दारु पितो म्हणून पत्नी व भावाने केली पतीची हत्या, तिघांना अटक, संगमनेर तालुक्यातील धक्कादायक घटना.!

   

सार्वभौम (संगमनेर) :-

रोज दारु पिवून घरी येणे, बायको व मुलांना मारहाण करणे,  मद्यासाठी कायम पैशाची मागणी करणे या सर्व त्रासाला कंटाळून पत्नी व मयताच्या दोघा भावांनी मिळून आपल्या भावाचा गळा दाबुन खुन केला. ही धक्कादायक घटना दि. २४ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारच्या सुमारास घडली. यात बाबासाहेब ऊर्फ गणेश किशोर गोसावी (रा. सुकेवाडी, ता. संगमनेर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. तर, यात आरोपी म्हणून गणेश यांची पत्नी अनिता गणेश गोसावी, मनोज किशोर गोसावी, सौरभ मनोज गोसावी (सर्व रा. सुकेवाडी, ता. संगमनेर) यांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. २४ सप्टेंबर २०२३ रोजी बाबासाहेब ऊर्फ गणेश किशोर गोसावी हा घरी दारु पिवुन आला होता. घरी गेल्यानंतर त्याने पत्नी अनिता हिला मारहाण सुरू केली. त्याची मुले सोडविण्यासाठी गेली असता त्याने मुलांना देखील मारहाण केली. तेव्हा पत्नी समजून सांगत होती. मात्र, त्याने कोणाचे ऐकले नाही. दरम्यान, वारंवार होणारा त्रास अनिता हिने आपला दिर मनोज यास सांगितला. तो घरी आला आणि त्याने भावाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, गणेशची दारु जास्तच बोलत होती. त्याने भावांना देखील शिविगाळ दमदाटी सुरू केली. या सर्व प्रकाराला मयताचे सर्व कुटूंब वैतागून गेले होते.

दरम्यान, गणेश गोसावी हा जरा जास्तच दारू पिलेला होता. त्यामुळे आज याचा कायमचा काटा काढायचा असे आरोपींनी ठरविले. त्यानुसार त्यांनी गणेशला एम.एच ०१ बी.बी. ७७५५ या गाडीत बसविले आणि श्रीगोंदा तालुक्याकडे प्रवास सुरू केला. गणेश यास गाडीत बसवून भाऊ मनोज आणि पत्नी अनिता यांनी एका दोरीच्या सहाय्याने त्याचा गळा आवळला. गणेश दारु पिलेला असला तरी त्याने स्वत:चा जीव वाचविण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले. मात्र, तो अपयशी ठरला. या दोघांनी त्याचा जीव घेतला खरा. पण मृतदेहाची विल्हेवाट लावायची कशी? म्हणून त्यांनी थेट श्रीगोंेदा तालुक्यातील लोणीव्यंकनाथ येथील रेल्वे पटरी गाठली.

या दरम्यान त्यांनी स्वत:च्या गाडीतून एक बाटलीभर पेट्रोल काढले. गाडीच्या शिट कव्हर देखील सोबत घेतला आणि नगर-मनमाड रेल्वे पटरीच्या जवळ गणेश गोसावी याचा मृतदेह टाकून दिला. या मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून त्यांनी त्याच्या तोंडावर गाडीचा शिटकव्हर टाकून त्याचा चेहरा पुर्ण जाळून टाकला. त्यानंतर आपले काम तमाम झाले म्हणून हे तिघे तेथून निघुन आले. त्यानंतर खर्‍या अर्थाने पोलिसांचा तपास सुरू झाला होता. मयत व्यक्तीचा मृतदेह हाती लागताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अगदी सुक्ष्म तपास सुरू केला.

दरम्यान मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी आपला मोर्चा थेट संगमनेरकडे वळविला. गोपनिय पद्धतीने पोलीस संगमनेरात आले आणि सुकेवाडी परिसरातून माहिती घेऊन गेले. त्यानंतर पहिले नाव समोर आले. ते म्हणजे मनोज गोसावी याचेे. त्याच्याकडे चौकशी केली. मात्र, त्याने प्रथमत: उडवाउडविची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी त्यांच्याकडील एक पुरावा पुढे केला आणि नंतर स्वत: मनोजने पुढील घटनाक्रम सांगण्यास सुरूवात केली. वारंवार दारु पिणे, लेकरांवर हात उचलणे, घाणघाण आरोप करुन शिविगाळ करणे यामुळे सर्व कुटुंब गणेशला वैतागले होते. म्हणून आम्ही त्याला संपविले अशी कबुली तिघांनी दिली. हा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने उघड केला. तर पुढील तपास श्रीगोंदा पोलीस करीत आहेत.