सराईत गुन्हेगार व दारु विक्रेत्यांना डॉ. लहामटेंनी दिला पक्षप्रवेश.! गुन्हेगारांचा कर्दनकाळ.! छे, गुन्हेगारांचा सु-काळ.!
सार्वभौम (अकोले)-
मी राजा हरिश्चंद्राच्या नगरीतील सच्चा माणूस आहे, मी गुन्हेगारांचा कर्दनकाळ आहे असे म्हणार्या मा. आ. डॉ. किरण लहामटे यांनी एका गुन्हेगारात आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे. इतकेच काय.! ज्याचे दारुचे गुत्ते आहेत. अशा व्यक्तींना देखील पक्षात घेतले असून त्यांना पदे देण्याचे अभिवचन देण्यात आले आहे. इतकेच काय.! गुन्हेगारांचे कर्दकाळ आहेत तर अकोले, घारगाव आणि राजूर हाद्दीत राजरोस मटका, जुगार आणि गांजा विक्री होते. बेकायदा उत्खनन होत आहे. विशेष म्हणजे, जेव्हा जेव्हा राजूर येथे सभा झाली. तेव्हा तेव्हा एखाद्या दारुड्याने राडा केला नाही. असे एकदा सुद्धा झाले नाही. त्यामुळे, बोलाचा भात आणि बोलाची कढी.! त्यामुळे, आपण गुन्हेगारांचे कर्दनकाळ आहात की सु-काळ अशा प्रकारचा प्रश्न आता पठार भागाहून उपस्थित केला जात आहे.
प्रशांत फटांगरे, राजेश फटांगरे अशा काही व्यक्तींना डॉ. किरण लहामटे यांनी आपल्या पक्षात प्रवेश दिला. अर्थात प्रशांत फटांगरे यांनी यापुर्वी वैभव पिचड यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर अगदी काही दिवसांपुर्वी शिंदे गटात प्रवेश करुन ते बोटा गटाचे उपाध्यक्ष देखील झाले होते. त्यानंतर आता डॉ. लहामटे यांनी त्यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे. त्यांच्या प्रवेशाने आपल्याला बळ मिळाले असे म्हणत डॉ. किरण लहामटे यांनी आनंद साजरला केला. मात्र, प्रशांत फटांगरे यांच्यावर २५ लाख रुपयांचा भ्रष्टाचार केला म्हणून गुन्हा दाखल आहे. दलित वस्तीच्या निधीत भ्रष्टाचार केला म्हणून जिल्हा परिषदेत चौकशी सुरू आहे. तर, अशा आणखी काही गुन्हांमध्ये तो आरोपी आहे. असे असताना देखील पठार भागावर मोठ्या थाटामाटात प्रशांत फटांगरे यांचा पक्षप्रवेश करुन घेण्यात आला. तर, काही दारु विक्रेत्यांना देखील पक्षप्रवेश खुद्द लहामटे डॉक्टर यांच्या हस्ते देण्यात आले आहेत. त्यामुळे, एकीकडे कर्दनकाळ म्हणायचे आणि दुसरीकडे गुन्हेगार आणि अवैध धंद्यावाल्यांना वलय द्यायचे. या दुटप्पी धोरणामुळे जनतेत प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.
कोण आहे प्रशांत फटांगरे.!
प्रशांत फटांगरे हा सारोळे पठार येथील मा. सरपंच आहे. त्याने शासनाच्या निधीमध्ये कोणतेही काम न करता २५ लाख २१ हजार ९११ रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा गुन्हा दि. २१ फेब्रुवारी २०२१ रोजी दाखल आहे. तसेच, दलित वस्ती योजनेतील सन २०१५-१६ मधील २ लाख ४० हजार रुपये स्वत:च्या नावावर काढून भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. त्याची चौकशी जिल्हा परिषद पातळीवर सुरू आहे. तसेच नामदेव धुमाळ यांनी फटांगरे याच्या शेतात मळणी यंत्र नेले नाही. त्यामुळे, त्यांना मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तसेच पाणी टँकरचा प्रस्ताव तयार करत असताना तो फाडून फेकून दिला आणि ग्रामसेवकास आरेरावी करुन धक्काबुक्की करीत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी अजित घुले यांनी घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. असे अनेक कारणामे फटांगरे यांचे आहेत. अर्थात फटांगरे यांच्या कारणाम्यांशी जनतेला काही घेणेदेणे नाही. मात्र, मी भ्रष्टाचाराला स्थान देत नाही, मी गुन्हेगारांचा कर्दनकाळ आहे, मला चुकीची मानसे सोबत नको, मी हरिश्चंद्राच्या नगरितला सच्चा माणूस आहे. अशा घोषणा छाती ठोकून सांगताना त्या आत्मविश्वासामागे हे देखील कारणामे चव्हाट्यावर आणले पाहिजे असे सामान्य नागरिकांचे म्हणणे आहे.
खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे.!
पठार भागावरील सारोळे पठार आणि माळेगाव पठार या परिसरात दारुविक्री केल्याप्रकरणी राजेश फटांगरे यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याचा आरोप होत आहे. तर, यापुर्वी प्रशांत फटांगरे याची पार्श्वभुमी काय आहे, हे देखील अनेकांना माहित आहे. त्यामुळे, डॉ. किरण लहामटे मोठ्या आवेशाने म्हणतात मी गुन्हेगार आणि दारु विक्रेत्यांचा कर्दनकाळ आहे. मात्र, ते तीन चार गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींना आपल्या पक्षात घेण्यासाठी आटापिटा का करतात? हे गणित अनेकांना उलगडत नाही. असे म्हणतात बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले.! पण, येथे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे अशीच कृती होत असल्याची टिका होऊ लागली आहे.
सभा तेथे दारुड्यांचा राडा.!
गेल्या पाच वर्षात जेव्हा-जेव्हा राजूर बाजारपेठेत सभा झाली असेल. तेव्हा-तेव्हा असे एकदाही झाले नाही. की, तेथे दारुड्यांनी राडा केला नसेल. अगदी ती सभा डॉ. किरण लहामटे यांची असो, वैभव पिचड यांची असो किंवा अमित भांगरे यांची असो. प्रत्येक वेळी तर्रर्र होऊन गडी येणार आणि अपसूक काहीतरी बोलुन जाणार, पुढे येऊन बसणार आणि नको त्या उंगल्या करणार, अनेकदा पोलिसांनी स्वत: अशा व्यक्तींना बाहेर काढले आहे. त्यामुळे, गेल्या पाच वर्षात राजूर, घारगाव आणि अकोले शहर पोलीस ठाण्याच्या हाद्दीतील गुन्हे का कमी झाले नाही? अवैध धंदे कमी का झाले नाही? उलट डॉ. लहामटेंच्या काळात बेकायदेशीर व बनावट दारु कारखाने अकोल्यात दिसून आले. त्यावर कारवाई देखील करण्यात आली. मात्र, पुन्हा हे दारुचे कारखाने सुरू झाली आहेत. त्यामुळे, गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणणार्या आमदारांनी गुन्हेगारी कमी करणे, किंवा अवैध धंदे बंद करण्यासाठी नेमकी काय केले? हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे.
शहर अवैध धंद्यांना वैतागले.!
अगदी कालचीच घटना आहे. अकोले शहरातील कासार गल्ली, गुजरी मार्केट जवळील देविदास तिकांडे यांच्या घराजवळुन अकोले बस स्थानकाकडे जाण्याचा मार्ग आहे. त्या गल्लीत महिला, लहान मुली आणि अन्य कुटुंब राहतात. त्याच ठिकाणी मटका, जुगार, बॉल गेम अशा प्रकारचे अवैध धंदे सुरु आहेत. त्याच ठिकाणी दारुचे दुकान देखील आहे. तसेच बाजुला शाळा, किरणा दुकान, हॉटेल, कृषी दुकान आणि स्विटची देखील दुकान आहे. मात्र, गुरुवार दि. १४ नोव्हेंबर २०२४ रोजी म्हणजे अगदी परवा भर मार्केटमध्ये अवैध धंद्यावाल्याने एका व्यक्तीच्या डोक्यावर कोयत्याने वार केले. तो एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. शहरातील अवैध धंदे बंद करा असे व्यापारी आणि नागरिकांनी पोलीस अधिक्षक आणि पोलीस निरीक्षक यांना पत्र दिले आहे. मग येथील नागरिकांना प्रश्न पडतो. साहेब.! सगळं राजरोस चालु आहे, सामान्य माणसांवर हल्ले होत आहेत. मग मी गुन्हेगारांचा कर्दनकाळ आहे असे फक्त कार्य न करता कार्यसम्राट म्हणण्यासारखे नाही का? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.