एका सॅनिटरी पॅडहून हत्येचा तपास! मामा भाच्याने केला मामीचा खुन.! अनैतीक संबंधाचे कारण, फिल्मी स्टोरीसारखा तपास.!

- सागर शिंदे

सार्वभौम (अकोले) :-

गेल्या आठवड्यात अकोले तालुक्यातील कातळापूर येथे एका २५ वर्षीय महिलेचा मृतदेह मिळून आला होता. त्याची ओळख पटविण्यात पोलिसांच्या नाकीनव आले होते. मात्र, तिच्या पायातील पैजन आणि पर्समध्ये सापडलेले सॅनिटरी पॅड याहून पोलिसांनी महिलेचा शोध घेतला आणि त्यानंतर आरोपींना देखील बेड्या ठोकल्या आहेत. कल्याणी महेश जाधव (रा. वांबोरी, ता. राहुरी, जि. अ.नगर) असे मयत महिलेचे नाव आहे. तर आरोपी महेश जनार्दन जाधव (वय ३०) हा तिचा पतीच असून महेशचा भाचा मास्टरमाईन्ड मयुर अशोक साळवे (रा. राहुरी) याने मामास मदत केल्याचे निष्पन्न झाले आहे. आता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने या दोघांना बेड्या ठोकल्या असून पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या संशयाहून हा प्रकार घडल्याची त्यांनी कबुली दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी; की, महेश आणि कल्याणी हे पती पत्नी असून महेश हा आपल्या पत्नीवर कायम इसळत होता. कल्याणीचा बाहेर काहीतरी चक्कर आहे असे त्याला वारंवार वाटत होते. त्यामुळे त्यांच्यात नेहमी वाद देखील होत होते. मात्र, यावर पर्याय काय? तर, महेशने याबाबत त्याचा भाचा मयुर यास विचारले. दोघांनी मिळून कल्याणीला कायमचे संपविण्याचा निर्णय घेतला. पण कसे? तर, यांनी कल्याणीची हत्या करण्यासाठी पुर्वीनियोजित प्लॅन केले. तिला फिरण्यासाठी बाहेर आणायचे आणि इकडेच तिची हत्या करायची असे ठरविले. त्यासाठी या दोघांनी हत्या करण्यापुर्वी अकोले तालुक्यातील काताळापूर हा भाग निवडला.

दरम्यान, ठरल्याप्रमाणे तीन-चार दिवसांपुर्वी यांनी कल्याणीला सांगितले. आपल्याला फिरायला जायचे आहे. ते सकाळीच वांबोरी येथून निघाले आणि फिरत-फिरत ते बरोबर काताळापुर येथे जाऊन पोहचले. मुळात त्या परिसरात विरळ लोकवस्ती आणि काही निर्जन स्थळे आहेत. त्याचाच फायदा घेत यांनी गाडी थांबविली. महेश म्हणाला. की, मी लघुशंका करुन येतो, तोवर तुम्ही निसर्गाचा आनंद घ्या. त्यावेळी कल्याणी ही एका खडकावर बसून मोबाईलमध्ये काहीतरी पाहुन टाईमपास करीत होती. त्यावेळी महेश मागून आला आणि खिशातील दोर काढून तिचा गळा घट्ट आवळला. त्यानंतर मयुरने देखील मदत केली. यांचे काम फत्ते झाल्यानंतर कल्याणीच्या पर्समधील आधारकार्ड आणि अन्य कागदपत्रे यांनी काढून घेतली. तेथे शिल्लक होते फक्त एक सॅनिटरी पॅड आणि पायातील पैजन...

दरम्यान, हा मृतदेह काही स्थानिक लोकांनी पाहिल्यानंतर त्यांनी राजूर पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मात्र, पहिलेची ओळख पटणे शक्य झाले नाही. त्यानंतर या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने लक्ष घातले. सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांनी महिलेची ओळख पटविण्यासाठी सुक्ष्म तपास सुरू केला. गुन्ह्याची उकल करण्यासाठी एकमेव सॅनिटरी पॅड आपल्याला आरोपींपर्यंत घेऊन जाईल याची त्यांनी खात्री झाली. त्यांनी एलसीबीची टिम कामाला लावली. पोलीस नाईक लक्ष्मण खोकले, रविद्र कर्डिले, सागर ससाणे, रोहित येमुल, आमृत आढाव, पो. कॉ. गावडे, चंद्रकांत कुसळकर, अरुण मोरे, दिनेश आहेर यांनी जबाबदारी वाटून घेत अधिकार्‍यांच्या सुचनांचे तंतोतंत पालन केले आणि अखेर गुन्हा डिटेक्ट झाला.

