आरे देवा.! दराडेवर आणखी एक गुन्हा, जेसीबी चालकान नग्न करुन गावाबाहेर काढण्याची धमकी, सामाजिक बुरखे घालुन ठेकेदारांची मक्तेदारी.!
सार्वभौम (अकोले) :-
आम्हाला न विचारता काम कसेकाय घेतले आणि ते चालु कशाला केले असे म्हणत चार ठेकेदारांनी एका जेसीबी चालकास शिविगाळ दमदाटी करुन मारहाण केली. तुझा जेसीबी बंद कर अन्यथा तुझे कपडे काढून तुला नागडं करुन गावाबाहेर काढून देईल अशी धमकी दिली. त्यावर जेसीबी चालक म्हणाला. की, मला ठेकेदार आणि कामाबाबत काही एक माहित नाही, मी एक कामगार आहे. त्यामुळे, जे बोलायचे ते शेठशी बोला. हे काम जलजीवन मिशन मधून चालु आहे. तेव्हा उपस्थित चौघांनी काही एक ऐकले नाही. ही घटना रविवार दि. २२ व २३ ऑक्टोबर २०२३ रोजी दोन वेळा घडली. यात आकाश भागवत पवार (रा. पांगरी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संजय शंकर दराडे (रा. समशेरपूर, ता. अकोले), अनिल वाकचौरे (रा. पिंपळगाव निपाणी, ता. अकोले), किशोर गायकवाड व ऋषिकेश अशा चौघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी. की, आकाश पवार हे ठेकेदार विनायक काळे यांच्याकडे जेसीबी चालक म्हणून चालक आहेत. ते रविवार दि. २२ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अकोले तालुक्यातील आंबेवंगन शिवारात मुरलीधर धांडे यांच्या घराजवळ काम करीत होते. तेव्हा संजय शंकर दराडे हा तेथे आला. तु जेसीबी बंद कर असे म्हणून पवार यास दमदाटी करु लागला. पवार याने तत्पुरता जेसीबी बंद केला. मात्र, दराडे म्हणाला. की, जर काम चालु केले. तर, तुझे कपडे काढून फटके देईल आणि नागडा करुन गावाबाहेर काढून देईल असा दम देऊन निघुन गेला होता.
दरम्यान, दराडे याला विचारून काम सुरू केले नाही म्हणून हे काम बंद केले असे पवार याने फिर्यादीत म्हटले आहे. हे काम जलजीवन मिशन अंतर्गत आंबेवंगन येथे चालु आहे. यात जेसीबी चालक पवार याचा काही एक संबंध नसताना त्यास दमदाटी करण्यात आली. तर, दुसर्या दिवशी सोमवार दि. २३ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास आंबेवंगण गाव शिवारातील दरचीवाडी येथे पवार काम करीत होेते. तेव्हा तेथे संजय शंकर दराडे, अनिल वाकचौरे, किशोर गायकवाड व ऋषिकेश हे आले आणि त्यांनी शिविगाळ दमदाटी करुन काम बंद केले. तर, तुझा जेसीबी फोडून टाकू आणि तुझा जीवे मारुन टाकू अशी धमकी दिली. त्यानंतर पवार याने रात्री राजूर पोलीस ठाणे गाठले आणि चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.
ठेकेदारांचा माज आणि मक्तेदारी.!
अकोल्यात ठेकेदारीच्या माध्यामातून अनेकांनी अकोले तालुका चावून खाल्ला आहे. लाखो रुपयांचे काम करायचे आणि अधिकार्यांना मलिदे देऊवून बक्कळ पैसा कमवायचा हा धंदा सुरू आहे. यात अनेकांनी दोन नंबर धंदे करून, लोकांना लुटून सामाजिक आणि सांस्कृतीकतेचा बुरखा चढविला आहे. उठसुठ जातीयवाद करणे, अनेकांवर हात उचलणे, आपण तालुक्यातील ठेकेदारांचा बाप आम्हाला विचारल्याशिवाय ठेकेदारी करायची नाही, आमच्या भागात कोणी टेंडर भरायचे नाही अशी मक्तेदारी अकोल्यात सुरू आहे. अनेकांना ब्लॅकमेल करणे, अधिकार्यांच्या उराडावर बसणे, त्यांनी एकले नाही तर त्यांच्यावर खोटे ट्रॅप घडवून आणणे अशा प्रकारची दादागिरी तालुक्यात रुढ झाली आहे. मात्र, डॉ. किरण लहामटे यांनी ती भाईगिरी बर्यापैकी मोडीत काढली येणार्या काळात देखील अशा व्यक्तींच्या नांग्या ठेचण्याची गरज असल्याचे बोले जात आहे. तर, ज्यांना-ज्यांना अशा व्यक्तींकडून त्रास होतोय त्यांनी गुन्हे दाखल करण्यास पुढे यावे. अन्याय सहन करु नये असे आवाहन वर्दीकडून करण्यात आले आहे. तर, पोलीस ठाण्यात गुंडागर्दी केल्यानंतर राजूर पोलिसांनी कोणाच्या दबावाला बळी न पडता गुन्हे दाखल केले. त्याबद्दल अकोले तालुक्यातून राजकीय, सामाजिक व व्यापारी क्षेत्रातून सहायक पोलीस निरीक्षक प्रविण दातरे यांचे कौतुक केले जात आहे.