संगमनेरात महिला, मुली, घरे एटीएम, असुरक्षित, अवैध धंदे जोमात, गुन्हे कायम तपासावर, सांगा ना काय बदललं?

 

- सुशांत पावसे

सार्वभौम (संगमनेर) :- 

                        संगमनेर शहरातील हाय प्रोफाइल गुन्हेगारी पुन्हा एकदा उघडकीस आली आहे. शहरात प्रसाद हॉटेल समोर महाराष्ट्र बँक शेजारी गॅसकटरने एटीएम फोडून 14 लाख 10 हजार 300 रुपये चोरीला गेले आहेत. तर, त्याच दिवशी  दत्तकृपा ट्रेडर्स मधुन 1 लाख 8 हजार रुपयांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू चोरीला गेल्या आहेत. ही सर्व धक्कादायक घटना शुक्रवार दि. 29 सप्टेंबर 2023 रोजी पहाटेच्या सुमारास घडली. खरंतर, दिघे कुटुंबाची घरफोडी तर सावंत डॉक्टरांचे 15 लाख रुपयांचे सोने चोरीला जाऊन महिना उलटत नाही  तेच पुन्हा ही मोठी चोरी झाली आहे. इतकेच काय.! येथील मोटारसायकल चोरी, मोबाईल चोरी, चैन स्नॅचिंग लुटमार आणि अवैध धंद्यांवर न बोललेच बरे. संगमनेरातील महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेले मांस आणि गांजा यासह नको-नको ते कारभार अगदी खुलेआम चालतात. मात्र, पोलीस काय करतात.? तर, "अर्थ"पूर्ण तडजोडी करून मलिदा गोळा करण्यात आणि नेत्यांच्या उटारेटा करण्यात धन्यता मानतात. 

           जेव्हा तत्कालिन पोलीस निरीक्षक देशमुख होते तेव्हा त्यांचे हात बरबटले आहेत असे म्हणुन फार मोठा जनप्रक्षोभ उभा राहिला त्यानंतर त्यांची उचलबांगडी करण्यात आली होती. मात्र, झालं काय.! ते गेले आणि पोलीस निरीक्षक मथुरे साहेब आले, मग बदललं काय.? तर दुप्पट-तिप्पट गुन्हे वाढले. जेव्हा पासुन ते आले तेव्हापासून आजवर जनतेला एकही समाधानकारक काम झाल्याचे पाहायला मिळाले नाही. त्यामुळे, पोलीस उपाधिक्षक असो वा अधिकारी किंवा कर्मचारी यांच्याकडून आजवर जनतेला समाधानकारक काम झाल्याचे पहायला मिळत नाही. असा सुर जनतेतून येत आहे. सणासुदीच्या दिवशी महिला बाहेर पडल्या की त्यांच्या गळ्यावर डल्ला मारला जातो, तरुणी शाळेत निघाल्या की भर रस्त्यात त्यांची छेडछाड केली जाते. शहरभर अवैध धंदे बोकाळले आहेत, शहरातील बेशिस्त गर्दी तर जैशी थे आहे. यामुळे, संगमनेरकरांनी खाकीवर नाराजी दाखवली आहे. तर, अनेकांनी वरिल विषय जनता खुलेआम बोलु लगली आहे.

            खरंतर, संगमनेर शहर जस-जसे विकसित होत चाले आहे. तसतशी सराईत गुन्हेगारी देखील वाढत चालली आहे. व्यापारी व सामान्य मनासांची मोठ्या प्रमाणात फसवणुक झाल्याचे गुन्हे दाखल होत आहे. अनेक बँकेना चुना लावून फरार झालेला "शहाणे" याचा औरंगाबाद हायकोर्टाने जामीन फेटाळला तरी देखील तो सापडत नाही. रेकॉर्डवरील गुन्हेगार वारंवार गुन्हे करतच आहे. युपी, एम.पी, बिहार अशा अन्य राज्यातुन लोक आलेत, त्यांची कोठे नोंद नाही, येथील महिलांवर अन्याय अत्याचार होत आहे त्यांना न्याय नाही, लव जिहाद सारखी प्रकरणे वाढत आहेत. त्यामुळे, वारंवार तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे पहायला मिळाले आहेत. 

