रागाने पाहिले म्हणून 14 जणांनी दांडे घेऊन घर लावून मारलं, एकाची हत्या, 10 अटक, राजूर परिसरात पुन्हा खून.!

 

सार्वभौम (राजूर) :- 

                     एकमेकांकडे खुन्नस देऊन पाहिल्यामुळे दोन व्यक्तींमध्ये वाद निर्माण झाला. त्यानंतर फोनहुन शिविगाळ आणि नंतर थेट फिल्मी स्टाईलने घरात घुसून संपुर्ण कुुंटुंबास मारहाण करण्यात आली. यात एक व्यक्ती मयत झाला असून चौघे जखमी झाले आहेत. पांडुरंग सोमा खतोडे असे मयत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना काल (दि.09) रात्री 8:00 वाजण्याच्या सुमरास घडली. याप्रकरणी खतोडे यांनी दिलेल्या फिर्यादिनुसार कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर यात 14 जणांना आरोपी करण्यात आले असून 10 जणांच्या मुसक्या राजूर पोलीस ठाण्याचे सपोनी प्रविण दातरे यांनी आवळल्या आहेत. उद्या ताब्यात घेतलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. राजूर परिसरात कोणी असली दहशत माजविण्याचा प्रयत्न केला तर त्याला जेलची हवा खायला पाठविले जाईल. त्यामुळे, तुमच्या काही तक्रारी असतील तर पोलीस ठाण्यात या आणि तक्रार दाखल करा. पण, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण कराल तर गाठ वर्दीशी आहे अशी प्रतिक्रीया सपोनी प्रविण दातरे यांनी दिली.

               याबाबत सविस्तर माहिती अशी. की, धोंडु पांडुरंग खतोडे (वय २५, रा. आंबेवगण, ता. अकोले) हे दि. 9 तारखेला दुपारनंतर त्यांचे शेतीचे कामानिमित्त वाकी बंगल्यावर गेले होते. तेथील काम आटोपल्यानंतर ते पुन्हा आंबेवगण येथे जात असतांना मान्हेरेमध्ये त्यांच्या गावातील बबलु कदम, 2) प्रमोद घारे दोन्ही रा. मान्हेरे ता. अकोले, व त्यांचे मित्र 3) विकास गभाले, 4) वैभव डगळे, 5) वैभव गभाले, 6) सागर भोईर, 7) अक्षय कोंडार 8) विठ्ठल पोटकुले 9) विनोद शिंदे, 10) नकुल मुंढे व  इतर काही मुले भेटली. तेंव्हा खतोडे यांनी त्यांना विचारले. की, मान्हेरे येथे काय करता ? त्यावेळी सचिन इदे त्यांनी म्हणाला की माझा भाऊ संदिप इदे यास मान्हेर येथील बबलु कदम याने मारले आहे त्याचेकडे आलो आहे. त्यानंतर हे सर्वजण आबेवंगण येथे जात असतांना मान्हेरे बस स्टैण्ड जवळ पोहचले. येथे बबलु कदम याची आई व खतोडे यांच्यात थोडीशी बाचाबाची झाली. या दरम्यान बबलु कदम याची आई फिर्यादी धोंडु यांच्यासोबत असलेल्या गावातील मित्रांवर धावून आली. त्यावेळी वाद वाढू नये म्हणून बबलुचे वडील तिला घरी घेवून गेले. त्यावेळी फिर्यादी व त्याचा मित्र सचिन इदे यास हा वाद मिटवुन घे असे म्हणाले होते. 

            दरम्यान, त्यानंतर फिर्यादीसह  सर्वजण ज्याचेत्याचे घरी आंबेवंगण येथे निघुन गेले. मात्र, रात्री 08.30 ते 09.00 वा. सुमारास धोंडु, त्याचे वडील पांडुरंग व आई विमल असे घरात असतांना त्यांचे घरात अचानक शिरले. त्यात बबलु कदम, प्रमोद घारे, विकास गभाले, वैभव डगळे, वैभव गभाले, सागर भोईर, अक्षय कोंडार, विठ्ठल पोटकुले,  विनोद शिंदे, नकुल मुंढे, व इतर 3 ते 4 अनोळखी इसम होते. यांच्यातील एकाने खतोडे यांच्या घराचे दार आतुन बंद करुन घेतले. त्यावेळी बबलु कदम याचे हातात काठी, प्रमोद घारे याचे हातात दांडके व विकास गभाले याचे हातात दांडा होता. ते सर्वजण घरात आल्यानंतर काही एक न बोलता फिर्यादी यास प्रमोद घारे याने त्याचे हातातील दांडक्याने डोक्यात, मानेवर, पाठीवर, हातावर मारहाण केली. यावेळी धोंडु यांचे डोके फुटुन त्यातून रक्त आले व ते  जमिनीवर कोसळले. तेंव्हा बबलु कदम हा मयत पांडुरंग यांना त्याचे हातातील दांडक्याने मारहाण करत होता. त्याने फिर्यादीचे वडीलांना तुझा मुलगा आमचे वाद मिटवितो काय? असे म्हणुन त्याच्या हातातील लाकडी दांडक्याने जबरी मारहाण केली. त्यावेळी पांडुरंग खतोडे हे जमिनीवर कोसळले. तसेच विकास गभाले याने फिर्यादीची आई विमल यांनी त्याचे हातातील काठीने मारहाण केली तेंव्हा ती देखील जमिनीवर पडली. वैभव डगळे, वैभव गभाले, सागर भोईर, अक्षय कोंडार, विठ्ठल पोटकुले व विनोद शिंदे, नकुल मुंढे व इतर 3 ते 4 अनोळखी इसम हे घरातील लोकांना  लाथा बुक्क्यांनी मारहाण करीत होते.      

दरम्यान, पाडुरंग खतोडे हे मोठ्याने ओरडत होते. की, माझ्या पोटात मारु नका, पोट दुखत आहे. मात्र, आरोपींनी काही एक ऐकले नाही. फिर्यादी, त्यांची आई देखील हात जोडून विनंती करत होते आम्हाला मारु नका. मात्र, यांनी एकलेच नाही. यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकुन शेजारीच राहणारे फिर्यादीचे चुलते किसन सोमा खेताडे व चुलती हिराबाई किसन खेताडे तेथे आले. त्यांनी देखील आरडाओरड केली. तेव्हा हे सर्व जण तेथुन निघुन गेले. त्यानंतर फिर्यादिची आई यांनी वडीलांना उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र,  त्यांनी काही एक प्रतिसाद दिला नाही. त्यावेळी उपस्थित सर्वांची खात्री झाली. की, वडील हे मयत झाले आहेत. धोंडु यांचेकडे फोन नसल्याने काय करावे सुचले नाही. तसेच वाहनांची सोय देखील नसल्याने हे सर्व लोक रात्रभर तसेच रडत बसले. त्यानंतर पहाटे 06.00 वा. सुमारास गावातील व्यक्तींशी संपर्क केला असता गाडी करुन पांडुरंग खतोडे यांना रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोवर खुप उशिर झालेला होता. नंतर थेट पोलीस ठाणे गाठले आणि खुन करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे.