शिंदे गटाच्या शहरप्रमुखावर दोन गंभीर गुन्हे दाखल.! बापाची आत्महत्या, मुलास फायटरने मारहाण.! सहा जण आरोपी...
सार्वभौम (अकोले) :-
तुम्ही लोकं निट राह, नाहीतर तुम्हाला गावात राहु देणार नाही अशी धमकी शिंदे गटाचे शहरप्रमुख गणेश कानवडे यांनी मयत राजेंद्र सुर्यवंशी यांना दिली होती. कानवडे यांच्याकडून मयताच्या मुलास होणारा त्रास आणि वारंवार येणार्या धमक्या यामुळे सुर्यवंशी यांनी स्वत: राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवणयात्रा संपविली. तर, मी गणेश कानवडे याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करतो आहे. अशी चिठ्ठी देखील त्यांनी लिहून ठेवली. ही घटना रविवार दि. १५ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अकोले शहरातील लोकमान्य गल्ली येथे घडली. यात राजेंद्र रघुनाथ सुर्यवंशी (वय ६०, रा. लोकमान्य गल्ली, अकोले) हे मयत झाले असून गणेश भागुजी कानवडे (रा. अकोले) यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फिर्यादीत दिलेली सविस्तर माहिती अशी. की, मयत राजेंद्र यांचा मुलगा अमोल सुर्यवंशी हा अगस्ती डेव्हलपर्स येथे सुपरवायझर म्हणून काम करतो. तो राजगुरूनगर येथे कामावर असताना गणेश कानवडे यांनी त्यास धमकी दिली होती. तेव्हा अमोल याने खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर तो पुन्हा अकोले येथे अगस्ती डेव्हलपर्सचे काम करीत होता. मात्र, येथे देखील कानवडे यांनी त्याचा पिछा सोडला नाही. त्यामुळे, अमोलचे वडील राजेंद्र हे प्रचंड अस्वस्थ होते. गेल्या जून महिन्यात मयत राजेंद्र हे कालिकामाता मंदिराकडून घराकडे चालले होते. तेव्हा कानवडे यांनी त्यांना रस्त्यात आडविले आणि म्हणाले. की, तुमच्या मुलास काही समजून सांगा. नाहीतर तुम्हा सगळ्यांना मी सोडणार नाही. तेव्हा घडला प्रकार त्यांनी मुलगा अमोल यास सांगितला होता. मात्र, तरी देखील सुर्यवंशी या कुटुंबाने त्या धमक्यांकडे दुर्लक्ष केले होते.
दरम्यान, शुक्रवार दि. १३ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास गणेश कानवडे हे मयत राजेंद्र सुर्यवंशी यांच्या घरासमोर येेऊन म्हणाले होते. की, तुम्ही लोक निट रहा, तुम्हा सगळ्यांना गावात राहू देणार नाही. यांच्यात चकमक झाल्यानंतर राजेंद्र सुर्यवंशी यांनी घडलेला प्रकार पुन्हा मुलगा अमोल यास सांगितला. त्यानंतर रात्री १० वाजण्याच्या सुमारास अमोल हा अगस्ती डेव्हलपर्स हे कार्यालय स्वच्छ करण्यासाठी चालला होता. तेव्हा कानवडे समोर आला आणि या दोघांमध्ये चांगलीच झटपाट झाली. यात अमोल यास चार ते पाच जणांनी मारहाण केली होती. त्याच्या डोळ्याला लागल्यामुळे तो उपचार घेत होता.
दरम्यान, हा रोजचा वाद आणि धमक्या यामुळे राजेंद्र सुर्यवंशी हे अक्षरश: कंटाळून गेले होते. त्यामुळे, शनिवारी ते जेवण करुन झोपी गेले. सकाळी उटल्यानंतर त्यांना कानवडे यांच्याशी वारंवार होणारे वाद अस्वस्थ करत राहिले. त्यामुळे, रविवार दि. १५ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चौकशी सुरू केली तेव्हा तेथे दोन चिठ्ठ्या मिळून आल्या. त्यात लिहीले होते. की, गेल्या दोन वर्षापुर्वी गणेश कानवडे हा मला जीवे मारण्याची धमकी देत आहे. त्यामुळे, मी आत्महत्या करीत आहे. दोन्ही चिठ्ठ्यांमध्ये एकच मजकूर होता. त्यानंतर पोलिसांनी चौकशीअंती कानवडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
फायटरने मारहाण, सहा जणांवर गुन्हे.!
अमोल सुर्यवंशी याने फिर्यादीत म्हटले आहे. की, दि. शुक्रवार दि. १३ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास गणेश कानवडे व संग्राम कानवडे ऑफीसच्या खाली आले आणि त्यांनी शिविगाळ दमदाटी करुन निघुन गेले. त्यानंतर पुन्हा रात्री ११ वाजण्याच्या सुमारास आले आणि संग्राम कानवडे याने माझी गच्ची धरुन चपाचप गालात चापटीने मारले तर गणेश कानवडे याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी संग्राम याच्या हातात फायटर होते. त्याने तो डोळ्यावर मारले असता तेथून रक्त निघु लागले. यावेळी संग्राम व गणेश यांच्यासह तेथे सहा जणांनी मारहण केली. तर, काही व्यक्तींनी हा वाद सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अमोलने थेट पोलीस ठाणे गाठले आणि घडलेली हकीकत सांगितली. पोलिसांनी त्यास वैद्यकीय उपचारासाठी मेमो दिली. वैद्यकीय अहवालानुसार गणेश कानवडे, संग्राम कानवडे, पठाण याच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.