झाडपाल्याचे औषध देतो म्हणून बाबाने मुलीस जंगलात नेवून घाणेरडे कृत्य केले! अल्पवयीन मुलीचा विनयभंग.! तो अटक.!
सार्वभौम (राजूर) :-
आजारी असणार्या १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीस बरे करण्यासाठी झाडपाल्याचे औषध देतो असे म्हणून एका बाबाने राजूर परिसरात असणार्या शिंगणवाडी जंगलात पीडित मुलीस नेवून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. ही घटना शुक्रवार दि. ६ ऑक्टोंबर २०२३ रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. पीडित मुलीला आरोपीचा हेतू लक्षात येताच तिने थेट जंगलातून आरडाओरड करीत पळ काढला. घरी आल्यानंतर आरोपीने जे काही केले ते पालकांना कथन केले आणि त्यानंतर थेट राजूर पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार रुपेश उर्फ अनिल बुधा सोनवणे (रा. मुरशेत, ता. अकोले) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी. की, गेल्या काही दिवसांपासून उडदावणे परिसरात राहणार्या एका मुलीची तब्बात ठिक नव्हती. काही घरघुती उपचार करुन देखील तिला गुण आला नव्हता. त्यामुळे, पीडितेच्या वडिलांनी तिला आरोपी अनिल सोनवणे याच्याकडे नेवून काही वनस्पती औषधे घेऊन दिली होती. मात्र, तरी देखील पीडित मुलीस फारसा गुण पडला नाही. त्यानंतर आरोपी सोनवणे याने पीडित मुलीस फोन केला. की, तुला जे औषध दिले आहे. त्यात एक झाडपाल्याचे औषध द्यायचे बाकी आहे. त्यामुळे, तुला फारसा गुण आला नाही.
दरम्यान, पीडित मुलीस भेटण्यासाठी अनिल बुधा सोनवणे म्हणाला, की मी आज (दि.६) सायंकाळी उडदावणे येथे येणार आहे. ठरल्याप्रमाणे तो पीडितेच्या घरी गेला आणि सायकाळी ७ वाजण्याच्या सुमारास त्याने पीडित मुलीस सांगितले. की, आपल्याला शिंगणवाडीच्या जंगलात जायचे आहे. तुला ज्या वनस्पतीने गुण येऊ शकतो. ती वनस्पती त्याच जंगलात आहे. त्यामुळे, या व्यक्तीवर तिने डोळे झाकून विश्वास ठेवला आणि ती त्याच्या गाडीवर बसली. त्यानंतर सोनवणे याने अंधार पडत चालला होता हे लक्षात घेऊन तिला शिंगणवाडीच्या जंगलात नेले आणि तेथे काही ठिकाणी झाडपाल्याची शोधाशोध करण्याचे नाटक केले.
दरम्यान, शिंगणवाडीच्या जंगलात निर्जनस्थळी कोणी नसल्याचा फायदा घेत अनिल सोनवणे याने पीडित मुलीस जोराची मिठी मारली. तु मला फक्त दोन मिनीट वेळ दे, मी तुझा जास्त वेळ घेणार नाही. तुला तितके पैसे हवे आहेत तितके पैसे देतो असे म्हणून पुन्हा मिठी मारली. त्यावेळी आरोपीचा हेतू पीडित मुलीच्या लक्षात आला. तिचे त्याला जोराने बाजुला लोटले आणि शिंगणवाडीच्या जंगलातून पळ काढला. आरोपीने तिला थांबविण्याचा प्रयत्न केला. जे झाले ते कोणाला सांगू नको अन्यथा वाईट परिणाम होतील असे म्हणून ती तिला विनंती करीत होता. मात्र, पीडित मुलीने थेट गाव गाठले. त्यानंतर घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितला. पालकांनी मुलीस घेऊन थेट राजूर पोलीस ठाणे गाठले आणि अनिल बुधा सोनवण याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
अशा घटनांना बळी पडू नका.!
दुर्गम भागात राहणार्या माय माऊली आणि सर्व आदिवासी बांधवांना विनंती आहे. की, निसर्गातील वातावरण हे वारंवार बदलत असते. त्यामुळे, अनेकदा थंडीताप आणि अन्य आजार स्थानिक लोकांवर ओढावत असतात. त्यावर उपचार म्हणून पहिल्यांदा प्राथमिक आरोग्यकेंद्र किंवा शहर किंवा गाव जवळ करुन तेथून उपचार घेतले पाहिजे. अनेक वेळा अंधश्रद्धेमुळे अघोरी विद्या किंवा झाडपाला यांच्यामुळे एकतर व्यक्ती दगावल्याच्या घटना घडलेल्या आहेत किंवा पीडित महिलांच्या अशक्तपणाचा गैरफायदा घेऊन त्यांच्यावर अत्याचार झाले आहेत. त्यामुळे, शक्यतो अशा घटनांना बळी पडण्यापेक्षा डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावेत.