पत्नीवर संशय घेऊन पहार डोक्यात घालुन जीव घेतला, त्याच्याही डोक्यात पहार मारली, सात वर्षे सक्तमजुरी.! रागाच्या भरात झाला आयुष्याचा खेळ.!

 

सार्वभौम (संगमनेर) :- 

                 पत्नीवर संशय घेऊन पतीने घरातील पहार तिच्या डोक्यात टाकुन तिचा खुन केल्याची धक्कादायक घटना दि. 13 ऑक्टोबर 2016 रोजी संगमनेर शहराजवळील लक्ष्मीनगर  गुंजाळवाडी परिसरात घडली होती. हत्या केल्यानंतर आरोपीला तात्काळ ताब्यात घेतले. आरोपी बाळासाहेब तुळशीराम फटांगरे (रा. लक्ष्मीनगर, गुंजाळवाडी, संगमनेर) यास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोविंद सरोदे यांनी तात्काळ अटक केली होती. त्यानंतर सरोदे यांनी या गुन्हयाचा सखोल तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. मंगळवार दि. 22 ऑगस्ट 2023 रोजी जिल्हा सत्र न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. सरकारी वकील जयंत दिवटे यांचा युक्तीवाद आणि सबळ पुरावे यांच्या आधारे जिल्हा सत्र न्यायाधीश प्रशांत कुलकर्णी यांनी आरोपी बाळासाहेब फटांगरे यास सात वर्षे सक्षम कारावासाची शिक्षा व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

       याबाबत सविस्तर माहिती अशी की, मयत वैशाली हिचे काही दिवसांपूर्वी बाळासाहेब फटांगरे बरोबर लग्न झाले होते. त्यांचे काही दिवसांनंतर वाद विवाद होऊ लागले. एके दिवशी अचानक दि. 13 ओक्टॉबर 2016 रोजी सकाळी भानुदास गुंजाळ हा इस्तरीचे कपडे आणण्यासाठी गेला होता. त्यानंतर 10 ते 15 मिनीटांनीच शेजारी राहणारा पोपट जगताप यांच्या फोन वरून फोन आला की, भानुदास गुंजाळ याला बाळासाहेब फटांगरे याने जबरी मारहाण केली आहे असा फोन आला. हे कळताच भानुदास गुंजाळ यांचा भाऊ हा लक्ष्मीनगर येथे आरोपी बाळासाहेब फटांगरे यांच्या घरी पोहचले. तेथे गेल्यावर लोक जमा झाले होते. भावाला पाहण्यासाठी आत शिरला तर भानुदास गुंजाळ हा रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला होता. त्याच्या  शेजारीच आरोपी बाळासाहेब फटांगरे याची पत्नी वैशाली ही देखील रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती. त्यांच्या जवळच आरोपी बाळासाहेब फटांगरे हा हातात पहार घेऊन उभा होता. 

      दरम्यान कोणीमध्ये आले तर बघा असा दम आरोपी बाळासाहेब फटांगरे हा बघणार्यांना देत होता. तेथे उभे असणाऱ्यांपैकी पोपट गुंजाळ याने सांगितले की,आरोपी बाळासाहेब फटांगरे हा त्याच्या बायकोला पाहरीने मारत असताना आरडा ओरडा झाला. त्यामुळे कपडे घेण्यासाठी आलेला भानुदास हा सोडवण्यासाठी गेला. आरोपी बाळासाहेब फटांगरे याने त्याच्या देखील डोक्यात पहार मारली. तो रक्तबंबाळ अवस्थेत पडला. भानुदास यांना पुढील उपचाराला दवाखान्यात नेण्यासाठी भाऊ रामदास व काही लोकांनी आरोपी बाळासाहेब फटांगरे यांच्या घरातुन भानुदासला रक्तबंबाळ अवस्थेत उचले व चालु रिक्षा अडवून उपचारासाठी दवाखान्यात नेले. त्यानंतर आरोपी बाळासाहेब फटांगरे याची पत्नी वैशाली हिला देखील उपचारासाठी हलवले. मात्र, उपचारा दरम्यान वैशालीचा मृत्यू झाला. 

          दरम्यान, जखमी पडलेला भानुदास गुंजाळ यांच्या भावाला राग अनावर झाला. त्यांची तळपायाची आग मस्तकापर्यंत गेली. त्यांनी थेट शहर पोलीस ठाणे गाठले व गुन्हा दाखल केला. त्यानंतर, पोलीसांनी खबरदारी घेऊन घटनास्थळ गाठले. तत्काळ घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. घटनास्थळावरील भौतिक पुरावे गोळा करून असे अनेक इव्हिडन्स सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय सरोदे यांनी जमा केले. एक सबळ दोषारोपपत्र न्यायालयात ठेवण्यात आले. त्यानंतर हा खटला 2016 ते 2023 या काळात सुरू राहीला. यामध्ये पंधरा साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय सरोदे यांनी अनेक सबळ पुरावे व परिस्थितीजन्य पुरावे न्यायालयात सादर केले होते. त्याच्या आधारावर सरकारी वकील जयंत दिवटे यांनी प्रबळ युक्तीवाद करून प्रतिवाद्यांचा युक्तीवाद खोडुन काढला. त्यानंतर दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी बाळासाहेब तुळशीराम फटांगरे (रा. लक्ष्मीनगर, गुंजाळवाडी, ता. संगमनेर) यास पाच हजार दंडासह सात वर्षांची शिक्षा सुनावली.