संगमनेरात पीएसआय लाचलुचपतच्या जाळ्यात, फटाक्याचा स्टॅल लावण्यासाठी पैसे घेतले.! गुन्हा दाखल अधिकारी अटक.!

- सुशांत पावसे

सार्वभौम (संगमनेर) :-

फटाक्याचा स्टॅल लावण्यासाठी परवाना देताना आठशे रुपयांची लाच घेताना संगमनेर शहरातील पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब यादव यास नगरच्या लाचलुचपत पथकाने रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस उपाधिक्षक प्रविणकुमार लोखंडे यांनी मंगळवार दि. ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी केली. याप्रकरणी यादव यास अटक करण्यात आली असून त्याच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या निमित्ताने संगमनेर शहर पोलीस आणि तेथे होणारी लाचखोरी पुन्हा चव्हाट्यावर आली असून संगमनेर तालुका हा भ्रष्टाचारात अव्वल असल्याचे पुन्हा सिद्ध होऊ लागले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, येत्या १० दिवसांवर दिवाळी आहे. त्यामुळे, व्यापारी हे फटाक्याचे स्टॅल लावण्यासाठी लगबग करीत आहेत. हेे परवाना घेण्यासाठी पोलीस परवानगी, त्यानंतर तहसिल परवानगी आणि मग कलेक्टर कार्यालयातून पुढील प्रक्रिया होते. त्यामुळे, संगमनेर शहरातील एका व्यक्तीने ही प्रक्रिया सुरू केली होती. त्यासाठी तो संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गेला होता. तेथे गेल्यानंतर त्याच्याकडे पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब यादव याने काही पैशांची मागणी केली होती. मात्र, तडजोड म्हणून आठशे रुपये देणे ठरले.

दरम्यान, जे काही करायचे ते सर्व कायदेशीर करायचे आहे. परवाना देखील कायदेशीर देणार आहेत. मग, यांना पैसे द्यायचे कशासाठी? त्यामुळे, तक्रारदार याने जाब विचारला. मात्र, त्याला पुन्हा आडकाठी घालुन चालढकलपणा सुरू केला. त्यामुळे, वैतागलेल्या तक्रारदाराने थेट नगरच्या लाचलुचपत विभागाशी संपर्क केला. त्यानंतर प्रविणकुमार लोखंडे यांनी त्यांची एक टिम संगमनेरला पाठविली. ठरल्याप्रमाणे पैसे देणे ठरले आणि त्या क्षणी पोलिसांनी बाळासाहेब यादव याला ताब्यात घेतले. त्यामुळे, संगमनेर शहरात एकच खळबळ उडला. अनेक कर्मचार्‍यांची धावपळ पहायला मिळाली. तर मलिदा गोळा करणारे कोणकोणत्या कोपर्‍यात गायब झाले त्यांनी त्यांचे मोबाईल देखील बंद करुन ठेवले होते. या कारवाईमुळे नगर जिल्ह्यातील लाचलुचपत पथकाने जिल्ह्यातील अनेक सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.

पीआय कंट्रोल जमा होणार का?

नगर जिल्ह्यात लखमी गौतम यांच्यापासून एक प्रथा पोलीस खात्यात पडली होती. की, जर पोलीस ठाण्यात एखादा लाचखोरीचा गुन्हा घडला. ती, त्या पोलीस ठाण्याचा पोलीस निरीक्षक कंट्रोल जमा केला जात होता. त्यानंतर तीच प्रथा एसपी सौरभ त्रिपाटी, त्यांच्या नंतर रंजनकुमार शर्मा आणि अगदी नंतरच्या सगळ्याच एसपींनी चालु ठेवली. आता पोलीस अधिकार्‍यांवर ट्रॅप झाल्यानंतर राकेश ओला हे काय भुमिका घेतात याकडे पोलीस खात्याचे लक्ष लागून आहे. यापुर्वी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अनेक पोलीस कर्मचार्‍यांनी लाच घेतल्याप्रकरणी कारवाई स्विकारली आहे. तर, पोलीस उपनिरीक्षक राणा परदेशी यांच्यानंतर पीएसआय म्हणून आता पुन्हा बाळासाहेब यादव याच्यावर कारवाई झाली आहे. यादव याच्यावर अनेकवेळा काही आरोपी झाले होते. मात्र, त्याची सखोल चौकशी झाली नाही. खात्याअंतर्गत त्याच्यावर वरदहस्त असल्याचे बोलले गेले. मात्र, आता केवळ आठशे रुपयांसाठी लाचखोरीच्या गुन्ह्याला सामोरे जावे लागले आहे. या कारवाईमुळे, संगमनेरातून समाधानकारक प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत होत्या. तर, संगमनेर शहरात मुलीकडून सोने रिकव्हर प्रकरणात देखील एका अधिकार्‍याने किती मलिदा खाल्ला यावर चर्चा होत असून त्याची चौकशी पोलीस अधिक्षक ओला यांनी करावी अशी मागणी होत आहे.