             येथे पोलिसांना मारहाण झाली, दंगली सारखे अनेक प्रकार घडले, लोक एकमेकांवर शसस्त्र हल्ला करतात, पोलिसांना दगड फेकुन मारले. तरी देखील जी कायदेशिर दहशत हवी होती. ती अद्याप निर्माण करता आली नाही. त्यामुळे, संगमनेर शहराला अकार्यक्षम पोलीस नको तर खमक्या पोलीस निरिक्षकाची गरज असल्याची भावना जनतेने व्यक्त केली  आहे. आजही घुलेवाडी येथील गोळीबारातील आरोपी अद्याप फरार आहे. चोऱ्या, दरोडे, चैनस्नॅचिंग होतच आहे आणि ज्या दाखल आहेत त्यांचा तपास कायम तपासावर असणार आहे. अनेक गुन्ह्यातील सहआरोपी पसार आहेत. केवळ गुन्हे दाखल करायचे आणि ते कायम तपासावर ठेवायचे. त्यामुळे एका महिलेच्या घरी चोरी झाली आणि तिने संतप्त होऊन रोषाने उदगार काढले होते. "अहो पोलीस दादा एकतरी तपास लावा"
.

          दरम्यान, पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांच्या पथकाने जे काम केले त्यांचे आज देखील कौतुक होत आहे. अनेक सोने, मोटारसायकल, खुन, मोबाईल चोरी यांचा शिताफीने तपास लावला. मोठ्या प्रमाणात आरोपींकडून रिकव्हरी देखील केली. त्यामुळे, आपली वस्तु आपल्याला भेटली म्हणुन चेहऱ्यावर आनंद होता. जनतेने राहुल मदने व पथकाचे हारतुरे देऊन आभार देखील मानले. आता चोरी झाली तर गाडी लवकर पोहचत नाही. शहर पोलीस ठाण्यात डीबी (तपास पथक) नेमली खरी. पण त्यांच्याकडून एकही कामगिरी नाही.

                   गुटखा, गांजा, वाळु, मटका रोजरोज सुरू आहे अशी जनतेची ओरड कायम आहे. चोरी झाली त्याचे सीसीटीव्ही पाहुन धारेदोरे जुळवुन आरोपी निष्पन्न करायला याच्याकडे वेळ नाही का.? असे प्रश्न फिर्यादी उपस्थित करु लागले आहेत. एक नव्हे अनेक वेळा गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फुटले, रोख रक्कम घेऊन आरोपी पसार झाले. मात्र, पोलीस फक्त गुन्हे दखल करत राहिले. एकदा चोर पकडले तर पोलिसांच्या हालगर्जीपणामुळे न्यायालयाने एका दिवसात आरोपींना जामिन दिला होता. त्या दिरंगाईवर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. आतातरी पोलिसांनी चोऱ्या, घरफोड्याना गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. त्यांनी मलिदा गोळा करण्यापेक्षा थोडं जनतेच्या अक्रोशाकडे लक्ष दिले पाहिजे. नाहीतर आजकाल वर्दीवर लोकांचा विश्वास राहिलेला दिसत नाही. आशा प्रकारच्या प्रतिक्रिया सोशल मिडीयावरून उमटत आहे.

 अकोले गुटखा किंग पोलिसांच्या ताब्यात.!

अकोले व संगमनेर तालुक्याला पुरविला जाणारा गुटखा, हिरा व सुगंधी तंबाखू हा घारगाव पोलिसांनी पकडला आहे. यात 24 लाख 29 हजार 994 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तर, यात अविनाश आण्णा कमलाकर (वय 32 वर्षे, रा. रुई, ता. हातकणंगले, जि. कोल्हापुर), प्रमोद सदाशिव मोरे (वय - 38 वर्षे, रा. रुई, ता. हातकणंगले, जि. कोल्हापुर), संदीप गोरक्षनाथ शिंगवान (वय - 31 वर्षे, रा. धामणगांव, ता. अकोले), सागर रमेश नाईकवाडे (वय - 29 वर्षे, रा. धामणगांव, ता. अकोले), संदीप शिवाजी वाळुंज (वय 27 वर्षे, रा. धामणगांव, ता. अकोले), प्रकाश आनंदराव पाटील रा. कोल्हापुर नाका, इचलकरंजी, जि. कोल्हापुर), शुभम चेंडके (रा. शिवणकवाडी, ता. शिराळ, जि. कोल्हापुर), सनि उर्फ सनिल रमेश नाईकवाडे रा. धामणगांव, ता. अकोले), पिकअप गाडी नंबर एम. एच. 10 सी. आर. 9762 चा मालक अशा व्यक्तींना आरोपी करण्यात आले आहे.