असा झाला तपास.!

मयत कल्याणीच्या जवळ एक सॅनिटरी पॅड सापडले होते. त्यावर लिहीलेले होते फॉर युज ओन्ली जिल्हा परिषद अहमदनगर. आता हे सॅनिटरी पॅड फक्त अनुसिचित जातीच्या (एससी) महिलांकरीताच होते. दुसर्‍या कोणत्यााही महिलांना ही सुविधा नव्हती. त्यामुळे, संबंधित महिला ही एससी जातीची असावी हा पहिला निष्कर्ष निघाला. मृतदेह हा अकोले तालुक्यात सापडल्याने तेथील गावागावात महिलेच्या ओळखीसाठी एक मेसेज पोलिसांनी तयार करुन व्हायरल केला. मात्र, तरी देखील शोध लागला नाही. त्यानंतर एलसीबीची टिम थेट जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात गेली. तेथील अधिकार्‍यांकडून या सॅनिटरी पॅडची माहिती घेतली. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणार्‍या आशा सेविका, अंगणवाडी ताई अशा काही गृपवर हे पोलिसांचे मेसेज व पहिलेचा फोटो पाटविण्यात आला. त्यानंतर वांबोरी येथून एक फोन आला आणि ती महिला कल्याणी महेश जाधव असल्याचे निच्छित झाले.

छे.! ती माझी बायको नाही...

कल्याणीचा शोध लागल्यानंतर पोलिसांनी महेशचे घर गाठले. त्याला त्याच्या पत्नीचा फोटो दाखविण्यात आला. तेव्हा तो म्हणाला, छे.! ही माझी पत्नी नाही. त्यानंतर सोनई पोलीस ठाण्यात चौकशी केल्यानंतर लक्षात आले. की, कल्याणी महेश जाधव ही मिसिंग असून तक्रार देखील दाखल आहे. तेव्हाच पोलिसांना महेश जाधव याच्यावर शंका आली. त्यानंतर पोलिसांनी मोबाईल लोकेशन आणि सीडीआर तसेच अन्य काही तांत्रीक दृष्ट्या तपास सुरू केला. तेव्हा धक्कादायक बाब लक्षात आली. की, महेश आणि त्याचा भाचा मयुर यांच्यात वारंवार संपर्क होत होते. यांचे लोकेशन देखील अकोले, काताळापूर भागात दिसून येत होते. तर यांना विचारणा केेली असता यांच्याकडून भलतीच माहिती पुढे येत होती. जेव्हा यांना खाक्या दाखविला तेव्हा यांच्यातील पोपट भडाभडा बोलु लागला आणि घडलेली घटना कशी केली याची माहिती दोघांनी दिली.

काणून के हाथ लंबे होते हैं.!

खरंतर, मयुर हा एक उच्चशिक्षित तरुण आहे. तो ऐअरटेल कंपनीत काम करतो. जेव्हा घटना घडली तेव्हा त्याने अनेक गोष्टींची काळजी घेतली होती. मिसिंग दाखल केली तेव्हा यांनी जे नंबर दिले होते ते देखील खरे होते. मी सर्व काही सेटींग लावली आहे, आपले लोकेशन वैगरे दिसणार नाही अशी खात्री त्याने मामाला दिली होती. मात्र, झालं काय? पोलिसांनी अगदी बारकाईने तपास केला, सुताहून स्वर्ग गाठला. साधे एक सॅनिटरी नॅपकीन हाती आले तर पोलिसांनी त्याहुन मयताची ओळख आणि आरोपींचा शोध घेतला. खरंतर अशा गुन्ह्यात पोलीस अधिक्षक राकेश ओला आणि LCB पोलीस निरिक्षक दिनेश आहेर यांचे फार मोठे मार्गदर्शन यांना लाभले त्यामुळेच हे शक्य झाले. अशा गुन्ह्यात पोलिसांना प्रेरणा म्हणून त्यांचे नक्कीच कौतूक झाले पाहिजे. तर, गुन्हेगार कितीही चालाख असला तरी काणून के हाथ लंबे होते हैं.! हा डायलॉग कधी त्यांनी विसरु नये..!!