देवठाण गावात भरली अदालत, ९१४ जणांना न्याय, तरुणांईची किमया प्रशासनाची साद.!

- शंकर संगारे

सार्वभौम (अकोले) :-

          गेेल्या काही महिन्यांपासून शासन आपल्या दारी हा उपक्रम सुरू आहे. पण, अगदी बोटावर मोजण्या इतक्या गावांमध्ये त्याला प्रतिसाद मिळाला. नाहीतर शासन आपल्या दारी अन सगळी घरी.! गावात उपक्रम आहे हे माहित असताना कोणी त्याकडे डोकावून पाहिले नाही. तुलनात्मक यात अकोले तालुक्यातील देवठाण हे गाव अपवाद होते. अगदी आज देखील महसूल सप्ताह साजरा करण्यात आला. त्यात देवठाण गावात वेगवेगळे नऊ उपक्रम राबविण्यात आले आणि त्याची फलनिष्पत्ती देखील चांगली ठरली. गावातील ९१४ व्यक्तींनी या उपक्रमाचा लाभ घेतला. या गावातील नागरिक चांगले जागरूक असून प्रत्येक योजनांचा लाभ घेण्यासाठी चांगला प्रतिसाद देतात. येथील तरुणांची टिम चांगली असून त्यांच्यामुळे शेतकरी, कष्टकरी, वृद्धव्यक्ती आणि सामान्य नागरिकांना लाभ होतोय अशी प्रतिक्रिया प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली.

राज्यात महसूल सप्ताह हा फार सुंदर रित्या उपक्रात साजरा केला जातो. तो अकोल्यात देखील साजरा करण्यात आला. संगमनेर महसुमध्ये कार्यालयात स्वच्छतेच्या प्रश्‍नावर प्रश्‍नचिन्ह निर्माण केले गेले. मात्र, अकोल्यात तहसिल कार्यालय आणि मंडल अधिकारी दातखिळे तात्या यांच्या ऑफिसचे व्हिडिओ सोशल मीडियात चांगलेच व्हायरल होत होते. यातच देवठाण गावची चर्चा देखील चांगलीच रंगली होती. कारण, तेथे महसूल दिन हा अगदी उत्सवासारखा साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे देवठाण गावातील तरुणांनी अरुण शेळके आणि अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली गाव पिंजून काढले. शासनाच्या ज्या-ज्या योजना असतील त्या अगदी तळागाळातील गरजू व्यक्तींपर्यंत गेल्या पाहिजे या हेतूने हजारो नागरिकांनी गाव गाठले तर ज्यांना शक्य नव्हते त्यांच्यापर्यंत महसूल अधिकारी गेले आणि तरुणांचे, शेतकर्‍यांचे व गोरगरिब लोकांचे प्रश्‍न जाणुन घेतले.

खरंतर लोकाभिमुख शासन म्हणजे काय याचा प्रचिती खर्‍या अर्थाने महसूल सप्ताहात येते. अवघ्या वर्षभर विद्यार्थी, पालक, शेतकरी, मजूर आणि गोरगरिब लोक शासनाच्या दारी खेटा मारत असतात. मात्र, ऑनलाईन पद्धती व बिघडलेल्या प्रणालीमुळे अनेकदा गैरसोयीला सामोरे जावे लागते. मात्र, जेव्हा शासन थेट दारी जाऊन काम करते तेव्हा खर्‍या अर्थाने लोकशाही आणि लोकाभिमुख शासन अनुभवायला मिळते अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली. प्रांताधिकारी शैलेश हिंगे, तहसिलदार सतिष थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली १ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट महसूल सप्ताह साजरा करण्यात आला होता. यावेळी मंडल अधिकारी गिरीष कुलकर्णी, तलाठी बाळकृष्ण जगदाळे, विस्तार अधिकारी गायकवाड, केंद्रप्रमुख आडाणे मॅडम, संरपंच निवृत्ती जोरवर, उपसरपंच आनंद गिर्‍हे, ग्रामविकास अधिकारी आर.सी धनवडे यांनी मोलाचे योगदान दिले अशी माहिती पंचायत समितीचे मा. सदस्य अरुण शेळके यांनी दिली.

गावात ९१४ व्यक्तींना झाला हा लाभ.! 

लक्ष्मी मुक्ती योजना ६ फेरफार नोंदी, गावातील ५० स्वयंसेवक युवकांकडून ई-पिक पहाणी करुन ८० खातेदारांच्या नोंदी करण्यात आल्या, १३० शालेय विद्यार्थ्यांना दाखले देण्यात आले, पंतप्रधान मंत्री पीक विमा योजने अंतर्गत ६७३ खातेदारांचा पीक विमा उतरविण्यात आला, संजय गांधी निराधार योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे ५ अर्ज स्विकारण्यात आले, श्रावणबाळ वृद्धपकाळ निवृत्त योजने अंतर्गत २ व्यक्तींचे अर्ज स्विकारण्यात आले, पोट खराबा लागवडीयोग्य क्षेत्रात रुपांतरीत करण्याबाबत स्थळ निरीक्षण व स्थानिक पंचनामे करुन १२ अर्ज स्विकारण्यात आले. तर, मंडल अधिकारी व अन्य व्यक्तींनी महसूल अदालत घेऊन गावातील आदिवासी, शेतकरी व महसुल संदर्भात असणार्‍या समस्यांचे निराकरण केले. 

शासनाच्या कोणत्याही योजना असोत ते देवठाण गाव राबविल्याशिवाय राहत नाही. येथील तरुण वर्ग जागरुक असून त्यांना शेतकरी आणि कष्टकर्‍यांच्या प्रती आदर आहे. गेल्या काही वर्षापासून आमच्या गावचा विकास हा उल्लेखनिय असून त्यासाठी नागरिकांची साथ फार महत्वाची ठरलेली आहे. शासन आपल्या दारी हा उपक्रम असो वा महसूल सप्ताह यात गावातील नागरिकांना फार मोठा फायदा मिळाला आहे. त्यामुुळे मी शासन, प्रशासन यांचा आभारी आहे.

- अरुण शेळके (पंचायत समितीचे मा. सदस्य)