विनयभंग दाखल होताच प्रियकराची आत्महत्या, सात जणांवर गुन्हे दाखल, एका चुकीमुळे दोन कुटुंब अस्वस्थ.!


सार्वभौम (संगमनेर) :-

 एकतर्फी प्रेमातून कॉलेज तरुणीची छेडछाड केल्यानंतर तिने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे, आता आपली इज्ज जाईल, अटक होईल, नातेवाईक काय म्हणतील, समाज काय म्हणेल अशा अनेक प्रश्‍नांचे काहुर त्याच्या डोक्यात माजले आणि त्याने विषारी औषध घेऊन आपली जीवणयात्रा संपविली. ही घटना शुक्रवार दि.१३ आक्टोंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजण्यापुर्वी मालदाड शिवारातील फॉरेस्ट परिसरात घडली. विजय रावसाहेब कुटे (वय ३७, रा. सुकेवाडी, ता. संगमनेर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. याने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या पत्नीने थेट पोलीस ठाणे गाठले आणि पतीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणार्‍या सात जणांवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी. की, विजय कुटे याचे ११ वी कक्षेत शिकणार्‍या एका मुलीवर प्रेम होते. मात्र, संबंधित तरुणीकडून त्याला कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. ती कॉलेजला जात असताना याने तिला आडविले आणि मला तुझ्याशी काही बोलायचे असे म्हणून तिची ओढणी ओढली होती. या प्रकारानंतर पीडित मुलीच्या फिर्यादीनुसार संगमनेर शहर पोलीस ठाण्यात छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर विजय कुटे हा पसार झाला होता. त्याचा पोलिसांनी आणि घरच्यांनी शोध घेतला. मात्र, विजय मिळुन आला नाही.

दरम्यान, विजय कुटे यांची पत्नी साधना यांना एका महिलेचा  फोन आला होता. तिने सांगितले होते. की, विजय याने एका तरुणीची छेडछाड काढल्यामुळे आम्ही त्यास मारहाण केली आहे. त्यानंतर विजय कोठे आहे याची कोणालाच माहिती नव्हती. मात्र, शुक्रवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने विजयचा मोबाईल त्याच्या घराबाहेरील अंगणात आणून ठेवला होता. मात्र, विजय कोेठे आहे याची कल्पना कोणला मिळाली नाही. त्यानंतर त्याच्या कुटुंबाने सगळीकडे शोधाशोध केली. मित्र, नातेवाईक, बसण्याची ठिकाणी येथे वारंवार विचारपूस केली. मात्र, त्याचा शोध लागला नाही.



त्यानंतर शुक्रवार दि. १३ आक्टोंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास साधना ह्या संगमनेर शहरात एका वकिलाकडे गेल्या असता तेथे त्यांना फोन आला. की, मालदाड येथील फॉरेस्ट परिसरात एक पुरूष जातीचे प्रेत पडलेले आहे. त्याची ओळख पटविण्यासाठी तुम्ही इकडे यावे. त्यानंतर चौकशी झाली तेव्हा लक्षात आले. की, संबंधित मृतदेह हा विजय कुटे यांचाच आहे. त्या प्रेताजवळ असणारी गाडी देखील त्यांचीच होती. त्यानंतर हा मृतदेह घुलेवाडी येथील रुग्णलयात आणण्यात आला होता. तर, नंतर तो शवविच्छेदन करण्यासाठी लोणी येथे नेण्यात आला. ही आत्महत्या नसून त्याचा खून करण्यात आला आहे असा आरोप देखील करण्यात आला होता. मात्र मेडिकल रिपोर्ट येईपर्यंत सुकेवाडीत प्रचंड तनावाचे वातावरण निर्माण झालेले होते.

दरम्यान, विजय कुटे याने विषारी औषध सेवन केल्यानेच त्यांचा मृत्यु झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर साधना कुटे यांनी संगमनेर शहर पोलीस ठाणे गाठले आणि पतीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यात पोपट सखाराम धुमाळ, गणेश उर्फ सुरज भाऊसाहेब सातपुते, नाना गणपत कुटे, अजय सुनिल सातपुते यांच्यासह चार महिलांना आरोपी करण्यात आले आहे. एका चुकीमुळे, एक जीव गेला तर दोन गुन्हे दाखल होऊन आठ जणांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे राहवे लागले. त्यामुळे, दोन कुटुंब अस्वस्थ झाले असून अशा घटनांपासून अनेकांनी बोध घेतला पाहिजे.