धक्कादायक.! मैत्रीणीची हत्या केल्यानंतर तो म्हणे मी आईचा देखील खुन केला आहे.! नऊ महिन्यानंतर गुन्हा उघड.!
सार्वभौम (संगमनेर) :-
चंदनापुरी घाटात ज्या मुलाने अवघ्या १५ वर्षाच्या मुलीची निघृणपणे हत्या केली होती. त्याच मुलाने पैशासाठी आपल्या जन्मदात्या आईची देखील हत्या केल्याची धक्कादायक बाब आता नऊ महिन्यानंतर समोर आली आहे. त्यामुळे, एकाच आरोपीने दोन खून केल्याचे निष्पन्न झाले असून तशी कबुली त्याने दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यानुसार आता तुषार विठ्ठल वाळुंज (रा. लक्ष्मीनगर, ता. संगमनेर) याला पोलिसांनी अटक करुन न्यायालयापुढे हजर केले आहे. तर, त्यास दोन्ही गुन्ह्यात वर्ग करण्यात येणार आहे. सखुबाई विठ्ठल वाळुंज असे तुषार वाळुंजच्या आईचे नाव आहे. आरोपी हा पुर्वी रेकॉर्डवील गुन्हेगार असून तो कधीकधी मानसिक संतुलन बिघडल्यासारखे पद्धतीेने वागतो.
याबाबत सविस्तर माहिती अशी. की, तुषार वाळुंज याने गेल्या नऊ दिवसांपुर्वी त्याची मैत्रिण निर्मला राजेंद्र कदम (वय १५, रा. ज्ञानमाता शाळा, नगर रोड, संगमनेर) हिची चंदनापुरी घाटात निघृणपणे हत्या केली होती. त्यानंतर त्यास पोलिसांनी अटक केले होते. जेव्हा त्याच्याकडे कदम हिच्या हत्येबाबत चौकशी केली. तेव्हा त्याने नेमके काय घडले याबाबत सविस्तर माहिती दिली. मात्र, या हत्येची चौकशी करीत असताना त्याने आणखी एक धक्कादायक खुलासा केला. की, माझी आई जानेवारी माहिन्यात मयत झाली होती. तीने गळफास घेऊन आत्महत्या केली असे म्हटले होते. मात्र, ती आत्महत्या नव्हती तर तिला देखील मीच मारले होते. असे त्याने जबाबात म्हटले आहे.
कशी केली आईची हत्या.!
तुषार वाळुंज यास अनेक व्यसने आहेत. त्यामुळे, त्याच्याकडे आलेला पैसा हा त्याला पुरेसा नव्हता. त्याची आई देखील रोजनदारी करुन पै-पै जमा करत होती. तुषारचे वडील काही वर्षापुर्वी मयत झाले आहेत. ते गवंडी काम करुन आपला उदरनिर्वाह करत होते. त्यानंतर तुषार कार दुरूस्ती शिकला आणि त्यानुसार तो दोन-पाच रुपये कमवत होता. मात्र, व्यसनामुळे ते पैसे पुरत नव्हते म्हणून तो पैशासाठी आईकडे तगादा लावत होता. जानेवारी २०२३ मध्ये जेव्हा त्याने आईकडे पैशांची मागणी केली. तेव्हा त्या माऊलीने दारु पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिला. त्याच दिवशी वाळुंजने त्याच्या आईला रात्रीतून फाशी दिली. नंतर मात्र या गुन्ह्यात आईचा मृत्यु हा आकस्मात मृत्युची नोंद म्हणून करण्यात आली आणि हा गुन्हा काळ आणि कागदाच्या आड दडपला गेला.
कशी केली मैत्रीणीची हत्या.!
तुषार आणि निर्मला यांच्यात पुर्वीपासून मैत्री होती. ते एकमेकांच्या कायम संपर्कात होते. त्यांना व्यसन देखील होते. तुषार याने दि. १९ सप्टेंबर २०२३ रोजी निर्मला हिला गाडीवर घेतले आणि फिरण्यासाठी ते चंदनापुरी घाटात गेले. तेथे जाऊन यांनी मद्या प्राषण केले आणि त्यानंतर यांच्यात वाद झाले. तुषार तिला म्हणत होता. की, चल आपण डोंगरावर जाऊ, मात्र, निर्मला त्यास नकार देत होती. मात्र, तरी देखील त्याने तिला बळजबरी डोंगरावर नेले. दोघे मद्याच्या नशेत असल्यामुळे तुषारने एक मोठा दगड उचलला आणि तिच्या डोक्यात टाकला. जेव्हा ती मयत झाली हे लक्षात आले तेव्हा तिचा चेहरा ओळखता येऊ नये म्हणून तिच्या डोक्याचा चेंदामेंदा केला. त्यानंतर तो तेथून निघुन आला. मात्र, नंतर त्यास अटक करण्यात आली. हा तपास पोलीस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर, पोलीस उपाधिक्षक सोमनाथ वाघचौरे, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गोरे, हवालदार लोटके,पोलीस नाईक भिंगारदे, पोलीस नाईक लोढे,पोलीस कॉ. अमृत आढाव, पोलीस नाईक राहुल डोके, पोलीस कॉन्स्टेबल राहूल सारबंदे पोलीस नाईक गवळी, पोलीस कॉ. कुर्हे व शिरसाठ अशा कर्तव्यदक्ष व जिगरबाज कर्मचार्यांनी केला.
यात दोषी कोण?चौकशी व्हावी.!
खरंतर जेव्हा सखुबाई वाळुंज हिची पुर्वनियोजित हत्या करण्यात आली. त्यानंतर तिने गळफास घेऊन आत्महत्या केली अशी नोंद आहे. मात्र, या दरम्यान चौकशी म्हणून काही तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाले असेल. त्यात मात्र, हा गळफास नाही हे सिद्धच व्हायला हवे होते. मग तो वैद्यकीय अहवाल अकस्मात मृत्युच्या कागदपत्रांना जोडलेला असेल. जर त्याच गळफास म्हटले असेल तर तत्कालिन जे कोणी वैद्यकीय अधिक्षक होते की ज्यांनी पोस्टमार्टम केले असेल त्यांची चौकशी होणे गरजेचे आहे. हा रिपोर्ट, व्हिसेरा यातून काहीच कसे निष्पन्न झाले नाही. या डॉक्टरांच्या भरोशावर पुढील तपासाची दिशा ठरत असते. मग, हेच अशी माती खात असेल तर मृत्युनंतर न्याय मिळेल का? आणि त्याहून महत्वाचे म्हणजे हत्या इतकी सहज पचविता येत असेल तर कायदा आणि ही अन्य यंत्रणा काय कामाची आहे? पुर्वी आईचा खुन करुन त्याने सहज तो पचविला. म्हणून त्याने मैत्रीणीच्या हत्याची धाडस केली. त्यामुळे, अशा घटनांची चौकशी व्हायला हवी. अशी मागणी होत आहे.