एक मराठा लाख मराठा; आरक्षण नाही म्हणून तरुणाची आत्महत्या.! आम्ही जातो आमच्या गावा... मृतदेहाजवळ चिठ्ठी

     

सार्वभौम (संगमनेर) :-

आम्ही जातो आमच्या गावा, एक मराठा लाख मराठा, आम्हाला आरक्षण नसल्यामुळे मी फाशी घेत आहे. यात कोणाला जबाबदार धरु नये, आपला लाख मराठा सागर अशी चिठ्ठी लिहित सागर भाऊसाहेब वाळे (वय २७, रा. झोळे, ता. संगमनेर, जि. अ.नगर) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज मंगळवार दि. ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी पहाटेच्या सुमारास घडली. सकाळी त्याच्या पालकांनी उठून पाहिले तेव्हा एका पडवित सागरचा मृतदेह छताला लटकताना दिसला. तर, शेजारी एक चिठ्ठी देखील दिसली. त्यानंतर सदर घटनेची माहिती पोलिसांना दिली असता त्यांनी पुढील कायदेशीर कारवाई केली. तर, आज सकाळी ११:४० वाजता त्याच्यावर झोळे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

याबाबत सविस्तर माहिती अशी. की, सागर हा डिग्री पुर्ण केलेला एक सुशिक्षित तरुण आहे. तो संगमनेर तालुक्यातील झोळे गावचा असला तरी तो कामासाठी संगमनेरला येत होता. नेहमीप्रमाणे त्याने काम करुन तो रात्री घरी गेला आणि जेवण करुन बेडवर पडला होता. राज्यातील मराठा आरक्षणावर चालु असणार्‍या घडामोडी त्याने मोबाईलवर पाहिल्या. आरक्षण का मिळत नाही? आजून किती दिवस हा लढा लढावा लागेल, किती लोकांचे जीव सरकारला पाहिजे आहे? अशा अनेक संकल्पना त्याच्या डोक्यात सुरू असाव्यात. मराठा आरक्षणावर अतिरिक्त विचार केल्यामुळे त्याने घराच्या मागे पडवीत जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. अशी माहिती पोलिसांनी दिली. तर आरक्षण आणि राज्यात चालु असलेल्या घडामोडी यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे असे अनेकांना वाटते.  

मराठा समाजास ओबीसी प्रमाणे आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे अमरण उपोषणास बसले आहेत. त्यांना सपोर्ट म्हणून राज्याच्या कानाकोपर्‍यात हजारो गावांमध्ये साखळी उपोषण सुरू आहे. १९८१ पासून प्रलंबित असणार्‍या प्रश्‍नावर आजकाल तरुण आत्मचिंतन करु लागले असून त्यांना सरकार या विषयाचा आता घृणा येऊ लागली आहे. मनोज जरांगे यांची तळमळ, त्यांची तब्बेत, कुटुंबाची वाताहात आणि समाजात चालु असलेली घडामोड ही खरोखर अस्वस्थ करणारी आहे. त्यामुळे, आत्तापर्यंत या सहा महिन्याच्या काळात १० ते १२ जणांनी केवळ मराठा आरक्षण मिळत नाही म्हणून आत्महत्या केल्या आहेत. यात विशेष म्हणजे सर्व घटना डोळ्यासमोर घेतला तर लक्षात येते. की, आरक्षणासाठी प्राणाची आहुती देणारे सर्वच अगदी तरुण आहेत.

शिंदे, फडणविस आणि पवार सरकारने आता तरी तत्काळ विशेष आधिवेशन बोलविले पाहिजे. जो काही निर्णय घ्यायचा आहे तो घेतला पाहिजे. राज्यात मराठा बांधव सकाळी उन्हात तर संध्याकाळी थंडीत उपोषण करीत आहेत. मनोज जरांगे पाटलांची तब्बेत खराब होत चालली आहे. त्यामुळे, सरकारला आणखी किती बळी हवे आहेत? पुर्वी २०१८ मध्ये जे आरक्षण दिले होते. त्याप्रमाणे आरक्षण जाहिर करुन ते सुप्रिम कोर्टात टिकेल असे निर्णय घेतले पाहिजे. तर विशेष म्हणजे भाजपाची केंद्रात सत्ता आहे त्यांनी राज्यात डोकं खाजवत बसण्यापेक्षा केंद्रातून हालचाली केल्या तर हा प्रश्‍न तत्काळ व कायमस्वरुपी मार्गी लागेल असे तज्ञांना वाटते आहे.