आता अकोल्यातील आमदार आणि शिर्डीत खासदार कॉंग्रेसचा असेल, भाजपात गेल्याने पिचडांचा पराभव - आ. बाळासाहेब थोरात.!

- सागर शिंदे 

सार्वभौम (अकोले) :-

अकोले तालुका हा पुरोगामी विचारांचा आहे, येथे स्वातंत्र्यपुर्व काळापासून कॉंग्रेसची विचारधारा वृद्धींगत होत आली आहे. म्हणून १९५२ पासून सुरू झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत गोपाळराव भांगरे ते १९९९ पर्यंत मधुकर पिचड यांच्या रुपाने अकोले तालुक्यात कॉंग्रेसचे तत्व रुजविले गेले आहे. तेव्हापासून पिचड हे किती प्रभावी नेतृत्व होते. मात्र, त्यांनी २०१८ साली भाजपात प्रवेश केला आणि जनतेने त्यांचा प्रभाव संपवून डॉ. किरण लहामटे यांना लाखो मताधिक्य देऊन निवडून आणले. कारण, येथील मतदार जागरुक व विचारवंत असून त्यांची काही वैचारिक तत्वे आहेत म्हणून तर या तालुक्याला पुरोगामी म्हणून ओळखले जाते. अकोले तालुका हा पुर्वी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असून येणार्‍या काळात येथे कॉंग्रेसचा आमदार आणि शिर्डी लोकसभा मतदार संघात कॉंग्रेसचा खासदार असणार आहे असे प्रतिपादन माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. ते अकोले शहरात मधुभाऊ नवले यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या जनसंवाद यात्रेस संबोधित करताना बोलत होते.

आ. थोरात म्हणाले. की, अकोले तालुक्यात जनसंवाद यात्रेस जो काही प्रतिदास व यश मिळाले आहे त्यानुसार असे वाटते आहे. की, येथे कॉंग्रेससाठी वातावरण चांगले आहे. या जनसंवाद यात्रेत मुळा विभागातील काही कार्यकर्त्यांना सामिल होता आले नाही. मात्र, लक्षात ठेवा ही जनसंवाद यात्रा जोवर निवडणुका चालु आहेत, जोवर अकोल्यात कॉंग्रेसचा आमदार, शिर्डीत खासदार, झेडपीत जास्तीत जास्त सदस्य, पंचायत समितीत सदस्य आणि ग्रामपंचायत निवडणुकीत मोठे यश मिळत नाही. तोवर ही जनसंवाद यात्रा सुरू राहणार असल्याचे ते म्हणाले. आ. थोरात यांनी अकोले तालुक्यात कॉंग्रेस लढणार असे सांगताच अनेकांनी प्रचंड उत्साह दर्शविला.

देशाच्या राजकीय वाटचालीवर बोलताना ते म्हणाले. की, भाजपामुळे देशाची दिशा योग्य दिशेने चाललेली नाही. हे असेच चालत राहिले तर लोकशाही टिकणार नाही, संविधान मोडून पडेल. हे देशासाठी फार घातक ठरणार आहे. जेव्हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना लिहीली तेव्हा त्यांनी संत आणि महात्म्यांच्या तथा महापुरुषांच्या विचारांचा सारांश एकत्र करुन संविधान तयार केले आहे. अगदी सामान्यातल्या सामान्य व्यक्तीच्या पुढे नेत्यांना व मंत्र्यांना झुकावे लागते ही लोकशाही अथार्र्त संविधानाची ताकद आहे. मात्र, असे असताना देखील भाजप हे सत्ता आणि बळाच्या जोरावर लोकशाही विरोधी वागताना दिसत आहेत. तर, जे भाजपात जात नाहीत त्यांच्या चौकशा लावुन इडीचे ससेमिरे लावायचे आणि त्यांना भाजपात जाण्यास मजबुर करायचे उपक्रम काही वर्षांपासून सुरू आहेत. त्यामुळे, भाजपा हे लोकशाहीस पुरक नसल्याची भावना थोरात यांनी व्यक्त केली.

भाजपाने राजकारण आणि सत्ता काबिज करण्यासाठी केवळ जात, धर्म यात भेद निर्माण करण्याचे काम केले आहे. मराठा आरक्षणाची मागणी ही अगदी लोकशाही मार्गाने सुरू होती. कोणाला काही न बोलता मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू होते. मात्र, भाजपानेच ते आंदोलन चिरड्याचा प्रयत्न केला. त्यांना वाटले होते, लाठी-काठ्या मारल्या म्हणजे हे पळून जातील आणि आंदोलन करणार नाही. मात्र, भाजपाची चाल त्यांनाच भारी भरली. नको तेथे नको तसं डोकं झालायच हेच त्यांना कळतं. जेव्हा चांद्रयान तीन हे चंद्रावर गेलं तेव्हा देशाला वाटत होते विक्रम पहायला मिळेल. मात्र, वेताळ मध्येच पाहायला मिळाला असे म्हणत त्यांनी पंतप्रधान मोंदी यांच्यावर निशाणा साधला. तर, कधी राम मंदीर तर कधी जात धर्म, कधी दंगे तर कधी इडी यामुळे यांचे खरे रुप जनेला समजले आहे. मणिपूर येथे महिलेवर सामुहीक अत्याचार होतोय, जनता पाहतेय, लोक कॅमेरॅत व्हिडिओ काढतात ही अशी देश चालविण्याची पद्धत आहे का? असा सवाल त्यांनी भाजपाला विचारला.

अकोले पुन्हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला करू.!  

अकोल्यातील जनतेने जनसंवाद यात्रेकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले आहे. या देशाला कोणता विचार तारु शकेल तर तो कॉंग्रेस विचार आहे. हे वैचारिक सामर्थ्य राहुल गांधी यांच्यात असल्यामुळे भाजपाने त्यांना बदमान करण्याचे षडयंत्र आखले आहे. हजारो किमीचा प्रवास गांधी यांनी केला आणि त्यास जनतेने प्रतिसाद दिला हे फार मोठे यश आहे. त्यामुळे भाजपा घाबरली आहे. म्हणून तर कधी जाती-जातीचं राजकारण लावायचं, कधी मराठ्यांना कुणबी तर कधी ओबीसीत टाकूण राजकारण करायचे, कधी दगड फेकायचे, लाठ्या-काठ्या मारायच्या आणि पुन्हा माफी मागायची याहुन दुर्दैव म्हणजे पुन्हा राजे शिवछत्रपतींच्या नावाने राजकारण करायचे असली घाणेरडी राजनिती राज्यात सुरु आहे. हे लोक सत्तेसाठी काय करु शकतात हे देश पाहतो आहे. प्रत्येक राज्यात जायचे, तेथील पक्ष फोडून दल निर्माण करायचे, जे त्याच्या मानाजोगे वागत नाही त्यांच्या मागे इडी लावून द्यायची असले राजकारण भाजपाचे चालु आहे. हे आता कोठेतरी थांबवावे लागणार आहे. म्हणून थोरात साहेबांना विनंती आहे. की, अकोले तालुका हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. केवळ येथील जनतेला संधी मिळाली नाही. म्हणून अकोल्यात पुन्हा कॉंग्रेसचा आमदार होऊ शकला नाही. त्यामुळे, येणार्‍या काळात आघाडीकडून अकोले तालुक्यातील जागा ही कॉंग्रेसला घ्यावी.

- मधुभाऊ नवले (कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते)