मुलगी पटली, लग्न ठरलं अन अचानक मोडल, सोयरीकीत झाली दगाबाजी, मुलाने केली आतमहत्या.! उपसरपंचासह चौघांवर गुन्हे दाखल.!

 

सार्वभौम (संगमनेर) :- 

                    संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी येथील सेंटरिंग काम करणाऱ्या मुलाला चुलत्याने संगमनेर शहरालगत असणाऱ्या ढोलेवाडी गावातील मुलगी पाहिली. ती मुलगी पसंत करून पुढील महिन्यात लग्न ठेवले. मात्र, ते लग्न अचानक मोडुन त्या मुलीचे कोल्हेवाडी गावातीलच एका तरुणाबरोबर लग्न जमवले. ते विचारण्यासाठी गेले असता दोघांमध्ये शिवीगाळ झाली. त्यानंतर सेंटरिंग काम करणाऱ्या मुलाला गाव पुढाऱ्यांनी ग्रामपंचायतमध्ये बोलावून घेतले. त्याला दमदाटी केली. त्या मुलीचा नाद करायचा नाही. तिचा नाद सोडुन दे. असे बोलुन त्याच्याकडून ग्रामपंचायतमध्ये लिहुन घेतले. तो रडत बाहेर येऊन त्याने एका झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ही धक्कादायक घटना सोमवार दि. 28 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 ते 4:30 वाजण्याच्या दरम्यान वडगाव पान शिवारात घडली. यात नितीन सीताराम खुळे (वय 32,रा.कोल्हेवाडी, ता. संगमनेर, जि. नगर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. 

               दरम्यान, ही आत्महत्या काही लोकांच्या दबावाला बळी पाडुन आत्महत्यास प्रवृत्त केले आहे. त्यामुळे, मयत व्यक्तीच्या नातेवाईकांनी आज पोलीस ठाण्यात येऊन मोठा राडा केला. आमच्या मुलाची आत्महत्या नसुन त्यास आत्महत्या करण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे, कलम 306 नुसार गुन्हा दाखल करण्याचा आग्रह धरण्यात आला. जो पर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यातुन उठणार नाही. काहीकाळ पोलीस हा गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत होते. पोलीसांच्या दबावानंतर देखील नातेवाईक त्यांच्या मतावर ठाम राहिल्यामुळे, नितीन याच्या मृत्यूला जबाबदार धरून चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले यामध्ये प्रदीप भाऊसाहेब शिंदे, संदिप उर्फ संतोष शिवाजी दिघे, पोपट उर्फ बाजीराव सावळेराम कोल्हे, नानासाहेब कोल्हे (सर्व रा.कोल्हेवाडी, ता. संगमनेर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शलमोन सातपुते करत आहे.

          याबाबत सविस्तर माहिती अशी की, मयत नितीन खुळे हा सेंटरिंग काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. त्याचे वडील सीताराम खुळे हे देखील सेंटरिंग काम करत. एकेदिवशी सीताराम खुळे यांना गावातीलच ओळखीचे दिपक इंगळे हे बोले की, माझा मित्र सेंटरिंग काम करतो त्याच्याकडे एक मुलगी आहे. तिला एखादा मुलगा बघा असे सांगितले. त्यावेळी माझा मुलगा नितीन हा आहे असे ते ओळखीचे दिपक इंगळे यांना बोलले. त्यानंतर, दिपक इंगळे यांच्या मध्यस्तीने ढोलेवाडी परिसरातील मुलगी मयत नितीनला बघितली. एकमेकांना पसंत केल्यानंतर 1 सप्टेंबर 2023 रोजी लग्न करण्याचे ठरले होते. मात्र, तीन दिवसांपूर्वी लग्न मोडले असे अचानक मुलीकडच्यानी सांगितले. 


लग्न मोडले म्हणुन मयत नितीन व त्याचा भाऊ मुलीच्या घरी जाऊन बोलणी झालेले पैसे व वस्तू आणण्यासाठी गेले व घेऊन आले. मात्र, ह्याच मुलीचे लग्न गावातील आरोपी संतोष उर्फ संदिप शिवाजी दिघे याच्या सोबत ठरले हे मयत नितीनला समजले. त्या दोघांमध्ये शिवीगाळ झाली. दि. 28 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 8 वाजता मयत नितीन व चुलत भाऊ संजय यास फोन करून ग्रामपंचायतमध्ये बोलावून घेतले. मयत नितीन व चुलत भाऊ संजय हे ग्रामपंचायतमध्ये गेले. तेथे आरोपी पोपट उर्फ बाजीराव कोल्हे हे आले व म्हणाले की, तु कोण आहे. तुझे इथे काय काम. तुला जुन्या केसमध्ये टाकुन देईल. असे म्हणुन मयत नितीनच्या चुलत भावाला ग्रामपंचायत मधुन हुसकावून दिले. यावेळी ग्रामपंचायतमध्ये प्रदीप शिंदे, संदिप दिघे, नानासाहेब कोल्हे तेथे उपस्थित होते.

          दरम्यान, मयत नितीनचा चुलत भाऊ संजय हा ग्रामपंचायतच्या दरवाजा शेजारी उभे राहुन बोलणे ऐकत होता. ते मयत नितीनला दमदाटी करून तु पुन्हा त्या मुलीचा नाद करायचा नाही. तिचा नाद सोडुन दे. असे म्हणुन मयत नितीनकडून ग्रामपंचायतमध्ये लिहुन घेतले. त्यावेळी ग्रामपंचायत कार्यलयामध्ये अमोल दिघे, राजेंद्र दिघे, जालिंदर दिघे, राहुल दिघे, सुधाकर बलसाने यांनी बोलावुन दमदाटी केली. मयत नितीन हा ग्रामपंचायतमधुन रडत बाहेर आला. त्यावेळी चुलत भाऊ संजय याने समजुत काढुन त्यास घरी पाठविले. चुलत भाऊ संजय हा देखील कामाला गेला. परंतु अवघ्या काही तासातच चुलत भाऊ संजय खुळे यास निरोप आला की, तुझ्या भावाने आत्महत्या केली आहे. त्याबद्दल खात्री करायला गेलो तर नितीन याने वडगावपान शिवारात कानिफनाथ जंगलातील एका बाभळीच्या झाडाला गळफास घेतल्याची माहिती मिळाली. यावेळी मयत नितीन खुळे याची बॉडी खाली उतरवली असता एक छोटी डायरी मिळुन आली. त्यामध्ये प्रदीप शिंदे, संतोष दिघे, बाजीराव दिघे (उपसरपंच), नानासाहेब कोल्हे यांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले होते असे डायरीत नमुद होते. यावरून चुलत भाऊ संजय खुळे यांनी तालुका पोलीस ठाणे गाठले व प्रदीप भाऊसाहेब शिंदे, संदिप उर्फ संतोष शिवाजी दिघे, पोपट उर्फ बाजीराव सावळेराम कोल्हे, नानासाहेब कोल्हे (सर्व रा.कोल्हेवाडी, ता. संगमनेर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

         खरंतर, मयत नितीन याने गळफास घेण्यापूर्वी आपला व्हिडीओ तयार केला होता. तो सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. यामध्ये बड्या नेत्याचे नाव घेऊन मला न्याय मिळावा अशी भावना व्यक्त केली आहे. यामध्ये म्हणाले आहे की, तालुका अध्यक्ष मी तुमच्याकडे आलो होतो. मला ह्या चार महिन्यात इतका त्रास दिलेला आहे. मला गावामध्ये सुद्धा राहण्याची मुश्कील केली आहे. राजकारणाचा धाक दाखवुन बड्या नेत्याचा समर्थक असुन गावातील लोकांवर अन्याय करत आहे. साहेबांना फक्त येवढीच विनंती आहे. यानंतर माझी आत्महत्या करण्याची बिलकुल इच्छा नाही. माझ्या आई वडिलांचे माझ्यानंतर काय होईल याची गॅरंटी नाही. ह्या लोकांनी मला येवढा त्रास दिलेला आहे. ही गोष्ट मी कोणाला ही सांगु शकत नाही. कारण, मी एक मिडल क्लास अतीशय गरीब घराण्यातील मुलगा आहे. माझ्या सोबत कोणीही व्यक्ती नाही साहेब माझी येवढीच विनंती आहे की, कोणत्याही राजकारणाला बळी न पडता माझ्या आई वडिलांना न्याय द्या. असा व्हिडीओ करून एका झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.