविगाळ करणे, जेलमध्ये दहशत माजविणे. कोर्टात नेताना पोलिसांशी हुज्जत घालणे असे प्रकार सर्रस करतात. कारण, त्यांना माहित असते मोठ्या गुन्ह्यात शिक्षा लागणार आहे. त्यामुळे, छोट्या गुन्ह्यांची शिक्षा देखील त्यातच काऊंट केली जाते. त्यामुळे, ते कोणालाच घाबरत नाही. त्याचा सर्वातजास्त त्रास हा गार्ड आंमलदार किंवा कोर्टात हजर करणार्‍या व्यक्तींना होत असतो. मात्र, यात देखील पोलिस पोलिसांसारखे कठोर वागत नाहीत. त्यामुळे, आरोपी देखील त्यांची टर काढण्यात माहिर झाले आहेत.