शाळेचा गेट अंगावर पडून १० वी च्या विद्यार्थ्याचा मृत्यु, एक जखमी, तिघे-चौघे बचावले, पालक आक्रमक, अंत्यविधी शाळेत करणार.!

  

सार्वभौम (अकोले) :-

     अगस्ति विद्यालय समशेरपूर येथे इयत्ता १० वी च्या वर्गात शिकणार्‍या एका विद्यार्थ्याच्या अंगावर शाळेचा गेट पडून त्याचा मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना आज दि. १४ आक्टोंबर २०२३ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. यात पांडुरंग बाळु सदगीर (रा. मुथाळणे, ता. अकोले. जि. अ.नगर) हा विद्यार्थी मृत्यु पावला आहे. तर, सकाळी शाळा उघडताना गेट खुला करण्यासाठी पाच ते सहा मुले गेली होती. गेट पडताना बाकी मुले पळाली. मात्र, सदगीर हा पुढे असल्यामुळे त्याच्या डोक्यावर गेट पडले आणि तो जागीच मयत झाला. या घटनेनंतर पालक घटनास्थळी पोहचले असून त्यांनी एकच हांबरडा फोडला आहे. तर, शाळा व्यवस्थापनाच्या हालगर्जीपणामुळे ही घटना घडली असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे तर मुलाचा अंत्यविधी हा शाळेत करणार अशी संतप्त प्रतिक्रिया पालकांनी दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी. की, अगस्ति विद्यालय समशेरपूर या शाळेत मुथाळणे, सरमशेरपूर, कोथळे, कोंभाळणे अशा वेगवेगळ्या गावांमधून दोन हजार विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी येतात. येथे दर शनिवारी सकाळची शाळा असते. त्यामुळे, मुथाळणे येथून सकाळीच काही विद्यार्थी आले होते. गाडी पहाटे पाच वाजता असल्यामुळे काही विद्यार्थी वेळेच्या आधिच येतात. त्यानुसार पांडुरंग सदगीर हा देखील लवकर आला होता. त्याच्यासह काही मुले शाळेत प्रवेश करत असताना गेट अचानक कोसळला. त्या क्षणी तेथील काही विद्यार्थी प्रसंगावधान राखून मागे पळाले. मात्र, पांडुरंगला मागे पळण्याची संधी दैवाने दिलीच नाही.

दरम्यान, लोखंडी गेट अंगावर पडल्याने तो तडफडत होता. मात्र, भितीपोटी कोणी जवळ गेले नाही. गेट जड असल्यामुळे, मुलाच्या डोक्याला मार लागला आणि अंतर्गत रक्तस्त्राव होऊन त्याचा मृत्यु झाला अशी प्राथमिक माहिती पालकांच्या हाती आली होती. तर, याच वेळी मुथाळणे गावचा दुसरा मुलगा बबलु सदगीर या विद्यार्थीस देखील मार लागला असून त्याच्यावर देखील उपचार सुरु आहे. मात्र, सुदैवाने त्याला फारसे लागले नाही. ही घटना घडल्यानंतर तेथील अन्य काही विद्यार्थी आणि शिक्षक यांनी पांडुरंग सदगीर याच्या अंगावर पडलेला गेट उचलला. त्याला उपचार करण्यासाठी देखील सुविधा तत्काळ नव्हती. नंतर मात्र फार उशिर झालेला होता. तोवर लेकराने प्राण सोडून दिले होते.

ही घटना काही वेळात अगदी वार्‍यासारखी पसरली. त्यानंतर मुलाचे आई वडीलांना याबाबत कल्पना मिळताच त्यांनी हांबरडा फोडला. काही वेळात शाळेभोवती गर्दी जमा झाली मात्र मुलाच्या नातेवाईकांनी शिक्षक आणि व्यवस्थापनाचे वाभाडे काढले. त्यांच्या भावना अनावर आणि अतिशय तिव्र असल्यामुळे शाळेच एकच गदारोळ माजला होता. आम्हाला आमचा मुलगा पाहिजे, ज्या शाळेने त्याचा बळी घेतला त्याच शाळेत मुलाचा अंत्यविधी करावा अशी ठाम भुमिका पालकांनी घेतली होती. त्यानंतर या विद्यार्थ्यास तेथील रुग्णालयात नेवून शवविच्छेदन करण्याचे काम सुरू होतेे. त्यानंतर पालका काय भुमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

होय.! ही तर शाळेची चूक...

अगस्ति विद्यालय म्हणजे काही कमी पसारा नाही. आपल्याकडे हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात म्हणजे त्यांच्या भविष्याला आकार देताना त्यांच्या जीवाचा देखील विचार केला पाहिजे. शाळेच्या भौतिक सुविधांमध्ये इमारत, गेट, खेळणी, मैदान, संरक्षण भिंती यांसह अनेक गोष्टींचा सामावेश होतो. त्या कशा आहेत, त्यांपासून काही धोका निर्माण होणार तर नाही ना? याकडे शाळा आणि व्यवस्थापन यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. नगर तालुक्यातील निबोडी येथील शाळा पडली आणि त्यात तीन विद्यार्थींचा मृत्यु झाला होता. त्यानंतर सर्व खोल्यांची चौकशी लागली. म्हणजे, एखादी निकृष्ट वस्तू तपासण्यासाठी ती दुरुस्त करण्यासाठी कोणाचीतरी आहुती द्यावी लागते. त्यामुळे, आता शाळेचे गेट, इमारती यांची चौकशी करण्यासाठी ही घटना पुरेशी आहे. त्यामुळे, आता तरी शाळा व्यवस्थापनांना शहानपण आले पाहिजे.

बस मुथाळण्यात मुक्कामी असती तर...!!

सन २००३ साली संगमनेर ते मुथाळणे ही बस सुरू झाली होती. ही बस मुथाळणे येथे मुक्कामी असते. मात्र, बस चालक आणि वाहक हे मुथाळणे गावी बस मुक्कामी न ठेवता समशेरपूर येथे मुक्कामी राहतात. त्यामुळे, विद्यार्थ्यांना कधी लवकर तर कधी उशिरा असा प्रवास करावा लागतो. जे विद्यार्थी संगमनेर येथे शिक्षण घेतात त्यांच्या जेवणाचे डब्बे याच गाडीने येतात. मात्र, गाडी कधी चार वाजता तर कधी पाच वाजता, कधी साडेचार ते कधी साडेपाच वाजता येते. हे सर्व चालक वाहक यांच्या जाग येण्यावर असते. त्यामुळे, ही गाडी रेकॉर्डनुसार मुथाळणे येथे मुक्कामी आहे तर ती तेथेच मुक्कामी रहावी अशी मागणी पालकांनी केली आहे. मयत विद्यार्थी हा याच गाडीने आला होता. आज गाडी लवकर आल्यामुळे तो लवकर शाळेत पोहचला होता.